मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्रातील एक प्रमुख सैद्धांतिक संकल्पना. मानवी लैंगिकतेचे विविध पैलू समजून घेणे व समजून सांगणे यांसाठी मानवशास्त्रज्ञ जैविक आणि सांस्कृतिक अशा दोनही घटकांचा विचार ज्या शास्त्रात करतात, याला लिंगभाव मानवशास्त्र असे म्हटले जाते. मानवी लैंगिकता हा मानवशास्त्रज्ञांचा आवडीचा किंवा अभ्यासाचा विषय आहे. लैंगिकता हे एक जैविक सत्य आणि पुनरुत्पादनासाठीची गरज आहे; तरीही जगभरामध्ये लैंगिकतेचे अनुभव, लैंगिक दृष्ट्या व्यक्त होणे आणि त्या त्या संस्कृतीच्या अनुषंगाने त्याचे लावण्यात येणारे अर्थ यांमध्ये बरीच विविधता आढळते.
मानवशास्त्रामध्ये सुरुवातीच्या काळापासूनच लैंगिकता आणि त्याच्याशी संबंधित लिंगभाव, पुनरुत्पादन, विवाह इत्यादींमुळे तयार होणारी नाती या विषयांवर संशोधन होत आलेले आहे. इ. स. १९२० च्या काळात अमेरिकन मानवशास्त्रज्ञ मार्गारेट मीड व पोलिश मानवशास्त्रज्ञ ब्रॉनीस्लाव्ह मालिनाव्हस्की यांनी दोन संस्कृतींमधील लैंगिकतेसंबंधी असणाऱ्या वेगवेगळ्या धारणा आणि प्रथा यांचा लोकजीवनशास्त्राच्या साहाय्याने तौलनिक अभ्यास केला होता. हा विषय १९७० नंतर बराच विस्तारत गेला; कारण यानंतर सामाजिक मूल्ये आणि रूढी बदलत गेली. १९६० नंतर स्त्रीवादी चळवळी तसेच समलिंगी, उभयलिंगी व परलिंगीसाठीच्या चळवळी आकार घेत होत्या. यामध्ये बरेचसे संशोधन हे ‘लैंगिकतेचा अर्थ’ शोधण्यावर होते. लिंगभाव, लैंगिकता आणि पुनरुत्पादन यांसाठी एकत्र येणे या संकल्पना प्रत्येक संस्कृतीगणिक वेगळ्या होत्या. लिंगभाव मानवशास्त्रीय संशोधनाचा केंद्रबिंदू हा संस्कृतीमधील लैंगिकता, लैंगिक वर्तणुकीशी संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक संकल्पना तसेच लैंगिकतेतील विविधता आणि समलिंगी संबंध या सर्व बाबी वेगवेगळ्या संस्कृतींनी कशा प्रकारे स्वीकारल्या आहेत हे पाहणे हा होता. ज्यामध्ये तत्कालीन पाश्चिमात्य संस्कृतीचादेखील समावेश होता.
१९८० – १९९० च्या दशकांमध्ये काही नवीन लैंगिक समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. ज्यामध्ये एच. आय. व्ही. ची वैश्विक साथ, पुनरुत्पादनाचे बदलते अर्थ, पुनरुत्पादनासाठी आलेले नवीन तंत्रज्ञान, वेश्याव्यवसाय, पर्यटन, स्थलांतर, समलिंगी विवाह आणि वैश्विकीकरण यांचा समावेश होता. १९९० च्या मध्यानंतर वेगवेगळ्या सामाजिक गटांमध्ये लैंगिकता कशा प्रकारे आकार घेते याचा रचनात्मक अभ्यास करणे, हा मानवशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय झाला. लैंगिकतेच्या संशोधनावर स्त्रीवादी तत्त्व, समलिंगी संबंध, पिडोफिलीया (ज्यामध्ये व्यक्तींचा लैंगिक कल हा लहान मुले असतात), ऐतिहासिक आणि इतर सामाजिक शास्त्रांतील सिद्धांत यांचा प्रभाव जाणवतो. तसेच लैंगिकता या विषयाचा अभ्यास करताना त्याला सत्ता आणि व्यक्तित्व या अंगांचीसुद्धा जोड दिली गेली.
