योगसाधनेतील एक महत्त्वाची मुद्रा. ही मुद्रा जिभेशी संबंधित असून ती शारीरिक, मानसिक तसेच शरीरांतर्गत ग्रंथींचे कार्य प्रभावित करणारी आहे. यामुळे सूक्ष्म असा परिणाम साधणाऱ्या ह्या मुद्रेला राजयोग, हठयोग व वेदांत ग्रंथयांमध्ये अतिशय महत्त्व दिले गेले आहे. ‘ख’ म्हणजे ‘आकाश’ व ‘चर्’ म्हणजे ‘संचार करणे’ होय. खेचरी मुद्रेच्या साधनेने साधकाचे चित्त शारीर जाणीवेपासून मुक्त होऊन आकाशात किंवा शून्यमंडलात संचार करू शकते (हठप्रदीपिका ३.४०), म्हणून राजयोगात ही मुद्रा ‘नभोमुद्रा’ म्हणूनही ओळखली जाते.

खेचरी मुद्रा दोन पद्धतींनी करता येते. सामान्य साधकासाठी राजयोग पद्धती, तर अनुभवी साधकासाठी हठयोग पद्धती योग्य ठरते.

(१) राजयोग पद्धती : मन (चित्त) शुद्धी हे याचे मुख्य उद्दिष्ट असून अद्वैताचे ज्ञान होऊन मुक्त होण्याचा एक मार्ग असे याचे वर्णन आढळते. या पद्धतीसाठी पुढील कृती वर्णिली आहे –पद्मासन, सिद्धासन वा सिद्धयोनी आसनात ताठ बसावे. हातांची चिन्मुद्रा वा ज्ञानमुद्रा करावी. बाकी शरीर शिथिल करून डोळे बंद ठेवावे. तोंड बंद ठेवून जिभेचे टोक वरच्या दिशेने गोल वळवावे. हळूहळू जिभेचा मागचा भाग जबड्याच्या वरच्या म्हणजेच टाळूच्या भागाला स्पर्श करेल या पद्धतीने जिभेचे टोक घशाच्या दिशेने न्यावे. जास्त ताण न देता जीभ शक्य तेवढी मागे न्यावी. टाळूच्या मऊ भागाला जिभेचे टोक लागले पाहिजे. दरम्यान उज्जायी (दीर्घ श्वसन) प्राणायाम चालू ठेवावा. दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी केंद्रित करावी. ही संपूर्ण स्थिती जमेल तेवढा वेळ ठेवावी. ताण जाणवल्यास स्थिती सोडून द्यावी व थोडा वेळ थांबून पुन्हा ही मुद्रा करावी. शारीर पातळीवर आपले लक्ष जिभेचा ताण तसेच टाळूवर पडणारा तिचा दाब यांवर, तर आध्यात्मिक पातळीवर लक्ष विशुद्धि-चक्रावर (कंठस्थानी असणारे चक्र) केंद्रित करावे. प्रारंभी असलेली श्वासांची संख्या काही महिन्यांच्या सरावानंतर मिनिटाला ५-६ पर्यंत कमी करत न्यावी. योग्य मार्गदर्शनाखाली ही संख्या अजूनही कमी होऊ शकते. मुद्रेचा एकूण कालावधी साधारण पाच ते दहा मिनिटे असावा. अनेक दिवसांच्या साधनेमुळे जीभ अतिशय लवचिक व सैल होऊ लागते व तोंडातील वरच्या पोकळीपर्यंत (अधिस्वर द्वारापर्यंत; Epiglottis) पोहोचू शकते. शरीर-शुद्धीकरणाशिवाय ही मुद्रा केल्यास कधीकधी कडू चव अनुभवास येते. असे झाल्यास मुद्रा त्वरित थांबवावी.

(२) हठयोग पद्धती : शरीरशुद्धी हे हठयोगाचे मुख्य उद्दिष्ट असून वरीलसाधनेमध्ये पुरेशी प्रगती साधल्यानंतरच आणि केवळ गुरूच्या मार्गदर्शनाखाली हठयोग पद्धतीने खेचरी मुद्रा करावी. ती काहीशी कठीण असून तीत जिभेचे क्रमश: छेदन, चालन व दोहन ह्या क्रिया अंतर्भूत असतात. यासाठी निश्चय, संयम व सहनशक्ती आवश्यक आहे.

छेदन या क्रियेत तीक्ष्ण व निर्जंतुक शस्त्राने तोंडातील खालील भागाला चिकटलेले जिभेचे मूळ म्हणजेच शीर (Frenulum) अगदी केसाइतकी कापावी असे म्हटले आहे. चालन या क्रियेत जीभ सैंधव मीठ व हरडाचूर्णाने चोळावी व जिभेचे टोक सतत फिरवावे; तर दोहन या क्रियेत जिभेला लोणी लावून लोखंडी चिमटा इत्यादीने ती बाहेर ओढावी वा सळईने दाबावी, असे म्हटले आहे. प्रत्येक आठवड्याला एकदा याप्रमाणे जिभेचे मूळ थोडे थोडे कापत व जीभ सतत फिरवत, ओढत राहून ती मुळापासून मोकळी, सैल व लांब करणे  अपेक्षित आहे. अशारीतीने जीभ भुवयांच्या मध्यभागी स्पर्श करू शकेल इतकी लांब व्हायला हवी (हठप्रदीपिका ३.३२-३५). ही अवस्था प्राप्त झाल्यावर खेचरी मुद्रेची अंतिम स्थिती गाठता येते. त्यानुसार जीभ वळवून मागे नेतकपाल-कुहरापाशी म्हणजेच जेथे इडा, पिंगला व सुषुम्ना यांचा संगम होतो वा दोन्ही नाकपुड्या, दोन्ही कान व मुख यांच्या नाड्या जेथे एकत्र येतात त्या पंचस्रोत विवरापाशी नेत वरच्या पोकळीत असलेल्या श्वसनमार्गाच्या छिद्रांना साधारण अर्धा क्षण तरी टेकवता आली पाहिजे. ही अंतिम स्थिती गाठू शकणारा साधक विष, रोग, मूर्च्छा, वार्धक्य, अकाल मृत्यू इत्यादींपासून मुक्त होतो, असे हठप्रदीपिका  म्हणते (३.३७-३८). या स्थितीत ती छिद्रे जिभेच्या सहाय्याने बंद करता येतात व अशा रीतीने श्वसनावर नियंत्रण मिळवून त्या ठिकाणचे ललना तसेच विशुद्धि-चक्रही उद्दीपित करता येते.

