ॲरंडेल, रुक्मिणीदेवी : (२९ फेब्रुवारी १९०४ — २४ फेब्रुवारी १९८६). भरतनाट्यम् या प्रकारातील एक श्रेष्ठ भारतीय नर्तिका. त्यांचा जन्म मदुराई येथे झाला. त्यांचे वडील ए. नीलकांत शास्त्री यांचे मूळ गाव संस्कृत शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असलेले थिरुविसाई नल्लूर हे होते. ते स्वत: बुद्धिमान संस्कृत पंडित आणि सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता तसेच ॲनी बेझंट यांच्यासोबत थिऑसॉफिकल सोसायटीचे १९०१ सालापासूनचे अनुयायी व कार्यकर्ते होते. त्यांची आई शेषाम्मल या संगीतप्रेमी होत्या. त्यांच्या बहिणी शिवकामू व विसलक्ष्मी, भाऊ श्रीराम व यशशेखरन ही सर्व भावंडे थिऑसॉफिकल सोसायटीची अनुयायी होती. वयाच्या सातव्या वर्षापासूनच रुक्मिणी या सोसायटीच्या विचारधारेशी परिचित व संलग्न झाल्या. त्यामुळे अंधश्रद्धांना, जुनाट कालबाह्य रूढींना विरोध आणि मानवतेचा पुरस्कार या जीवनमूल्यांचे दृढ रोपण त्यांच्यावर झाले. आधुनिक नाट्य, नृत्य, संगीत व संस्कृती यांच्याशीही त्यांची ओळख झाली. त्यांचे सद्गुण पाहून ॲनी बेझंट यांनी त्यांच्या नावात ‘देवी’ हे अभिधान जोडले आणि त्यांना मुलीसारखे मानून वर्ल्ड मदर चळवळीच्या नेतेपदी नेमले.
वाराणसी येथील केंद्रीय हिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व थिऑसॉफिकल सोसायटीचे कार्यकर्ते जॉर्ज ॲरंडेल या बेझंट बाईंच्या निकटवर्तीय व्यक्तीशी रुक्मिणीदेवींची ओळख झाली आणि १९२० साली त्या दोघांचा प्रेमविवाह झाला. लग्नानंतर थिऑसॉफिकल सोसायटीच्या तत्त्वांचा व विचारांचा प्रसार करण्यासाठी तसेच अनुयायांशी वार्तालाप करण्यासाठी त्यांनी जॉर्ज यांच्याबरोबर पाश्चात्त्य देशांत प्रवास केला. त्या १९२३ साली अखिल भारतीय थिऑसॉफिकल सोसायटीच्या युवा विभागाच्या व १९२५ साली जागतिक थिऑसॉफिकल सोसायटीच्या युवा विभागाच्या अध्यक्ष झाल्या.
प्रसिद्ध रशियन बॅले नर्तिका आन्न पाव्हलॉव्ह या त्यांच्या नृत्याच्या सादरीकरणासाठी भारतात आल्या असता रुक्मिणीदेवींनी ते पाहिले. दुसऱ्याच दिवशी रुक्मिणीदेवी पती जॉर्ज यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाला निघाल्या होत्या. त्या प्रवासात त्यांची ओळख आन्न पाव्हलॉव्ह यांच्याशी झाली. त्यांची सहकारी क्लिओनार्दी हिच्याकडे देवींनी बॅले नृत्याचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर आन्न यांच्या सूचनेवरून पारंपरिक भारतीय शास्त्रीय नृत्याचा शोध घेत असताना १९३३ मध्ये रुक्मिणीदेवींना मद्रास संगीत महोत्सवात ‘साधीर’ (Sadhir) हा भरतनाट्यम् नृत्याचा एक प्रकार पाहण्याची संधी मिळाली आणि त्यांनी मेलापोर गौरी अम्मल यांच्याकडे भरतनाट्यम् मधील ‘अभिनय’ अंगाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यांना पन्दानल्लूर (Pandanallur) मीनाक्षिसुंदरम् पिळ्ळै या कुशल गुरुंकडून नृत्य शिकण्याचीही