काही मानवशास्त्रज्ञ हे मानवी लैंगिकता आणि शारीरिक व सांस्कृतिक उत्क्रांती यांमध्ये काय परस्परसंबंध आहे, यांवर संशोधन करतात. मानवी लैंगिकता ही इतर प्राणिमात्रांपेक्षा वेगळी आहे. मानवी शरीरामध्ये होणारे बदल लैंगिकतेच्या स्वरूपामध्ये मोठा परिणाम करतात. तसेच बदललेल्या लैंगिक सवयींदेखील शारीरिक बदलांवर परिणाम करतात. मानवशास्त्रज्ञांच्या दृष्टीकोनातून लैंगिकता हा सामाजिक संघटनेचा मध्यवर्ती घटक आहे. ज्यावर अन्न मिळविण्यासाठी केलेली धडपड, कौटुंबिक रचना आणि धार्मिक विश्वास इत्यादी सामाजिक घटकांचादेखील परिणाम होतो. पर्यावरण, जैविक आणि सामाजिक दबाव या सर्व घटकांमुळे मनुष्य त्याची लैंगिकता कशा प्रकारे जुळवून घेतो, याचादेखील अभ्यास मानवशास्त्रज्ञांनी केलेला आढळून येतो. इतर सस्तन प्राण्यांपेक्षा स्त्रीची लैंगिकता भिन्न ती वर्षातील बाराही महिने लैंगिक दृष्ट्या सक्रिय असते आणि बऱ्याच दीर्घकाळच्या पुनरुत्पादनासाठी तिचे शरीर तयार असते. उत्क्रांतीच्या दरम्यान या अनुषंगाने तिच्यामध्ये शारीरिक बदलदेखील होत गेले. उदा., ताठ चालणे, शरीरावरचे केस गळून जाणे इत्यादी. याचाच परिणाम म्हणजे मनुष्यप्राण्यांमध्ये मिलनाचा काळ हा बाराही महिने असल्याचे अभ्यासातून आढळून आले. त्यामुळे लैंगिकता ही फक्त पुनरुत्पादन यापुरती सीमित राहिली नाही, तर याचे सामाजिक परिणाम म्हणून विवाह संस्था, कुटुंब रचना, आर्थिक जडणघडण, बाळांचे संगोपन या संकल्पना अस्तित्वात आल्या. मानवामध्ये गरोदरपणाचा कालावधी इतर सस्तन प्राण्यांपेक्षा दीर्घ असतो, तसेच संगोपनाचा कालावधीदेखील जास्त असतो. मानवाच्या बाळांमध्ये प्रतिकार करण्याची शक्ती सुरुवातीला नसते. ते स्वतः एकटे जगू शकत नाही. त्यामुळे दीर्घ काळापर्यंत त्यांचे पालनपोषण करणे ही पालकांची जबाबदारी असते.
मानवी लैंगिकता आणि शारीरिक बदल यांचे आणखी एक उदाहरण म्हणजे जोडीदाराची निवड करणे होय. लैंगिक क्रियेसाठी जोडीदाराची निवड म्हणजे अशी प्रक्रिया की, ज्यामध्ये व्यक्ती स्वतःची जनुके पुढच्या पिढीमध्ये यावीत यासाठी शारीरिक वैशिष्ट्यांवर आधारित अशी जोडीदाराची निवड करत असतो; मात्र इतर प्राण्यांमध्ये ही निवडीची प्रक्रिया नैसर्गिक असते. म्हणून मानवशास्त्रज्ञांनी लैंगिक क्रियांच्या अभ्यासासाठी जगातील मानवी समूहांमधील जनुकीय बदल हा एक महत्त्वाचा मुद्दा संशोधनामध्ये समाविष्ट केला आहे. जोडीदाराच्या निवडीसाठी संस्कृतीची फार महत्त्वपूर्ण भूमिका आहे; कारण प्रत्येक संस्कृतीमध्ये सौंदर्याचे आणि सुदृढ आरोग्याचे मापदंड वेगवेगळे असून कालगणिक ते बदलत जातात.
