‘श्रुति’ हा शब्द संस्कृत भाषेमधील ‘श्रूयते’ म्हणजे ‘ऐकणे’ या क्रियापदापासून उत्पन्न झाला आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये ‘श्रूयते इति श्रुती:’ असे लिहिले गेले आहे. कानांनी ऐकू येणारा नाद म्हणजे श्रुती असेही म्हणता येईल. दोन स्वरांमधील अंतर जेव्हा गायले-वाजवले जाते, त्यावेळी ऐकू येणारे अतिसूक्ष्म स्वरांतर यालाही श्रुती असे म्हणण्याचा प्रघात आहे. उदा., काफी रागाचा ‘कोमल गंधार’ आणि दरबारी कानडा रागाचा ’कोमल गंधार’ यांमधील फरक एखादा समर्थ कलाकार दाखवू शकतो. अलीकडच्या काळात श्रुतींची नेमकी संख्या कोणती याबद्दल मतमतांतरे प्रदर्शित होत असून विज्ञानाच्या आधारे त्यावर संशोधन, प्रस्तुती इ.द्वारे हा विषय समजावण्याचे प्रयत्न होत आहेत आणि ते उपयोगी पडू शकतील. असे जरी असले, तरी प्राचीन ग्रंथकारांनी काय नोंदवून ठेवले आहे, हे देखील तपासणे आवश्यक आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात श्रुतीचा पहिला उल्लेख आढळतो. त्यानंतर शारंगदेवांच्या संगीत रत्नाकर, कवी लोचन यांच्या राग तरंगिणी, पं. अहोबल यांच्या संगीत पारिजात, हृदयनारायणदेव यांच्या हृदय कौतुक, श्रीनिवास यांच्या रागतत्वविबोध आणि विष्णु नारायण भातखंडे यांच्या अभिनवरागमञ्जरी आदी ग्रंथांमध्ये श्रुतीबद्दल चर्चा करत वेगवेगळी मते मांडलेली आहेत. या सर्वांची श्रुतिस्वरकल्पना जरी भिन्न असली आणि त्या समान मानणे यावर देखील जरी मतभिन्नता होती, तरी सप्तकांमधील श्रुतींची संख्या बावीस होती याबद्दल त्यांच्यामध्ये दुमत नव्हते. या बावीस श्रुती सात शुद्ध स्वरांमध्ये वाटून घेत असता प्रत्येक स्वरात पुढीलप्रमाणे श्रुतींची संख्या होती – सा, म, प यांच्या प्रत्येकी चार; ग, नी यांच्या प्रत्येकी दोन आणि रे, ध या स्वरांना प्रत्येकी तीन. या श्रुतींची नावे देखील वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी आहेत. ती अनुक्रमे : तीव्रा, कुमुद्वती, मंदा, छन्दोवती, दयावती, रंजनी, रक्तिका, रौद्री, क्रोधी, वज्रिका, प्रसारिणी, प्रीती, मार्जनी, क्षिती, रक्ता, संदीपनी, आलापिनी, मदन्ति, रोहिणी, रम्या, उग्रा आणि क्षोभिणी. अर्थात संबंधित स्वर हा त्या त्या श्रुतींच्या पहिल्या स्थानावर आहे किंवा शेवटच्या स्थानावर आहे यावर देखील प्राचीन आणि आधुनिक ग्रंथकारांमध्ये मतभेद आहेत, हे नमूद केले पाहिजे. भरतमुनींनी श्रुती सिद्ध करण्यासाठी एक प्रयोग नोंदवून ठेवला आहे, तो ‘सारणा चतुष्ट्यी’या नावाने प्रसिद्ध आहे.
संदर्भ :
- कपिलेश्वरी, पं. बाळकृष्णबुवा, श्रुतिदर्शन, पुणे, १९६३.
- पुरोहित, बाळ, हिंदुस्थानी संगीत पद्धती : मूलतत्वे आणि सिद्धांत, नागपूर.