ग्राम :

संगीतातील पारिभाषिक संज्ञा. ‘ग्राम’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘समूह’ असा होतो व त्याच अर्थाने त्याचा संगीतात प्रयोग केला गेला आहे. संगीतरत्नाकर या ग्रंथात शारंगदेवांनी ‘स्वरांचा समूह’ या अर्थाने ‘ग्राम’ या संज्ञेची व्याख्या खालीलप्रमाणे केली आहे.

ग्रामः स्वरसमूहः स्यान्मूर्च्छनादेः समाश्रयः।

अर्थ : ज्यातून मूर्च्छना होतात असा स्वरसमूह. वस्तुतः ज्या स्वरसप्तकांत स्वरस्थाने एकमेकांपासन निश्चित प्रमाणाच्या ध्वन्यन्तरावर असतात असे एक मौलिक स्वरसप्तक म्हणजे ग्राम. शुद्ध स्वरसप्तक हेच ग्राम होय. प्राचीन संगीतात अशा तीन ग्रामांचा उल्लेख मिळतो. षड्ज-ग्राम, २) मध्यम-ग्राम व ३) गांधार-ग्राम.

यापैकी गांधार-ग्राम, भरतमुनी लिखित नाट्यशास्त्राच्या वेळी लुप्त झाला होता. त्यामुळे षड्ज-ग्राम व मध्यम-ग्राम या दोन ग्रामांचाच उपयोग प्राचीन संगीतात केला जात असे. प्रत्येक ग्रामात सात-सात स्वर असतात, म्हणून तीन ग्रामांत एकंदर एकवीस मूर्च्छनांचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतो; परंतु गांधार-ग्राम लुप्त झाल्यामुळे त्या ग्रामाच्या मूर्च्छना जमेत धरल्या जात नाहीत आणि म्हणून केवळ षड्ज-ग्राम व मध्यम-ग्राम या दोन ग्रामांच्या एकूण चौदा मूर्च्छनांचे वर्णन आपल्या प्राचीन ग्रंथांत केलेले आढळते. भरताने षड्ज-ग्राम व मध्यम ग्रामांत बावीस श्रुतींच्या कोष्टकात खालीलप्रमाणे सात स्वरांची स्थापना केली आहे. षड्ज-ग्रामात ‘पंचम्’ सतराव्या श्रुतीवर आहे व त्याचे स्वरांचे स्थानकोष्टक बावीस श्रुतींनुसार ४ ३ २ ४ ४ ३ २ असे येते व मध्यम-ग्रामात पंचम सोळाव्या श्रुतीवर आहे व त्याचे स्वरांचे स्थानकोष्टक बावीस श्रुतींनुसार ४ ३ २ ४ ३ ४ २ असे येते.

१) षड्जग्राम :

श्रुतिक्रमांक १  २  ३  ४  ५  ६  ७  ८  ९  १०  ११  १२  १३  १४  १५  १६  १७  १८  १९  २०  २१  २२

स्वर                     सा         री       ग                    म                      प                ध         नि

२) मध्यमग्राम :

श्रुतिक्रमांक १  २  ३  ४  ५  ६  ७  ८  ९  १०  ११  १२  १३  १४  १५  १६  १७  १८  १९  २०  २१  २२

स्वर                     सा         री       ग                    म                      प                ध         नि

भरतमुनींनी वरील ग्रामांत सर्व संवाद श्रुतींच्याच परिभाषेत सांगितले आहेत. ग्रंथकारांच्या म्हणण्याप्रमाणे षड्जग्रामात षड्ज व पंचम् या स्वरांच्यामध्ये बारा श्रुती आहेत, म्हणून या ग्रामात षड्ज-पंचम् संवाद आहे; पण मध्यम-ग्रामात षड्ज व पंचम यांच्यामध्ये अकराच श्रुती असल्याकारणाने मध्यम्-ग्रामात षड्ज-पंचम् संवाद नाही. तसेच ज्या ज्या दोन स्वरांत आठ श्रुतींचे अंतर असेल तर ते स्वर ऋषभ-पंचम् संवादाचे समजावेत असे भरतमुनींनी म्हटले आहे. आता ऋषभ-पंचम् संवाद म्हणजेच षड्ज-मध्यम संवाद, कारण षड्ज-ग्रामात काय किंवा मध्यम-ग्रामात काय षड्ज व मध्यम यांच्यामध्ये आठच श्रुती आहेत. भरतमुनींना इष्ट असलेले श्रुतींचे माप वादग्रस्तच आहे. पाश्चात्त्य ध्वनिशास्त्राचा आधार घेऊन षड्ज-पंचम्-संवाद (साःप) २:३ व षड्ज-मध्यम-संवाद (सा:म) ३:४ असे मानले गेले आहे. नाट्यशास्त्रात भरतमुनींनी अध्याय २८, श्लोक क्रमांक २० मध्ये एक महत्त्वाचे विधान केले आहे, जे आजही सप्तकाच्या निर्मितीचे मुख्य तत्त्व म्हणून स्वीकारले आहे, ते म्हणजे षड्ज-पंचम् संवाद. त्यानुसार षड्ज-ग्रामात ‘षड्ज-मध्यम’, ‘षड्ज-पंचम्’, ‘ऋषभ धैवत’ व ‘गांधार-निषाद’ हे परस्परसंवादी आहेत.