मानवी समूहामध्ये लैंगिक क्रिया ही फक्त पुनरुत्पादनासाठी होत नसते. त्यामध्ये समाधान, प्रेमबंध आणि इतरही अनेक कारणांचा समावेश असतो. ही कारणे नवीन जीवाला जन्म देण्याला पूरकदेखील असू शकतात किंवा यापलीकडे जाऊन त्या दोन विरुद्ध लिंगी व्यक्तींमधील लैंगिक अविर्भाव कसा आहे, याच्यावरदेखील परिणाम करतात. जेव्हा लैंगिक क्रिया पुनरुत्पादन हेतूने सोडून इतर कारणांसाठी केली जाते, तेव्हा ती सामाजिक आणि सांस्कृतिक पातळींवर लैंगिकता या विषयामध्ये त्या व्यक्तीचा अनुभव ज्यामध्ये लैंगिक नाते, त्या व्यक्तीची, जोडीदाराची आणि समाजाची भूमिका, त्यांची लैंगिक ओळख यांवर अवलंबून असते. संस्कृतीची भूमिका यामध्ये खूप व्यापक आहे; कारण स्थानिक संस्कृतीनुसार व्यक्ती त्याची लैंगिकता जुळवून घेत असतो. यामध्ये अस्तित्व, नातेसंबंध आणि एखादा विशिष्ट समूह या गोष्टींकडे कोणत्या नजरेने पाहिले जाते या सर्व घटकांचा समावेश होतो. त्यामुळे लैंगिकता ही जरी वैश्विक क्रिया असली, तरी त्याचे कार्य हे त्या त्या संस्कृतीनुसार ठरत असते.
लिंगानुसार कामाची विभागणी करणे याचादेखील लैंगिकतेवर परिणाम होतो. एखाद्या समूहामध्ये विवाहाचे नातेसंबंध कसे ठरविले जातात, याचे काही नियम असतात. विवाह आणि कुटुंबसंस्था हे त्या त्या समाजातील नीती नियमांवर अवलंबून असतात. लिंगानुसार जगण्यासाठी करावी लागणाऱ्या कामांची विभागणी केली जाते. स्त्रियांकडे बऱ्याचदा चूल आणि मूल हीच जबाबदारी दिसून येते. काही समाजांमध्ये कामाची विभागणी ही बरीचशी सोयीनुसार ठरविली जाते. त्यामध्ये विशिष्ट नियम दिसून येत नाहीत.
काही समूहांमध्ये विवाहाच्या बाबतीत एक पती आणि एक पत्नी, तर काहींमध्ये बहुपत्नी किंवा बहुपती असे नातेसंबंध पाहायला मिळतात. विवाह संस्कारामध्ये कितीही विविधता असली, तरी प्रत्येक विवाहामध्ये एकमेकांवरची जबाबदारी, कुटुंबाची देखभाल आणि लैंगिक संबंधांसाठीचे नियम पाळावेच लागतात. जर हे नियम पाळले गेले नाहीत, तर काही समूहांमध्ये घटस्फोटाची परवानगी दिली आहे. प्रत्येक समूहामध्ये लग्नाआधीचे, लग्नाच्या वेळी आणि लग्नानंतरचे लैंगिक वर्तन यालादेखील काही नियम घालून दिलेले आहेत. हे नियम पुरुष आणि स्त्रिया यांसाठी वेगवेगळे असतात. बऱ्याच समूहांमध्ये स्त्रीच्या कौमार्याला महत्त्व दिले जाते. काही समूहांमध्ये किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक संबंध जाणून घेण्याची मुभा दिली जाते. याउलट, बऱ्याच समूहांमध्ये विधवा स्त्रियांना लैंगिक संबंध ठेवण्यास मज्जाव केला जातो. काही जमातींत विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंध आनंदाच्या उत्सवावेळी घडून येतात, तर काही समाजात एक पत्नित्वच हवे असते. अफ्रिकेतील काही जमातींत घरी येणाऱ्या पाहुण्याला तात्पुरती पत्नी देण्याची प्रथा असल्याचे दिसते. काही धर्मांमध्ये पुरुषांमध्ये सुंता करण्याची धार्मिक प्रथा असते. मुलींच्या प्रथम पाळीच्या वेळी काही कुळाचार करून तिची ओटी भरणे यांसारख्या प्रथा केवळ भारतातच नव्हे, तर बाहेरच्या काही देशांत, समाजांतही दिसतात. व्यक्ती वयात येण्याचा पुनुरुत्पादनाशी असलेला संबंध यातून दिसतो. ब्राझीलमधील यानोमामी जमातीत आते-मामे विवाहच मान्य आहेत. उत्तरपश्चिम नेपाळमधील जमातीत बहुपतीत्व पद्धती तर आहेच; परंतु स्त्रीचे विवाह वेगवेगळ्या वयाच्या पुरुषांशी होतात. पापुआ न्यु गिनीच्या इटोरो संस्कृतीमध्ये पुरुष फक्त पुनुरुत्पादनासाठी किंवा वर्षातून ठराविक दिवसांतच स्त्रीसंग करतात. इतर वेळी ते समलैंगिक संबंध ठेऊ शकतात. मुलगा वयात येताना त्याला प्रौढ पुरुषांबरोबर राहून त्यांच्याकडून पुरुषत्व मिळवावे लागते. या संबंधाना समाजमान्यता असते. पारंपरिक मानवशास्त्रीय साहित्य हे एक पुरुष आणि एक स्त्री यांचा विवाह यावर आधारित होते, तर आताच्या व्याख्येनुसार समलिंगी विवाह हेदेखील मानवशास्त्राच्या अंतर्गत समाविष्ट झालेले आहे. काही पाश्चिमात्य राष्ट्रे (उदा., बेल्जियम, नेदरलँड्स, कॅनडा इत्यादी) समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली आहे.
