अपघात, आघात किंवा इतर काही कारणांमुळे अतिरक्तस्राव झाला व शरीरातील रक्त कमी झाले असता रुग्णाला शिरेतून बाह्य रक्तपुरवठा केला जातो, या प्रक्रियेला रक्तसंक्रमण (blood transfusion) असे म्हणतात. ही प्रक्रिया रुग्णाच्या शरीरातील रक्ताची घनता, तसेच कमी झालेले रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी केली जाते. शरीरावर झालेले आघात किंवा काही विकृतीजन्य आजार, उदा., रक्तक्षय, रक्त गोठण्याच्या गुणधर्माचा अभाव इ. कारणांमुळे अतिरक्तस्राव होऊ शकतो. मेंदू (brain haemorrhage), आतडे (intenstinal bleeding) इ. शरीराच्या आतील भागांत होणाऱ्या रक्तस्रावाला अंतर्गत रक्तस्राव (internal bleeding); तर अपघातामुळे शरीरावर होणाऱ्या रक्तस्रावाला बाह्यरक्तस्राव असे म्हणतात. सर्वसामान्य व्यक्ती विविध कारणांमुळे होणारी रक्ताची कमतरता एकूण रक्ताच्या ३०% पर्यंत सहन करू शकतो. यापेक्षा अधिक रक्तस्राव झाल्यास रक्तसंक्रमण आवश्यक असते. रक्तसंक्रमण प्रक्रियेत संपूर्ण रक्त किंवा रक्तपेशी, रक्त प्लाविका (blood plasma) असे केवळ रक्तातील घटक रुग्णाच्या शरीरात पाठविले जातात. रक्त संक्रमण प्रक्रियेत रुग्ण व दाता यांचे रक्तगट जुळणे आवश्यक असते, तसेच रक्त देण्यापूर्वी नियमानुसार रुग्ण व दाता दोघांच्याही रक्ताची संपूर्ण तपासणी करावी लागते व निर्जंतुकीकरणाची विशेष काळजी घ्यावी लागते.
रक्तसंक्रमण प्रक्रियेत परिचारिकेची भूमिका :
- रक्तसंक्रमण प्रक्रिया पूर्वतयारी : १) रुग्ण व नातेवाईकांना रक्तसंक्रमण प्रक्रिया समजावणे व केस पेपरवर तज्ज्ञांचे लेखी आदेश घेणे. २) रुग्ण व दाता यांची रक्तगट, आर्. एच्. घटक, रक्तातील लोहाचे प्रमाण (hemoglobin), एच.आय.व्ही. चाचणी इत्यादींच्या आधारे रक्त तपासणी करून घेणे. ३) रक्तपेढीमधून रक्ताची बाटली घेतली असता; रुग्णाचे नाव, वय, लिंग, रजिस्ट्रेशन क्रमांक, पत्ता, रक्तगट, आर्.एच्. घटक इ. सर्वांची नोंदणी रक्त पेढीच्या नोंद पुस्तकात करून ठेवावी व प्रक्रिया सुरू करेपर्यंत बाटली सपाट पृष्ठावर ठेवावी. ४) वापरण्यात येणारे सर्व साहित्याचे निर्जंतुकीकरण करून ठेवावे. ५) प्रक्रियेदरम्यान रुग्णास अपप्रतिरक्षी आघात (Anaphylactic shock) होऊ शकतो, त्याकरिता आपत्कालीन उपचार नियोजन तयार ठेवावे.
- रक्तसंक्रमण प्रक्रियेदरम्यानची परिचर्या : १) सर्व नैसर्गिक विधी पूर्ण करून रुग्णास आरामदायक स्थितीत झोपण्याचे सुचवावे. २) रुग्णाचा ताप, नाडी, श्वसन, रक्तदाब इ. तपासून तज्ज्ञांनी सुचविलेली औषधे द्यावीत व त्यांची नोंद करून ठेवावी. ३) बाटलीतील रक्त द्यायचे असल्यास त्याचे तापमान शरीराच्या स्वाभाविक तापमानाइतके आहे याची खात्री करावी. ४) आवश्यक साहित्य डॉक्टरांच्या हातात देणे. ५) संक्रमण सुरू असताना हवा शिरेमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी व रक्तसंक्रमणाच्या वेगाचे निरीक्षण करावे. सुरुवातीला हा वेग प्रति मिनिटे १० ते १५ थेंब असावा. हळूहळू वाढवत तो प्रति मिनिटे ३० ते ४० थेंब इतका करावा. ६) प्रक्रिया सुरू असताना रुग्णाला ताप, थंडी, अस्वस्थता अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत तज्ज्ञांना कळवावे. ७) रक्त संक्रमण प्रक्रिया पूर्ण झाली असता परिचारिकेने सुई टोचलेल्या जागेवर सूज आहे का?, निर्धारित वेळेत रक्त संपले का?, रुग्णाचे श्वसन, रक्तदाब इ. स्वाभाविक आहे का?, इतर काही त्रास जाणवतो का? अशा बाबींचे निरीक्षण करावे.
- रक्तसंक्रमण प्रक्रियेनंतरची परिचर्या : १) रुग्णास आरामदायक स्थितीत झोपवावे. २) अपप्रतिरक्षी आघात, अधिहर्षता प्रतिक्रिया (allergic reaction), लाल रक्तपेशींचा नाश होणे (haemolytic reaction), शिरेमध्ये रक्त साकळून दाह होणे (thrombophlebitis) यांसाख्या प्रतिक्रियात्मक परिणामांकडे विशेष लक्ष द्यावे. ३) रक्तसंक्रमण सुरू केल्याची तारीख व वेळ आणि संपण्याची वेळ नोंदवावी. ४) रक्तसंक्रमण प्रक्रिया पूर्ण न होताच थांबली असल्यास त्याचे कारण व प्रतिक्रियात्मक परिणामांसाठी केलेली उपाययोजना यांच्या नोंदी कराव्यात.
रक्त संक्रमण प्रक्रियेत परिचारिका वरील सर्व स्तरांवर तज्ज्ञांच्या बरोबरीने आपली जबाबदारी पार पाडत असते.
संदर्भ :
- Gupte, Satish, The Textbook of Blood Bank and Transfusion Medicine, 2006.
समीक्षक : कविता मातेरे