गुडमन, मॉरिस (Goodman, Morris) : (१२ जानेवारी १९२५ – १४ नोव्हेंबर २०१०). प्रसिद्ध अमेरिकन वैज्ञानिक आणि जीवविज्ञान, पुरातत्त्वशास्त्र व मानवशास्त्र यांची सांगड घालणाऱ्या रेणवीय मानवशास्त्र (मॉलिक्यूलर अँथ्रोपॉलॉजी) या ज्ञानशाखेचे जनक. मानवी उत्क्रांतीसंबंधी संशोधनात सर्वप्रथम रेणवीय पद्धतींचा वापर करणारे ते पहिले मानवशास्त्रज्ञ होय.

गुडमन यांचा जन्म विस्कॉन्सीनमधील मिलवॉकी येथे झाला. मॅडिसन येथील विस्कॉन्सीन विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर ते लष्करी सेवेत दाखल झाले आणि महायुद्ध संपल्यावर त्यांनी परत शिक्षणाला सुरुवात केली. त्यांनी प्राणिशास्त्र आणि जैवरसायनशास्त्र या विषयांत पदवी मिळविली. १९५१ मध्ये पीएच. डी. पूर्ण केल्यानंतर काही काळ कॅलिफोर्नियात कॅल्टेक आणि शिकागो येथे त्यांनी संशोधन केले. त्यानंतर ते डेट्रॉइट येथील वेन स्टेट विद्यापीठात रुजू झाले. तेथे अखेरपर्यंत विशेष प्राध्यापक या पदावर ते कार्यरत होते.

गुडमन यांच्यामुळे उत्क्रांतीच्या क्षेत्रात रेणवीय मानवशास्त्र ठळकपणे पुढे आले; तथापि त्या आधी अर्नेस्ट आल्बर्ट हूटन या अमेरिकन भौतिक मानवशास्त्रज्ञांनी वांशिक फरकांविषयी संशोधन करताना रक्तरसशास्त्रीय (सेरॉलॉजी) पद्धतीच्या आधारे मानव आणि चिंपँझी यांच्यामधील साधर्म्याविषयी अनुमाने काढली होती; परंतु त्यांची फारशी दखल घेतली गेली नव्हती. गुडमन यांनी १९६० नंतर मानव, चिंपँझी व गोरिला यांच्यात अगदी निकटचे आनुवंशिक संबंध आहेत, हे सिद्ध करण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिक्षमताशास्त्रीय (इम्युनोलॉजी) चाचण्यांचा उपयोग केला. रेणवीय मानवशास्त्रामध्ये काम करणारे संशोधक त्यांच्या शाखेच्या इतिहासातला हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे, असे मानतात. त्या वेळी चिंपँझी व गोरिला आणि मानव यांचे दोन निराळ्या कुलांमध्ये वर्गीकरण केले जात. गुडमन यांनी या वर्गीकरणाला आव्हान दिले आणि चिंपँझी, गोरिला व मानव यांना एकाच होमिनिडी या कुलात ठेवावे, असे प्रतिपादन केले. त्यानंतर अमेरिकन पुराजीवशास्त्रज्ञ जॉर्ज गेलार्ड सिंप्सन, अमेरिकन जीवशास्त्रज्ञ अर्न्स्ट मेयर, प्राणिवैज्ञानिक ॲलन आर्थर बॉयडेन आणि त्या वेळचे इतर प्रख्यात उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ यांच्यात वादविवाद झाले. विख्यात नरवानरगण (प्रायमेट) वैज्ञानिक ॲडॉल्फ शूल्ट्झ आणि विख्यात पुरामानवशास्त्रज्ञ लूई लीकी यांनी तर गुडमन यांच्या संकल्पनांकडे गांभीर्याने पाहण्यास नकार दिला होता. पुराजीवशास्त्रीय पुरावा महत्त्वाचा मानायचा की, रेणवीय पद्धती महत्त्वाच्या मानायच्या यांत या सर्व वादांचे मूळ होते. असे वादविवाद गुडमन यांच्या मृत्यूपर्यंत चालू होते.

गुडमन यांनी रेणवीय मानवशास्त्रातील संशोधनासाठी पुढील काळात प्रतिक्षमताशास्त्रीय चाचण्यांबरोबरच प्रथिन क्रमवारी आणि डीएनए क्रमवारी अशा इतर पद्धतींचा वापर केला. या पद्धती कशा वापरायच्या याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या क्षेत्रातील अनेक विद्वानांमध्ये मतभेद झाले. त्यामध्ये गुणात्मक विरुद्ध संख्यात्मक माहितीचा वापर, उत्क्रांतीमधील नैसर्गिक निवड या तत्त्वांची भूमिका, उत्क्रांतीच्या वेगाचे परिमाण आणि रेणवीय घड्याळांची वास्तविकता हे प्रमुख मुद्दे होते.

गुडमन यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत शेकडो शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांचा आढावा घेतला, तर त्यामध्ये उत्क्रांतीसंबंधी पुढील तीन प्रमुख प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो :

  • (१) निसर्गामध्ये मानवाचे स्थान कोणते आहे.
  • (२) मानवजातीचा आनुवंशिक पाया काय आहे.
  • (३) मानवजातीची म्हणून ओळखली जाणारी वैशिष्ट्ये ही अलिकडच्या काळातील आहेत की, उत्क्रांतीच्या प्रवासात त्यांचा उगम अधिक जुन्या काळातील आहे.

सध्या अस्तित्वात असलेली आपली होमोसेपियन्स ही मानवप्रजात एकमेव आहे असे, मानू नये. उत्क्रांती होत असताना होमो परजातीच्या इतरही प्रजाती असतील, हे गुडमन यांचे मत पुढील काळात सिद्ध झाले आहे.

गुडमन यांनी जवळजवळ सहा दशकांच्या संशोधन कार्याखेरीज जर्नल ऑफ मॉलिक्यूलर फायलोजेनेटिक्स हे नियतकालिक सुरू केले आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी प्रमुख संपादक म्हणून योगदान दिले. ते युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या मानवशास्त्र विभागाचे सदस्य होते. गुडमन यांना अनेक मानसन्मान मिळाले. सन २००२ मध्ये त्यांना चार्ल्स डार्विन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गुडमन यांचे मिशिगन येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Hooton, E. A., Up from the Ape, 2nd edition, New York, 1946.
  • Journal of the History of Biology, 2010.

समीक्षक : शौनक कुलकर्णी