शरीरावर झालेली जखम भरून येण्यासाठी औषधियुक्त मलम, चूर्ण किंवा द्रावण (solution) वापरून जखमेवर आच्छादन करण्याच्या प्रक्रियेला मलमपट्टी प्रक्रिया असे म्हणतात. जखमेवर मलमपट्टी केल्याने जखमेवर असणारा मृत पेशींचा स्तर काढून जखम भरून येण्यास मदत होते; जखमेतील द्रवपदार्थ शोषून जखम कोरडी होण्यास साहाय्य होते व त्यामुळे जखमेत होणारा जंतुसंसर्ग नियंत्रित होतो. जखम बरी होत असताना त्वचेचे विविध स्तर व्यवस्थित भरून यावेत व वेदना कमी व्हावी, जखम झालेल्या भागाच्या हालचालींवर नियंत्रण असावे, जखमेच्या आजूबाजूच्या त्वचेचे संरक्षण व्हावे इ. उद्देशाने जखमेवर मलमपट्टी केली जाते.

मलमपट्टीचे प्रकार :

  • कोरडी मलमपट्टी (dry dressing) : जखमेस जंतुसंसर्ग होऊ नये व अस्वस्थता कमी होऊन जखम लवकर बरी व्हावी याकरिता कोरडी मलमपट्टी केली जाते. या प्रकारात सर्वप्रथम पूतिरोधक (antiseptic) द्रवाने जखम पुसून त्यावर जंतुप्रतिबंधक (anti-bacterial) औषध लावून कोरडी मलमपट्टी केली जाते. जखमेभोवती योग्य आकारात दुमडलेल्या कापसाचे किंवा रेशमाचे तलम, पारदर्शक कापड ४ ते ८ थरांचा वापर करून गुंडळले जाते.
  • ओली मलमपट्टी (wet dressing) : या प्रकारच्या मलमपट्टीचा उपयोग जखमेस संसर्ग झाल्यास किंवा जखमेत पू (pus) झाल्यास केला जातो. यामध्ये कोमट पाण्याने ओलसर केलेल्या पट्टीने प्रथम मलमपट्टी करून पुन्हा त्यावर कोरडी पट्टी बांधली जाते. ओल्या मलमपट्टीमुळे जचामेस खाज सुटत नाही.
  • दाब मलमपट्टी (pressure dressing) : अतिरक्तस्राव रोखण्यासाठीची सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे दाब मलमपट्टी होय. जखमेतून जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल अशावेळी निर्जंतुक केलेली जाळीदार कापडाची पट्टी प्रथम जखमेवर ठेवून त्यावर कापडाची जाड व घट्ट मलमपट्टी ठराविक दाब देऊन बांधली जाते.

मलमपट्टीकरिता आवश्यक साहित्य : निर्जंतुक केलेल्या एका तबकात (tray) धमनी चिमटा (artery forceps), विच्छेदन चिमटा (dissecting forceps), शिरानाल चिमटा (sinus forceps), कात्री, सूक्ष्म तपासणीसाठी बोथट हत्यार (probe), लहान पात्र, बंद पिन (safety pin), हातमोजे, मास्‍क, कापुस, कापसाची पट्टी, जाळीदार कापड इ. साहित्य निर्जंतुक करून ठेवलेले असते.

मलमपट्टी करताना परिचारिकेची जबाबदारी : १) मलमपट्टी करण्यापूर्वी परिचारिका स्वत:चे हात व लागणारे सर्व साहित्य स्वच्छ व निर्जंतुक करून घेतात, तसेच तज्ज्ञांनी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना तपासून रुग्णाला मलमपट्टी प्रक्रिया समजावून सांगतात.  २) जखम किती खोलवर आहे हे तपासून, जखमेवर जंतुसंसर्ग होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. जखम मोठी असेल त्यावेळी मास्क, हातमोजे यांचा वापर करतात. मलमपट्टी करताना बोलणे, खोकणे, शिंकणे इ. टाळावे. ३) मलमपट्टी करताना प्रथम जखमेच्या भोवतालचा भाग स्वच्छ करून घ्यावा व त्यानंतर मुख्य जखमेचा भाग स्वच्छ करावा. ४) रुग्णाची खोली निर्जंतुक झाल्यानंतर १५ मिनिटांनंतरच रुग्णाला मलमपट्टी करावी व शक्यतो मलमपट्टी केल्यानंतर रुग्णास १५ मिनिटे  जेवण टाळावे.  ५) जखम वारंवार ओली होत असेल तर ठराविक कालांतराने पट्टी बदलावी. ६) जखम कोरडी पडल्यानंतर जखमेला पट्टी चिकटते, अशावेळी निर्जंतुक द्रव टाकून जखम ओली करून घ्यावी व पुन्हा मलमपट्टी करावी.

मलमपट्टीपश्चात परिचारिकेची जबाबदारी : १) रुग्णाचे खराब झालेले कपडे बदलून रुग्णाला आरामदायक स्थितीत बसवले जाते. २) वापरलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करून त्यांची विल्हेवाट लावली जाते. ३) प्रक्रियेची आपल्या नोंदवहीत व रुग्णाच्या फाइलमध्ये तारीख व वेळेसहीत नोंद करून ठेवली जाते. ४) रुग्णाच्या नातेवाईकांना जखमेची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन केले जाते.

संदर्भ :

  • Clement, I. Nursing Foundation – I, 2021.

समीक्षक : सरोज उपासनी