मूलभूत परिचर्या ही संकल्पना मानवाच्या निर्मिती पासूनच आलेली आहे. अपत्य प्राप्तीनंतर आईने बालकाचे संपूर्ण संगोपन करणे, घरातील स्त्रीने मुलाबाळांची, वयस्कर, आजारी,अशक्त, दुर्बल, अपंग व्यक्तींची काळजी घेणे हा देखील परिचर्येचाच प्रकार आहे. मूलभूत परिचर्येत रुग्णाची शुश्रूषा करताना त्याच्या मूलभूत (आवश्यक) गोष्टींचा विचार केला जातो. मानवाच्या गरजा जशा बदलू लागल्या आहेत तशा परीचर्येच्या तंत्रात बदल होवू लागले आहेत.

मूलभूत परिचर्या ही एक कला व शास्त्र  आहे. कोणत्याही कलेला जेव्हा शास्त्राचा आधार मिळतो, तेव्हा तिचा दर्जा उंचावतो हे तत्त्व परिचर्येलाही लागू पडते. म्हणूनच परिचर्या शास्त्राचा अभ्यास करताना सामाजिक वर्तन, मानसशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र यांचा आधार घ्यावा लागतो. तसेच शास्त्रीय विषय जसे की सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीशास्त्र, शरीरशास्त्र, वैद्यकीय व  शल्य चिकित्‍सा, औषधशास्त्र इ. विषयांचा प्रामुख्याने अभ्यास करावा लागतो.

मूलभूत परिचर्या संकल्पनेत सर्व समावेशक (Fundamental Holistic) परिचर्येचा समावेश केला जातो. ही परिचर्या विशेषतः विविध वयोगटातील रुग्ण व विविध आजारांमध्ये देण्यात येणाऱ्या परिचर्येसाठी उपयोगात आणली जाते. यामध्ये सर्वसाधारण परिचर्या (Basic nursing care) आणि विशिष्ट परिचर्या (Advance nursing care) यांचा अंतर्भाव केला जातो. मूलभूत परिचर्या ही व्यक्तीच्या जन्माच्या आधीपासून ते व्यक्तीचा मृत्यू व त्यानंतरची काळजी इथपर्यंत नियोजित केलेली असते त्यालाच गर्भ ते थडगे (Womb to Tomb) असे संबोधिले जाते. यामध्ये रुग्णांची शुश्रुषा करताना कराव्या लागणाऱ्या विविध प्रक्रिया (Nursing procedures – Basic or advanced) या शास्त्रशुध्द पद्धतीने कशा कराव्यात याचा सखोल व कारण मीमांसेसह अभ्यास केला जातो आणि त्या प्रक्रियेचे रुग्णाला होणारे फायदे व संभावित परिणाम यांचा विचार केलेला असतो. रुग्णशुश्रुषा करतानाची प्रत्येक कार्यपद्धती ही शरीरविज्ञान, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, मानसशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र इ.विविध शास्त्रांच्या आधारावर केली जाते.

फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी प्रथम परिचर्या क्षेत्राची सुरुवात केली. त्‍यांना आधुनिक परिचर्या व्यवसायाची जननी असेही संबोधले जाते. इ.स १८५४ ते १८५६ या काळामध्ये झालेल्या क्रिमियन युद्धामध्ये (Crimean war) त्यांनी परिचर्या क्षेत्राचे समाजात असलेले महत्‍त्व जगासमोर प्रकर्षाने आणले. आपल्या कला, कौशल्य आणि कर्तृत्वाने त्यांनी या युद्धादरम्यान सैनिकांची केवळ काळजी घेतली नाही तर त्यांच्यामधील  मृत्यूचे  प्रमाणसुद्धा कमी केले. त्यांच्या या कामगिरीबद्दल लंडनच्या राजा एडवर्ड यांच्या हस्ते नाईटिंगेल यांना “ऑर्डर ऑफ मेरिट” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परिचर्या शिक्षणाची प्रमुख ही परिचारिका असली पाहिजे, शिक्षण देताना पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड असावी असे त्यांनी आग्रही प्रतिपादन केले होते.

कालानुरूप परिचर्या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. परिचारिका ही केवळ रुग्णाला सेवा देणारी व्यक्ती राहिली नसून शिक्षणतज्ञ, व्यवस्थापन, संशोधन अशा वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहे.

या विषयांतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो.

१.  परिचर्या : अर्थ, नैतिकता, मूल्य, कलागुण, इ.

२. संवादकौशल्य

३. रुग्णाच्या गरजेनुसार दैनंदिन परिचर्या

४. प्रथमोपचार

समीक्षक : डॉ. सरोज उपासनी