रेण्वीय मानवशास्त्र ही जीवविज्ञान, पुरातत्त्वशास्त्र व मानवशास्त्र यांची सांगड घालणारी ज्ञानशाखा आहे. मानव, चिंपँझी व गोरिला यांचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम मॉरीस गुडमन या अमेरिकन वैज्ञानिकांनी रेण्वीय पद्धतींचा वापर केला. ही रेण्वीय मानवशास्त्राची सुरुवात होती. मानवी उत्क्रांतीच्या संशोधनात रेण्वीय पद्धतींचा वापर आणि नवीन सैद्धांतिक भर घालणारे गुडमन हे रेण्वीय मानवशास्त्राचे जनक मानले जातात.

मानवी उत्क्रांतीच्या विषयात प्रारंभापासून सजीवसृष्टीत मानवाचे नेमके स्थान काय? मानवी उत्क्रांतीत जनुकांचा सहभाग किती व कसा आहे? आता जीवाश्मरूपात असलेल्या इतर मानव प्रजातींचे व आधुनिक मानव प्रजातीचे (Homo Sapiens) संबंध कसे होते? आणि आपल्या आधुनिक मानव प्रजातीचा उगम कसा झाला? या चार मुख्य प्रश्नांवर विचारमंथन केले जात आहे. पुरातत्त्वीय अवशेषांमध्ये सजीवांच्या शरीरातील रेणू (केवळ डीएनए नव्हे, तर प्रथिने, मेद पदार्थ व पिष्टमय पदार्थ) टिकून राहू शकतात आणि त्यांचा अभ्यास करता येतो, हे लक्षात आल्यानंतर मानवी जीवाश्मांमधील अशा जैविक रेणूंच्या अभ्यासाला गती मिळाली.

नवनवीन मानवी जीवाश्मांचा शोध, पुरातत्त्वीय अवशेषांमधील जैविक रेणुंच्या विलगीकरणातील प्रगती, आणि मानवी जनुकसंचाचा सखोल अभ्यास करण्याच्या तंत्रातील प्रगती या सर्व घटकांमुळे आधुनिक मानव प्रजातीसंबंधी आपल्या ज्ञानात सुमारे ३० ते ४० वर्षांमध्ये विलक्षण भर पडून त्या क्षेत्रात विलक्षण बदल झालेले आहेत. आधुनिक मानव प्रजातीची उत्क्रांती सुमारे २ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत झाली. तेथून ही मानवप्रजात सुमारे ६० हजार वर्षांपूर्वी बाहेर पडून जगभर पसरली. असे घडताना या मानवांनी निअँडरथल मानवांसारख्या इतर मानव प्रजातींची जागा व्यापली, असे अवघ्या काही दशकांपर्यंत मानले जात होते. मार्क स्टोनकिंग आणि रेबेका कान यांनी १९८७ मध्ये पेशींमध्ये असलेल्या ‘सूत्रकणिकांमधील डीएनए’ (Mitochondrial DNA) हा रेणुंवर आधारित मांडलेला सिद्धांत ‘आफ्रिकेतून बाहेर’ (Out-of-Africa) या नावाने ओळखला जातो; परंतु अनेक ठिकाणी मानवी उत्क्रांती झाली असल्याचा बहुस्थानीय सिद्धांत (Multiregional Evolution) काही संशोधकांनी मांडला आहे. मानव प्रजातीची उत्क्रांती आफ्रिकेत झाली असली, तरी सुमारे २० लाख वर्षांपूर्वी हे मानव जगभर पसरले आणि त्यामधून जनुकसंचात प्रचंड वैविध्य असलेली आजची आपली मानव प्रजात निर्माण झाली, असे प्रतिपादन या सिद्धांतामध्ये केले जाते; तथापि रेण्वीय मानवशास्त्रातील प्रगतीमुळे आज मानव प्रजातीमध्ये अनेक क्रांतिकारक फेरबदल झाले आहेत.

रेण्वीय मानवशास्त्रात ‘आफ्रिकेतून बाहेर’ हा सिद्धांत सर्वसाधारणपणे मान्य झाला असला, तरी आजही अनेक प्रश्नांचा उलगडा झालेला नाही. आधुनिक मानवांनी आफ्रिकेतून बाहेर आल्यानंतर जगभरातील इतर प्रजातींच्या मानवांमध्ये न मिसळता त्यांच्याशी स्पर्धा करून आक्रमकपणे त्यांना नष्ट केले आणि पूर्णपणे त्यांची जागा व्यापली. या वेळी त्यांच्यात परस्पर संबंध आले असतील, तर आजच्या आधुनिक मानव प्रजातीच्या जनुकसंचात अस्तित्वात नसलेल्या निअँडरथल मानवांसारख्या इतर मानवप्रजातींचे जनुक आहेत काय, असे प्रश्न सोडवण्यासाठी मानवी जीवाश्मांमधून मिळालेल्या ‘प्राचीन डीएनए’ (Ancient DNA) रेणूंचा उपयोग झाला.