विवाह ठरविताना रक्तातील नात्यांमध्ये विवाह करणे आणि त्यांना लैंगिक जोडीदार मानणे निषिद्ध मानले जाते; कारण रक्तातील नात्यात विवाह झाले, तर अशा संबंधातून जन्मजात आजार किंवा एका पिढीतून पुढील पिढीला काही आजार संक्रमित होऊ शकतात. कुटुंब परिघाच्या बाहेर लग्न लावल्यामुळे सामाजिक संबंध वाढतात आणि नवीन सामाजिक संबंध तयारदेखील होतात.
एखादा व्यक्ती तो पाळत असलेल्या प्रथांमुळे लैंगिकतेबाबत त्याचे काही दृष्टीकोन तयार झालेले असतात आणि त्याच्या वर्तनातून ते प्रतीत होत असतात. प्रत्येक व्यक्ती त्या दृष्टीकोनातून ती क्रिया पाहत असते आणि योग्य-अयोग्य ठरवीत असते. उदा., धार्मिक प्रथा. प्रत्येक धर्मामध्ये लैंगिकतेबाबतीत आचरण वेगवेगळे सांगितले गेले आहे. लैंगिक वर्तनावर बंधने घालणे हे त्या त्या समूहाच्या वैशिष्ट्यांशी जुळवून घेण्यात येणाऱ्या सभोवतालची परिस्थिती आणि वातावरण यांवर अवलंबून असते. समूहातील प्रत्येक सभासदाला हे पाळणे बंधनकारक असते. तसेच या गोष्टी पाळणे, किती पाळल्या गेल्या यांचा अभ्यास करणे हेदेखील महत्त्वाचे ठरते. काही लैंगिक वर्तन त्या त्या समूहाच्या धारणेनुसार आणि गृहीतकांनुसार योग्य किंवा अयोग्य आणि सामान्य की, विचित्र हे ठरविले जाते.
मानवी लैंगिकता हा एक जटील विषय आहे; पण मानवी अनुभव समजून घेण्याच्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाचे ठरते. लैंगिक वर्तन कसे असावे, काय योग्य आणि काय अयोग्य, त्यामध्ये स्त्री-पुरुषांची भूमिका नेमकी काय असावी इत्यादींविषयी वाद-प्रतिवाद सतत सुरुच आहे. एखाद्या समूहामध्ये स्वीकारार्ह असणारे लैंगिक वर्तन हे प्रभावी असेल, तर त्या मानाने अनोळखी असणाऱ्या संस्कृतीमधील लैंगिक वर्तन स्वीकारणे कठिण जाते. या वादावर तोडगा म्हणून कोणताही पूर्वग्रह न ठेवता मानवशास्त्रीय दृष्टीकोनातून विचारणा होणे गरजेचे आहे. लैंगिकता हा मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग असून व्यक्तिची आणि समाजाची ओळख पटण्यासाठी किंवा एखाद्या समूहाला समजून घेण्यासाठी लिंगभाव मानवशास्त्राचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
संदर्भ :
- मेहेंदळे, य. श्री., मानवशास्त्र (सामाजिक व संस्कृतिक), पुणे, १९६९.
- The McGraw Hill, New York, 1997.
समीक्षक : शौनक कुलकर्णी