मामा-भाचा किंवा मामा-भाची यांच्या संबंधांना मातृकुल पद्धतीत काही वेगळे महत्त्व असते. स्त्री ही जरी कुटुंबप्रमुख असली, तरी मामा हाच कुटुंबाचा व्यवहार पाहात असतो. त्याला कुटुंबात मोठे स्थान व महत्त्व असून तो कुटुंबाचा मुख्य नियंत्रक असतो. मुलांना आपल्या वडिलांपेक्षा मामालाच जास्त मान द्यावा लागतो. मामाच्या संपत्तीवर भाचाचा हक्क असतो. मामाच्या या विशिष्ट व प्राधान्ययुक्त आप्तसंबंधाला ‘मातुलेय’ असे म्हटले जाते.

अमेरिकेतील हैदा (हायडा) या जमातीत मुलगा दहा वर्षांचा झाला की, आपल्या मामाकडे राहायला जातो. तो मामाला कामात मदत करतो; मामा त्याची जबाबदारी घेतो. होपी व झुनी आदिवासी जमातीतील मुलगे उपवर झाले की, आपल्या मातुलगृही जातात. थोंगा आणि कोमांच या पितृसत्ताक जमातीत ही मातुलेय पद्धती आढळते. बहुतेक सुशिक्षित समाजातही मामा, आजोळ या शब्दांना एक वेगळे स्थान आहे. मामा-भाचाच्या आप्तसंबंधाना मातुलेय असे म्हणतात.

काही आदिवासी जमातींत मामाप्रमाणेच आत्यालासुद्धा आगळे व महत्त्वपूर्ण स्थान असते. याला  उद्देशून ‘पितृष्वसा’ (पितृश्वस्त्रेय किंवा आत्याप्रधान) हा शब्द वापरला जातो. कुटुंबात आईपेक्षा आत्याचे स्थान मोठे असते. भाचा आपल्या आत्याला अधिक मान देतो, तिच्या संपत्तीचा वारसही तोच असतो. विवाहामुळे निर्माण झालेले संबंध कालांतराने शिथिल होऊ नयेत, विवाहित मुलीला माहेरच्या घरात काही स्थान असावे म्हणून ही प्रथा पडली असावी, असे चॅपल आणि कून या तज्ज्ञांना वाटते. तोडा या आदिवासी जमातीत नवजात बालकाचे नामकरण करण्याचा अधिकार आत्यालाच असतो, असाच प्रकार महाराष्ट्रातील काही जाती-जमातींत दिसून येतो.

संदर्भ : मेहेंदळे, य. श्री., मानवशास्त्र (सामाजिक व संस्कृतिक), पुणे, १९६९.

समीक्षक : म. बा. मांडके