‘एज’ या इंग्रजी शब्दाचा मराठीत शब्दशः अर्थ वय असा असला, तरी मानवशास्त्रात वापरताना तो मात्र वेगवेगळ्या संदर्भाने, वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो. शिवाय ‘एज’ या शब्दासाठी काल, युग, वयोमान अशा इतरही परिभाषा प्रचलित असल्याचे दिसते. सांस्कृतिक उत्क्रांतीमधील एखादा कालखंड हासुद्धा ‘एज’ या अर्थाने वापरला जातो. मानवी उत्क्रांतीची सुरुवात ही मानवी संस्कृतीची पहाट मानली जाते. यातील सर्वांत पहिला कालखंड अश्मयुग, दुसरा मध्याश्मयुग आणि त्यानंतरचा नवाश्मयुग म्हणून ओळखला जातो. नवाश्मयुगानंतर ब्राँझयुग, ताम्रपाषाणयुग, लोहयुग असे कालखंडाचे विभाजन केले गेले आहे. यांतील प्रत्येक स्वतंत्र कालखंड ‘एज’ म्हणून संबोधण्यात येतो. त्या त्या काळात वापरली गेलेली सांस्कृतिक उत्क्रांती दर्शविणारी साधने ही प्रत्येक कालखंडाचे वैशिष्ट्य आहे. उदा., अश्मयुगातील दगडी हत्यारे, ब्राँझयुगातील ब्राँझची हत्यारे, लोहयुगातील लोखंडाची हत्यारे यांचा शोध व वापर झाल्याचे दिसते. ही उत्क्रांती मानवाने केलेली उत्तरोत्तर प्रगती दृष्टीपथास येते. ताम्रपाषाणयुगात तांबे व दगडी हत्यारे यांचा पूरक वापर झाल्याचे दिसते.

शारीरिक वाढीच्या दृष्टीने व्यक्तीचे प्रत्यक्ष वय आणि मानसिक, बौद्धिक, दंतनुरूप, अस्थिनुरूप, लैगिंकवाढीनुरूप आणि रूपकीय म्हणजे दिसण्याचे वय या अर्थानेही वय हा शब्द ‘एज’ या अर्थाने वापरला जातो.  मराठी भाषेतील ‘वय’ यापेक्षा इंग्रजीमधील ‘एज’ हा शब्द मानवशास्त्रात विविध प्रकारे प्रतिध्वनित होतो.

विवाहाचे वय (Age at Marriage) : ‘एज ॲट मॅरेज’ याचा शब्दशः अर्थ विवाहाचे वय असा जरी असला, तरी मानवशास्त्राच्या परिभाषेत त्याला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. प्रत्येक मानवी समाजात विवाहाच्या वयाचे असे स्वतःचे निकष ठरलेले असतात. मानवशास्त्रीय माहिती संकलित करताना, समाजाचा अभ्यास करताना,  वय समजून घेण्यात खूप मोठा फायदा असतो. ज्या वेळी एखाद्या समाजामध्ये विवाहाच्या वेळेचे वय जास्त असते, तेव्हा प्रजोत्पादनाच्या दृष्टीने फलदायी कालखंड हा कमी होतो. अप्रत्यक्षपणे लोकसंख्यावाढीच्या दृष्टीने वय हे एक महत्त्वाचे निकष ठरते. मुलीची शारीरिक वाढ, मानसिक विकास, तसेच लोकसंख्या वाढीवर नियंत्रण राहण्यासाठी लग्नाचे वय अधिक किंवा योग्य असणे गरजेचे असते. या विपरीत कमी वयातील लग्ने व लहान वयात लादले गेलेले मातृत्व यांमुळे मुलीचे आरोग्य, होणाऱ्या बाळाचे आरोग्य व पुढील पिढीत संक्रमित होणारी पोषणद्रव्ये यांवर परिणाम करते.

वय अवलंबन प्रमाण (Age Dependency Ratio) : आर्थिक दृष्ट्या परावलंबी असलेल्या व्यक्तींचे आर्थिक दृष्ट्या उत्पादक असलेल्या व्यक्तींच्या संख्येचे गुणोत्तर म्हणजेच वय अवलंबन प्रमाण होय. म्हणजेच, एखाद्या समाजातील १५ वर्षांखालील आणि ६४ वर्षांवरील लोकांच्या संख्येचे १५ ते ६४ वर्षे वयातील व्यक्तींच्या संख्येबरोबर गुणोत्तर होय.

वयोगट (Age Group) : वयाधारित कोणत्याही सामाजिक गटाला वयोगट ही संज्ञा लावली जाते. संशोधन क्षेत्रात-प्रकल्पात माहिती देणाऱ्या व्यक्तींचे (इन्फॉर्मंट) त्यांच्या वयानुरूप विवध वयोगटांत विभाजन केले जाते. लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्येचे वयोगटानुसार विभाजन केले जाते. उदा., ० – १५, १५ – ६०, ६० – ८५ व ८५ वर्षांवरील गट इत्यादी. समाजाच्या व राष्ट्राच्या दृष्टीने विचार करता १५ – ६० हा वयोगट महत्त्वाचा असून त्यांनाच ‘कर्ती लोकसंख्या’ असे संबोधले जाते.

वयोवृद्धी  (Ageing) : शरीराची व पर्यायाने वयाची होणारी वाढ ही वयोवृद्धी या संज्ञेने ओळखली जाते. मानवी शरीराचे वय दिवसागणिक वाढण्याच्या प्रक्रियेसाठीसुद्धा वयोवृद्धी ही संज्ञा वापरली जाते. शरीराची वाढ ही जीवशास्त्रीय क्रिया असली, तरी त्याला एक सामाजिक पैलू आहे. विविध सांस्कृतिक मूल्ये व सामाजिक अपेक्षा या व्यक्तीचे वय व लिंगभाव या आधारे निश्चित होतात. म्हणूनच सामाजिक संरचनेतील व्यक्तींचे स्थान, वाढीच्या विविध टप्प्यानुरूप, वाढत्या वयानुसार येणाऱ्या अनुभवांच्या साहाय्याने ठरविले जाते. त्यायोगे सामाजिक संरचनेत विविधता दिसून येते. वयवाढीनुसार पार पाडाव्या लागणाऱ्या विविध भूमिकांचे निर्धारणही यात येते. लोकसंख्याशास्त्रातही लोकसंख्येचे विभाजन वयोवृद्धीच्या आधारे केले जाते.

समीक्षक : शौनक कुलकर्णी