इच्छा होती; पण २९ वर्षांच्या मोठ्या वयाची स्त्री तेवढ्या गांभीर्याने व सातत्याने नृत्य शिकणार नाही असे वाटल्यामुळे पन्दानल्लूर यांनी आपल्या जावयाला – पोन्निआ (Ponniah) पिळ्ळै यांना – मद्रासला (चेन्नईला) रुक्मिणीदेवींना भेटण्यासाठी पाठवले. तेथे रुक्मिणीदेवी मेलापोर यांच्याकडे ज्या आत्मीयतेने व कठोर मेहनत घेऊन भरतनाट्यम् शिकत होत्या, ते पाहून पोन्निआ प्रभावित झाले व त्यांची शिफारस त्यांनी पन्दानल्लूर यांच्याकडे केली. अशारीतीने देवींचे पन्दानल्लूर यांच्याकडे पद्धतशीर शिक्षण सुरू झाले. रुक्मिणीदेवींनी खेडोपाडी जाऊन अनेक नृत्यशिक्षकांकडून या नृत्यप्रकारासंबंधी माहिती गोळा केली. थिऑसॉफिकल सोसायटीच्या पद्मासिनी, शंकर मेनन अशा अनेक तरुण-तरुणींना घेऊन रुक्मिणीदेवी नाटके व परिकथांवर आधारित बालनाट्ये दिग्दर्शित करू लागल्या होत्या. त्यासाठीचे पोशाख त्या स्वत: तयार करीत असत. शरीराची लवचिकता, लयीविषयीची जाण व हालचालींतील आकर्षकता यांमुळे त्यांच्या नृत्यांना वैशिष्ट्यपूर्णता लाभली. नृत्याकडे त्यांनी श्रद्धेने व बुद्धिवादी दृष्टीने पाहिले. शास्त्रोक्त संगीत, नृत्यनाट्ये यांतही त्यांनी विशेष प्रावीण्य संपादिले. कुमारसंभव, शाकुंतल, तसेच कुट्राल कुरवंजि, कण्णपर कुरवंजि, श्यामा, आंडाळ, रामायण (६ भाग) इ. नाट्ये, नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली व त्यांच्या संगीतरचनाही केल्या. ब्रिटिश काळात या नृत्यप्रकाराचा राजाश्रय नष्ट झाल्यामुळे अश्लील हावभाव, पदरचना व शृंगारिक नृत्यकृती यांचा समावेश या देवदासींच्या नृत्यप्रकारात झाला होता आणि त्याची सामाजिक प्रतिष्ठा लयाला गेली होती. रुक्मिणीदेवींनी या अनैतिक प्रकारांना फाटा देऊन त्याचे पुनरुज्जीवन केले आणि भरतनाट्यम् नृत्याला अभिजात शास्त्रीय नृत्यकलेचा दर्जा, मान्यता व आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मानसन्मान मिळवून दिला.
डिसेंबर १९३५ मध्ये थिऑसॉफिकल सोसायटीच्या हिरक महोत्सवाच्या सार्वजनिक समारंभात रुक्मिणीदेवींनी आपल्या नृत्याचे पहिले सादरीकरण केले. त्यासाठी चेन्नईच्या बऱ्याच प्रतिष्ठित, मान्यवर व्यक्ती उपस्थित राहिल्या होत्या. त्यांपैकी जेम्स कझिन्स यांच्या आग्रहामुळे व पती जॉर्ज यांच्या सहकार्याने नृत्यादी कलांच्या संवर्धनासाठी त्यांनी चेन्नईजवळील अड्यार येथे ‘कलाक्षेत्र’ या संस्थेची स्थापना केली. भरतनाट्यम् नृत्याच्या सादरीकरणातही त्यांनी नवीन वाद्ये, साजेसे नेपथ्य, सुनियोजित प्रकाशव्यवस्था व मंदिरातील शिल्पाकृतीतील नृत्यांगनांसारखी वेशभूषा, केशभूषा व दागिने यांचा वापर करून त्याचे कलामूल्य व प्रेक्षणीयता वाढवली. १९४५ मध्ये पती जॉर्ज यांच्या मृत्युनंतर त्यांच्यापुढे उभ्या राहिलेल्या आर्थिक व इतरही अडचणींना तोंड देतच त्यांनी कलाक्षेत्रमध्ये थिऑसॉफिकल सोसायटीतर्फे अनेक शिक्षणसंस्था उभ्या केल्या.