मूर्च्छना :

शुद्ध स्वरसप्तकातील (म्हणजे ‘ग्राम’) कोणत्याही एक स्वरापासून आरंभ करून सात स्वरांचा, त्यांच्या अनुक्रमाप्रमाणे, आरोह व अवरोह करणे म्हणजे एक मूर्च्छना होय. मूर्च्छना भारतीय प्राचीन संगीताची आधारशिला होती. मूर्च्छना हा शब्द ‘मूर्च्छ’ या धातुपासून निर्माण झाला आहे व त्याचा अर्थ मोह आणि ‘उच्छ्राय’ म्हणजे उभार, चमकणे, प्रकाशात येणे असा होतो. भरतमुनींनी चार प्रकारच्या मूर्च्छना सांगितल्या आहेत – १) शुद्धा, २) अन्तरसंहिता ३) काकलीसंहिता व ४) अन्तरकाकली-संहिता. भरतमुनींनी मूर्च्छना या विषयाबद्दल एक विशेष नियम सांगितला आहे. तो म्हणजे १) सात स्वरांचा प्रयोग व २) ते स्वर क्रमाने असावेत या दोन गोष्टी यात आवश्यक आहेत. षड्ज-ग्रामात सात मूर्च्छना या क्रमाने आहेत. १) उत्तरमन्द्रा, २) रजनी, ३) उत्तरायता, ४) शुद्धषड्जा, ५) मत्सरीकृता, ६) अश्वक्रान्ता व ७) अभिरुद्गता. या मूर्च्छनांबद्दल भरतमुनींनी असे म्हटले आहे की, या मूर्च्छनांचे एक दुसऱ्यानंतर क्रमाने षड्ज, निषाद, धैवत, पंचम्, मध्यम, गांधार आणि ऋषभ हे आद्य स्वर आहेत. त्यांनी मूर्च्छनांचे वर्णन अवरोही क्रमाने केले आहे. या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आहे व ती म्हणजे सामवेदात स्वराचा अवरोही क्रम होता आणि तो क्रम भरतांच्या नाट्यशास्त्रापर्यंत अक्षुण्ण चालत आला होता. भरतकालीन संगीत ‘गांधर्वसंगीत’ होते, जे वैदिक परंपरेच्या अंतर्गत मानले जात होते.

वरील षड्जग्रामाच्या मूर्च्छनांची श्रुतीयुक्त व्यवस्था कशी होती आणि त्यांची प्रतिकृती आधुनिक थाट व्यवस्थेत कशी आहे हे खालील कोष्टकावरून स्पष्ट होईल. भरतकालीन स्वरस्थाने (शुद्ध स्वर) वर्तमान काफी थाटासमान होती.

षड्ज-ग्राम मूर्च्छना

त्याचप्रमाणे मध्यम-ग्रामाच्या मूर्च्छनांची व्यवस्था देखील खालीलप्रमाणे होती.

मध्यमग्राम मूर्च्छना

ज्याप्रमाणे ग्राम म्हणजे शुद्ध स्वरसप्तकातील कोणत्याही स्वराला षड्ज समजून त्या स्वरापासून आरंभ करून त्यांच्या अनुक्रमाप्रमाणे आरोह व अवरोह करणे म्हणजे मूर्च्छना होते, तीच संकल्पना कायम ठेवून वर्तमान प्रचलित रागाचे उदाहरण दिल्याने हा विषय अधिक स्पष्ट होईल. उदाहरणादाखल भूप रागाचे ओडव स्वरूप घेतले तर, त्यामध्ये ‘सा’पासून भूप राग होतो, ऋषभापासून क्रमाने आरोह-अवरोह केल्याने ‘सारंग’ होईल, गांधाराला ‘सा’ मानल्याने ‘मालकंस’ होईल, पंचमाला ‘सा’ मानल्याने ‘दुर्गा’ आणि धैवताला ‘सा’ मानल्याने ‘धानी’ राग होईल.

संदर्भ :

  • ठाकूर जयदेव सिंह, भारतीय संगीत का इतिहास, वाराणसी, २०१६.
  • परांजपे, शरच्चन्द्र श्रीधर, भारतीय संगीत का इतिहास, वाराणसी, २०१०.
  • रातंजनकर, श्रीकृष्ण नारायण, संगीत परिभाषा विवेचन, मुंबई, २०००.

समीक्षण : सुधीर पोटे