अर्थशास्राचा प्रसार, विकास आणि विस्तार करण्यासाठी इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक अग्रगण्य संस्था. या संस्थेची मूळ स्थापना २० नोव्हेंबर १८९० रोजी ब्रिटिश इकॉनॉमिक सोसायटी या नावाने झाली; मात्र २ जून १९०२ रोजी नाव बदलून रॉयल चार्टरखाली तिचे ‘रॉयल इकॉनॉमिक सोसायटी’ या नावाने नोंदणी करण्यात आली.
आधुनिक अर्थशास्त्राची स्थापना पाश्चात्य देशांमध्ये साधारणपणे अठराव्या शतकाच्या मध्यास झाली, असे मानले जाते. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांनी इ. स. १७७६ मध्ये लिहिलेल्या वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकाने त्या विषयास चालना मिळाली. सुरुवातीस या विषयाचे ‘राज्यसंस्थेला आर्थिक-राजकीय धोरण शिकविणारी शाखा’ असे स्वरूप होते. तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास अशा विद्याशाखांच्या बरोबरीने अर्थशास्राचा विकास होत गेला; मात्र स्वतंत्र विषय म्हणून अर्थशास्राचा विचार व्हावा व तसा अभ्यास व्हावा असा विचार एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास जोर धरू लागला. इ. स. १८८७ मध्ये अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनची स्थापना होऊन अशा स्वतंत्र विचारास अधिक बळकटी आली. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ॲल्फ्रेड मार्शल यांनी इ. स. १८९० मध्ये लिहिलेल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध पुस्तकाने अर्थशाखेच्या नव्या व स्वतंत्र स्वरूपावर शिक्कामोर्तब केले. फ्रान्समध्येही यासारखी संस्था अस्तित्वात येऊन कार्य करू लागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर इंग्लंडमधील हर्बर्ट फॉक्सवेल आणि सर रॉबर्ट पाल्येव यांनी पुढाकार घेऊन ‘रॉयल इकॉनॉमिक सोसायटी’ची रीतसर स्थापना केली. आर्थिक सिद्धांत आणि मूलतत्त्वे, आर्थिक धोरणांचा विचार, त्यांचे विश्लेषण व त्यावर होणारे संशोधन या सर्वांना ही सोसायटी चालना देते.
सोसायटीचा कारभार नियामक मंडळ करीत असते. अर्थशास्राच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी धोरणे ठरविणे, विविध उपक्रमांची आखणी करणे आणि त्यावर कार्यवाही करणे अशी प्रमुख कामे सोसायटीची आहेत. वार्षिक अधिवेशन घेणे, विशेष संशोधन प्रकल्पांना अनुदान देणे, वार्षिक व्याख्यानमाला आयोजित करणे, निबंध स्पर्धेचे आयोजन करणे अशा विविध कार्यक्रमांचा यामध्ये समावेश असतो. सोसायटीचे सुमारे ४,००० सभासद आहेत. जॉर्ज गोशेन हे एक राजकारणी व उद्योगपती सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते.
सोसायटीतर्फे अर्थशास्राच्या जगतात मान्यता पावलेली इकॉनॉमिक जर्नल आणि इकॉनोमेट्रिक्स जर्नल ही दोन विख्यात नियतकालिके नियमितपणे प्रकाशित केली जातात. या श्रेष्ठी समीक्षित नियतकालिकांमध्ये आर्थिक सिद्धांत, धोरण, विश्लेषण यांवरील शोधनिबंधांचा प्रामुख्याने समावेश असतो. यांपैकी इकॉनॉमिक जर्नल या नियतकालिकाची सुरुवात मार्च १८९१ रोजी झाली, तर इकॉनोमेट्रिक्स जर्नल याची सुरुवात १९९८ मध्ये झाली. एजवर्थ हे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ इकानॉमिक जर्नलचे पहिले संपादक असून ते सुमारे ३४ वर्षे या पदावर होते.
सोसायटीच्या पुढाकाराने अनेक प्रकाशने प्रसिद्ध करण्यात आली आहेत. उदा., मार्शल यांचे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक, रिकार्डो या अभिजात अर्थतज्ज्ञांचा पत्रव्यवहार, एजवर्थ यांची पुस्तके, द इकॉनॉमिक ॲडव्हायझरी कौन्सिल हे पुस्तक या सर्वांसाठी सोसायटीने प्रयत्न केलेले आढळतात. सोसायटीचा सुरुवातीचा इतिहास कोट्स यांनी इकॉनॉमिक जर्नलमध्ये १९६८ मध्ये प्रसिद्ध केला. तसेच जॉन हे व डोनाल्ड बिंच यांनी अ सेंच्युरी ऑफ इकॉनॉमिक्स हंड्रेड यिअर्स सोसायटी अँड इजे हे पुस्तक संपादित करून १९९० मध्ये प्रसिद्ध केले. सोसायटीने निरनिराळ्या विषयांवरील वार्षिक अधिवेशने प्रायोजित केली आहेत. उदा., डिसिजन ॲनालिसीस १९७३, वेजेस अँड अनएम्प्लॉयमेंट १९८१, एक्सचेंज रेट १९८६.
सोसायटीद्वारे २००१ पासून दर वर्षी आर्थिक धोरणावर एक वार्षिक व्याख्यान आयोजित केले जाते. तरुण अर्थतज्ज्ञांसाठी २००७ पासून एक निबंध स्पर्धा घेण्यास येत असून त्यांनी लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट शोधनिबंधासाठी ऑस्टिन रॉबिन्सन पारितोषिक देण्यात येते. तसेच सर्व अर्थतज्ज्ञांचा एकत्रित विचार करून उत्कृष्ट शोधनिबंधासाठी रॉयल इकनॉमिक सोसायटी पारितोषिक देण्यात येते. याची सुरुवात १९९० मध्ये झाली. अर्थशाखाच्या व्यवसायात महिलांच्या सहभागाची आणि योगदानाची सोसायटीकडून विशेष दखल घेतली जाते. त्यासाठी १९९६ मध्ये एक स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली. २०११ पासून इकॉनोमेट्रिक्स जर्नलमधील सर्वोत्कृष्ट शोधनिबंधासाठी पारितोषिक दिले जाते. सोसायटीची वार्षिक परिषद २५ ते २७ मार्च २०२४ या काळात क्विन युनिव्हर्सिटी बेलफास्ट येथे होण्याचे प्रस्तावित आहे.
समीक्षक : अनील पडोशी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.