हठयोगी पुंडलिक रामचंद्र निकम : (१५ ऑगस्ट १९१७ – १८ जुलै १९९९). योगसाधनेतील अथक परीश्रमांतून हठयोगावर प्रभुत्व मिळविल्याने हठयोगी निकम गुरुजी या नावाने योग जगतात सुपरिचित. यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील म्हसवे या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पानकाबाई होते. गुरुजींचे आई-वडील अशिक्षित होते व त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. वडिलांचा मुख्य व्यवसाय नाभिक आणि शेती होता. निकम गुरुजींचे तिसरीपर्यंतचे शिक्षण म्हसवे गावी झाले, तर चवथीचे शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी झाले. त्यांनी पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण सेंट्रल स्कूल, जळगाव येथे घेतले. शालेय शिक्षणाबरोबरच त्यांनी लहानपणी धर्मभास्कर विनायक महाराज मसुरकर यांच्याकडून सूर्यनमस्कार, मल्लखांब तसेच इतर व्यायाम व कसरती यांचे प्राथमिक धडे घेतले. त्यांना कुस्तीचीही आवड होती. त्यांनी कुस्तीचे अनेक डावपेच शिकून घेतले होते. ते किनरी हे वाद्य उत्तम वाजवत असत. गुरुजींना पोवाडे, स्वातंत्र्यगीते या गाण्यांचीही आवड होती. गुरुजींचे आई-वडील नवनाथ पंथीय होते. त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून वनौषधींचे ज्ञान मिळाले होते.

हठयोगी निकम गुरुजी

निकम गुरुजींनी साने गुरुजींसोबत अनेक ठिकाणी जनजागृतीचे सांस्कृतिक कार्यक्रम केले. त्यातूनच त्यांनी गावामध्ये व्यायामशाळा सुरू केली. समाजाची आणि देशाची सेवा करण्याच्या हेतूने ते १९३९ मध्ये तत्कालीन मुंबई राज्य पोलिस विभागात पोलिस हवालदार म्हणून सामील झाले. नोकरीत असताना बदलीच्या विविध ठिकाणी त्यांनी २४ व्यायामशाळा स्थापन केल्या. १९७६ मध्ये ते पोलिस सेवेतून निवृत्त झाले. पोलिस सेवेत असताना महाराष्ट्र दौऱ्यावेळी पंडित नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांचा १९५२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडून आदर्श पोलिस म्हणून गौरव करण्यात आला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपला सर्व वेळ व्यायामशाळेकरिता तसेच योगसाधना करणे, लोकांना योग शिकविणे व समाज जागृती करणे इत्यादी कामांसाठी दिला.

निकम गुरुजींच्या मते शारीरिक दुर्बलता हे सर्वांत मोठे पाप आहे. मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शारीरिक व्यायाम पुरेसे नाहीत, ज्ञानप्राप्तीसाठी शरीर परीपक्व असावे लागते आणि त्यासाठी प्राणायामच करायला हवा, हे लक्षात आल्यावर त्यांनी १९४८ पासून योगसाधनेचा अभ्यास सुरू केला. निकम गुरुजींनी षट्कर्मांचा सखोल अभ्यास केला होता आणि तो सर्वच योगसाधकांसाठी अत्यंत आवश्यक आहे, अशी त्यांची दृढ धारणा होती. निकम गुरुजींनी आपल्या स्वानुभवातून सर्वसामान्य लोकांसाठी (१) प्राथमिक (२) प्राणायाम, (३) योग शिक्षक प्रशिक्षण असे तीन योग कार्यक्रम तयार केले होते. त्यांनी सुरू केलेल्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये प्राथमिक अभ्यासातच त्यांनी षट्कर्मांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. धौती, नेती, कपालभाती, बस्ती, नौली आणि त्राटक या शरीरशुद्धी क्रियांपैकी बस्ती ही क्रिया तसेच शक्तिपात किंवा कुंडलिनीशक्ती जागृती यांसारखे विषय सर्वसामान्यांसाठी नाहीत असे त्यांचे मत होते.

निकम गुरुजींनी विशेषेकरून महिलांच्या ताण व्यवस्थापन प्रशिक्षणावर भर दिला. महिलांना कुटुंबामध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागत असतात. अशा वेळी योग प्रशिक्षित माता एक आदर्श माता असू शकते आणि तिचा तिच्या कुटुंबावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. यातूनच राष्ट्रीय चारित्र्य विकासाची प्रक्रिया निर्माण करून राष्ट्रविकास घडविणे ही काळाची गरज आहे, असे त्यांचे ठाम मत होते. प्रापंचिकांना अंतिम श्वासापर्यंत निरोगी राहण्यासाठी योगाचे समग्र ज्ञान मिळवणे आणि प्रपंच करताना परमार्थ साधता येतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले.