इझ्राएलमधील मिस्लिया गुहेतील मानवी जीवाश्म आणि चीनमधील शांगझी प्रांतातील ‘दाली कवटी’ या जीवाश्माच्या अभ्यासाने (२०१७) आधुनिक मानव आफ्रिकेतून बाहेर येण्याचा कालखंड मागे गेला आहे. निअँडरथल मानवांच्या जीवाश्मांमधून मिळालेल्या प्राचीन डीएनए रेणुंमुळे हे सिद्ध झाले आहे की, किमान १ लाख ते ४० हजार वर्षपूर्व या दरम्यान निअँडरथल मानव आणि आधुनिक मानव यांच्यात परस्पर संबंध आले होते. त्यामुळे आधुनिक मानव प्रजातीच्या जनुकसंचात १ ते ४ टक्के एवढ्या प्रमाणात निअँडरथल मानवांचे जनुक आहेत. इतकेच नाही, तर २०१० मध्ये रेण्वीय मानवशास्त्रातील नवीन संशोधनामुळे मानवी उत्क्रांतीच्या कहाणीला आणखी एक वळण मिळाले. रशियाच्या अल्ताई भागात असलेल्या डेनिसोव्हा गुहेत आढळलेल्या वेगळ्या मानव प्रजातीच्या जीवाश्मांमध्ये मिळालेल्या प्राचीन डीएनए रेणुंचीदेखील आधुनिक मानव प्रजातीच्या जनुकसंचात सरमिसळ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आधुनिक मानवांच्या आणि निअँडरथल मानवांच्या जनुकसंचातील वैशिष्ट्यपूर्ण अशा ‘फोर्कडेड बॉक्स प्रोटीन पी२’ (FOXP2) या दहा जनुकांच्या गटामुळे बोलणे आणि भाषेचा उगम ४० हजार वर्षांपेक्षा अगोदर झाला असावा आणि आपल्याप्रमाणे निअँडरथल मानवदेखील भाषेचा उपयोग करत असावेत, असे दिसून आले आहे.

रेण्वीय मानवशास्त्र ही नवनवीन संशोधन चालू असलेली अत्यंत प्रवाही ज्ञानशाखा असून प्रत्येक वर्षी सातत्याने जुन्या सिद्धांतांना आव्हाने मिळून मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात नवीन सिद्धांत पुढे येत आहेत. मानवी उत्क्रांतीच्या संशोधनात रेण्वीय पद्धतींच्या वापराखेरीज सध्याच्या काळात उपयुक्त अशा इतर दोन क्षेत्रांमध्ये रेण्वीय पद्धतींचा उपयोग होतो. गुन्हाअन्वेषण करताना गुन्हा घडलेल्या ठिकाणी जैविक अवशेष मिळाले असतील, तर ते मानवी आहेत की प्राण्यांचे, मानवी असल्यास या अवशेषांमधील प्रथिने व डीएनए रेणू शोधून गुन्हेगाराची ओळख पटविणे आणि मिळालेले पुरावे हे न्यायालयात टिकतील अशा प्रकारे सादर करणे या कामात बोटांचे ठसे (फिंगर प्रिंट) घेणे यासारख्या अनेक रेण्वीय पद्धती उपयोगी पडतात. मानवी हत्या, सार्वत्रिक नरसंहार आणि वंश उच्छेदाचे मानवतेविरोधी गुन्हे अशा प्रसंगी न्याय सहायक मानवशास्त्राची मदत घेतली जाते. मानवी जनुकसंचातील जनुकांचा संपूर्ण नकाशा आता उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अनेक आनुवंशिक विकारांना कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांची ओळख पटविणे आणि विकारांवर उपाय शोधणे या कामातही रेण्वीय पद्धतींचा उपयोग केला जात आहे.

संदर्भ :

  • Birx, James H., Encyclopedia of anthropology, California, 2006.
  • Chu Hua-Chiu; Wildman, Derek, Evolutionary Anthropology, 2011.
  • Klepinger, Linda L., Fundamentals of Forensic Anthropology, New Jersey, 2006.
  • Stoneking, Mark, An Introduction to Molecular Anthropology, Hoboken, 2017.

समीक्षक : शौनक कुलकर्णी