वडिलांकडून मिळालेले नवमतवादी विचार आणि आईने केलेले पारंपरिक भारतीय संस्कार यांचा मेळ रुक्मिणीदेवींच्या व्यक्तिमत्त्वात आहे. थिऑसॉफिकल सोसायटीच्या एकनिष्ठ अनुयायी, प्रसारक व कार्यकर्त्या; भरतनाट्यम् या भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकाराच्या सुधारक, समर्पित नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शिका; मुक्या प्राण्यांच्या हक्कांसाठी व कल्याणासाठी झटणाऱ्या निसर्गप्रेमी; शाकाहाराच्या काटेकोर पालनकर्त्या व प्रसारक; राज्यसभेच्या पहिल्या महिला खासदार असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी पैलू आहेत. प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्या आजन्म उभ्या राहिल्या. वैद्यकशास्त्र, औषधीशास्त्र व प्राणिशास्त्र यांतील संशोधनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगात मुक्या प्राण्यांचे होणारे हाल, धार्मिक कारणांसाठी त्यांचे दिले जाणारे बळी, सर्कशींमध्ये कसरती शिकण्यासाठी त्यांच्यावर केले जाणारे अत्याचार, मानवी वस्तीतल्या त्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या विषारी हत्या यांविरुद्ध त्यांनी राज्यसभेत आवाज उठविल्यामुळे १९६० साली भारत सरकारने ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट’ हा कायदा मंजूर केला व अंमलबजावणीसाठी ‘ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ स्थापन केले. या बोर्डाच्या त्या १९६२ ते १९८६ या काळात अध्यक्षा होत्या.
रुक्मिणीदेवींनी कलेमध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाकरिता तसेच त्यांच्या सामाजिक कार्याकरिता त्यांना अनेक पुरस्कारांनी भूषविण्यात आले. भारत सरकारचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार (१९५६); संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९५७); संगीत नाटक अकादमीची फेलोशिप (१९६७) व मध्य प्रदेश सरकारचा ‘कालिदास सन्मान’ इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. तसेच ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचा ‘प्राणिमित्र’ पुरस्कार (१९६७); विश्वभारती विद्यापीठाचा ‘देशिकोत्तमा’ पुरस्कार (१९७२); रॉयल सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू ॲनिमल्स, लंडन या संस्थेचे क्वीन व्हिक्टोरिया रजत पदक; दि वर्ल्ड फेडरेशन फॉर प्रोटेक्शन ऑफ ॲनिमल्स, हेग यांचा ‘ॲडिशन टू द रोल ऑफ ऑनर’ हा पुरस्कार व भारत सरकारच्या राज्यसभेचे सन्माननीय सभासदत्व (एप्रिल १९५२ ते एप्रिल १९६२) इत्यादी मानसन्मान त्यांना लाभले.
रुक्मिणीदेवींचे चेन्नई येथे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. १९८७ साली भारतीय टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसारित केले. २००४ साली त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जगभरातील त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘कलाक्षेत्र’मध्ये व इतर ठिकाणी एकत्र जमून गायन-वादनाचे कार्यक्रम, व्याख्याने, परिषदा आणि कलोत्सव साजरे केले. तसेच नवी दिल्ली येथे ललित कला गॅलरीत त्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून त्यांचे समग्र चरित्र मांडण्यात आले. भारतीय नृत्य इतिहासकार व समीक्षक सुनील कोठारी लिखित, संपादित व आर. वेंकटरमण यांच्या प्रस्तावनेसह रुक्मिणीदेवींचे Photo Biography of Rukmini Devi हे छायाचित्र-चरित्र राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले (२००४). २०१६ साली त्यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त व २०१७ साली आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘ गुगल’ने त्यांचे ‘डूडल’ (Doodle – रेखाचित्र) प्रसृत करून त्यांच्या कार्याला मानवंदना दिली.
संदर्भ :
- Dwivedi, Richa, Bharatnatyama, Allahabad, 2013.
- Meduri,Avanthi, Rukmini Devi Arundale (1904-1986) : A Visionary Architect of Indian Culture and the Performing Arts, Delhi, 2005.
समीक्षण : सुधीर पोटे