शरीराने सेवा करा, मनाने उत्तम विचार करा आणि धनाने परोपकार करा. स्वर्ग आणि नरक हे आपण जीवंतपणीच पाहत असतो. सेवा, प्रेम, प्रसन्नता, संतोष यांत स्वर्ग आहे, तर द्वेष, क्रोध, निंदा, अहंकार यातच नरक यातना सामावलेल्या आहेत. नराचा नारायण बनण्याची क्षमता तुमच्यातच आहे. सद्बुद्धी ही मानवाची फार मोठी संपदा आहे आणि ती प्रगल्भ करण्यासाठी ओंकार, गायत्रीची साधना सुलभ पद्धतीने स्त्री-पुरुष भेद न करता अमलात आणावी, असे गुरुजींचे परखड विचार आणि आचरण होते.

१९६५ मध्ये त्यांनी ठाण्यामध्ये श्री अंबिका योग कुटिर या संस्थेची स्थापना केली. त्यांची आरोग्याची गुरुकिल्ली, स्वास्थ्ययोग (भाग १ आणि २), स्वाध्याय – सार्थ भजनावली (भाग १ आणि २), योग मंथनसार, व्यासामृतसार ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. यांपैकी काही पुस्तकांचे कन्नड, हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांमध्ये अनुवादही झालेले आहेत. योगपरंपरेतील बऱ्याचशा साधनांचे योग्य तंत्र सर्वसामान्य लोकांना माहीत नसते. गुरुजींच्या प्रयत्नाने अशाच साधनांपैकी कुंभक प्राणायाम आणि मुद्रा यांचा अभ्यास सर्वसामान्य साधकांपर्यंत पोहोचू शकला. गुरुजींना संस्कृत भाषाही चांगली अवगत होती आणि म्हणूनच वेद, उपनिषिदे, हठयोगप्रदीपिका आणि पातंजल योगदर्शन यांसारख्या ग्रंथांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता.

योगाचे ज्ञान लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्कार्य निकम गुरुजींनी केले. त्यांच्या वनौषधींच्या उपचारामुळे आणि यौगिक क्रियांमुळे असंख्य लोकांच्या व्याधी बऱ्या झाल्या आहेत. हे सर्व काम गुरुजींनी विनामूल्य आणि कसलीही अपेक्षा न ठेवता केले. ‘मानवता हाच खरा धर्म आहे’ हे साने गुरुजींच्या सहवासातून शिकलेले संस्कारमूल्य त्यांनी आयुष्यभर जपले. गुरुजींना त्यांच्या कार्यासाठी अनेकदा गौरविण्यात आले होते. आयुर्वेदिय औषधे आणि योगिक उपचार या क्षेत्रातील विशेष कामगीरीकरिता कलकत्ता येथील द सेंटर ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन या संस्थेने निकम गुरुजींना Gem of Alternative medicine या पदवीने सन्मानित केले होते. त्यांनी योगसाधनेबरोबरच आयुर्वेद, निसर्गोपचार, शिवांभू (मूत्र उपचार), अध्यात्म यांच्या साहाय्याने समाजातील तळागाळातील लोकांची शेवटच्या श्वासापर्यंत नि:शुल्क सेवा केली.

निकम गुरुजींच्या प्रेरणेतून २०११ मध्ये मुंबई आणि ठाणे परिसरात श्री अंबिका योग निकेतन ही योगक्षेत्रात काम करणारी संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या २१ कायम शाखा असून या संस्थेमार्फत योगसाधनेचा विनामूल्य त्रैमासिक अभ्यासक्रम राबविला जातो. सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या व्याधींवर प्रभावीपणे लाभदायक ठरतील अशा क्रिया आणि आसने या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत आहेत. या संस्थेतर्फे योगद्रुम आणि स्वज्ञानाचा मार्ग-प्राणायाम ही पुस्तके प्रकाशित होतात.

संदर्भ :

  • https://yoganikam.org/aboutgurugi.php
  • https://www.ambikayogkutir.org/about-us/rev-hathayogi-shri-nikam-guruji/

समीक्षक : राजश्री खडके