ह्या मुद्रेचा खूप सूक्ष्म असा परिणाम साधकावर होतो. हठप्रदीपिकेत म्हटले आहे की, खेचरी मुद्रेच्या साधनेदरम्यान जीभ कपाल-कुहरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे आज्ञाचक्राजवळील (दोन भुवयांमध्ये असणारे चक्र) सोममंडलातून झरणारे अमृत, पराशक्तीचे (कुंडलिनीचे) ध्यान करीत प्राशन करणारा साधक नवीन ऊर्जा वा प्राणशक्ती प्राप्त करतो. परिणामी तो कमळाप्रमाणे कोमल अशी निरोगी काया प्राप्त करून दीर्घायुषी होतो (३.५०). घेरण्डसंहितेनुसार या अमृतानुभवाच्या आधी साधकाला खारट, आंबट, कडू इत्यादी तसेच दूध, लोणी, तूप, इत्यादी चवींचा अनुभव येतो (३.३१-३२).

घेरण्डसंहितेनुसार परिपूर्ण खेचरी मुद्रा करणाऱ्या साधकावर अग्नी, जल वा वायू यांचा कोणताही विपरीत परिणाम होऊ शकत नाही (३.२९). अमृतबिंदूच्या प्राशनामुळे त्याचे शरीर वज्राप्रमाणे कठीण म्हणजेच वृद्धत्त्वाचा परिणाम न होणारे बनते. अमृत प्राशनाने त्याला दिव्य आनंदाचा अनुभव येतो. मृत्युसमयी त्याचा प्राणही ब्रह्मरंध्रातून बाहेर पडत असल्याने त्याला मोक्षगती सहजपणे प्राप्त होते. ही मुद्रा साधल्यावर योग्याला भूक व तहान यांची बाधा होत नाही.

संपूर्ण खेचरी मुद्रेच्या यशस्वी साधनेमुळे चित्त शारीरिक पातळीवरून विलग होऊन आकाशात किंवा शून्यमंडलात विहार करू लागते. म्हणजेच अज्ञानशून्य अशा स्थानी विहार करू लागते. या अवस्थेत योग्याला येणारा ज्ञानानुभव हेच तत्त्वज्ञान होय (हठप्रदीपिका ३.५२) आणि म्हणूनच योगशास्त्रामध्ये खेचरी मुद्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे.

खेचरी मुद्रेमुळे लाळेच्या प्रमाणात वाढ होऊन तहान व भूक यांवर नियंत्रण प्राप्त होते. आळस दूर होतो, शरीराला लावण्य प्राप्त होते आणि साधकाची समाधी लागते. खेचरी मुद्रेचा उपयोग ध्यान-धारणेच्या वेळेस, तसेच उज्जायी प्राणायाम, अंतर्कुंभक व बहिर्कुंभक सहजपणे करण्यासाठीही होतो.

शाण्डिल्य उपनिषदानुसार (अध्याय १) सुप्त अवस्थेतील कुंडलिनी शक्ती योग्यांच्या शरीरात कंठाच्या वरच्या भागात असून ती मोक्षप्रद असते, तर इतरांच्या शरीरात मात्र खालच्या भागात असून बंधनकारक असते. खेचरी मुद्रेच्या साहाय्याने योगी कंठाच्या वर असलेली ती शक्ती जागृत करू शकतो. लक्ष्याच्या ठिकाणी एकचित्त व केवळ मंगलमय अशी ही मुद्रा ‘वैष्णवी मुद्रा’ होय, असेही ह्या उपनिषदात म्हटलेले आहे.

पहा : उज्जायी प्राणायाम.

संदर्भ :

  • बी. के. दलाई, योगोपनिषद्, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, २०१५.
  • स्वामी दिगंबर; डॉ.पितांबर झा, हठप्रदीपिका, श्रीमन्माधवयोगमंदिर समिती, कैवल्यधाम, लोणावळा, पुणे, १९८०.
  • Rai, BahadurSrisa Chandra Vasu, The GherandaSamhita, Chaukhamba Sanskrit Pratishthan, Varanasi, 2011.
  • Swami SatyanandaSaraswati & Swami Niranjanananda Saraswati,  Mudra Vigyan — Philosophy and Practice of Yogic Gestures, Bihar School of Yoga, Yoga Publication Trust, Munger, Bihar, 2013.
  • Swami SatyanandaSaraswati,  Asana, Pranayama, Mudra, Bandha, Bihar School of Yoga, Munger, Bihar, 1993.

समीक्षक : कला आचार्य

This Post Has One Comment

  1. Avinash Hari Gore

    तुम्ही सांगितलेली खेचरी मुद्रची माहिती खूप छान होती .
    अशीच माहिती जर अगोचर मुद्रा , भुचारी मुद्रा , चांचारी मुद्रा व तसेच इतर मुद्राची माहिती मिळावी अशी विनंती.

Comments are closed.