आंध्र प्रदेशातील एक अभिजात नृत्यनाट्यप्रकार. कृष्णा जिल्ह्यातील कूचीपुडी गावातील नर्तकांनी ही नृत्यपद्धती रुढ केली म्हणून तिला कूचिपूडी नाव पडले. सर्वांत जुने शिवलीलानाट्यम्‌, दहाव्या शतकानंतरची ब्रह्ममेळा  आदी धार्मिक नृत्यनाट्ये आणि मध्ययुगीन वैष्णव भक्तिकाळातील भागवतमेळे यांच्या परंपरेत हा नृत्यप्रकार मोडतो. आंध्र प्रदेशात संगीत-नृत्य करणाऱ्या भगवद्भक्तांना ‘भागवतलु’ असे म्हणत व पुढे त्यांचे नृत्यनाट्‌य कूचिपूडी म्हणून ओळखले जाऊ लागले. कूचिपूडी आणि ‘भागवतमेळा’ यांत साधर्म्य आढळते; तथापि कूचिपूडी नृत्यास वडीलकीचा मान दिला जातो. मुचपळ्ळी कैफियत (१५०३) ह्या ग्रंथात ह्या नृत्यनाट्याचा प्रारंभीचा उल्लेख आढळतो.

नृत्यमुद्रा

सिद्धेंद्र योगी कूचिपूडी नृत्याचे जनक मानले जातात. ते नाट्यशास्त्र, अभिनयदर्पण  रसमंजिरी  या ग्रंथांचे धडे देत असत. कूचिपूडी नृत्यात शिस्तबद्धता व सुसूत्रता आणण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. त्यांनी पारिजात अपहरण  अथवा भामाकलापम्‌  ह्या नावाने नृत्यनाट्य लिहिले; पण त्याचा प्रयोग करण्यासाठी त्यांना योग्य नर्तक मिळाले नाहीत. म्हणून ते आपल्या सासुरवाडीत कुचेलापुरम्‌ येथे आले व तेथील ब्राह्मण मुलांच्या साहाय्याने त्यांनी पहिला प्रयोग केला. तसेच तेथील प्रत्येक ब्राह्मण कुटुंबातील पहिल्या मुलाने कूचिपूडी नृत्यातील सत्यभामा हे पात्र एकदा तरी केलेच पाहिजे, असा दंडक त्यांनी घालून दिला. त्यावेळेपासून दरवर्षी धार्मिक उत्सवात हे नृत्य करण्याची प्रथा आसपासच्या खेड्यांमधूनही पसरली.

कूचिपूडीच्या उदयापूर्वी आंध्र प्रदेशात देवदासींच्या नृत्याची प्रथा रूढ होती. तथापि, कालांतराने ह्या देवदासी कुमार्गाला लागल्या व त्यांच्या नृत्यामध्ये उत्तनता आली. त्यामूळे कूचिपूडी नृत्याची विशुद्धता व पावित्र्य राखण्यासाठी सिद्धेंद्र योगींनी स्त्रियांना त्यात भाग घेण्यास मज्जाव केला. त्यामुळे पूर्वी ह्या नृत्यपद्धतीमध्ये पुरुष नर्तकच भाग घेत असत; मात्र नंतरच्या काळात स्त्रियाही सहभागी होऊ लागल्या व पुरुषांचे वेष परिधान करून त्यांनाही नृत्य करण्याची संधी मिळू लागली. ह्यासाठी वेदांत लक्ष्मीनारायण गुरूजी यांचे विशेष योगदान होते. १६७५ मध्ये हे नृत्य बघून गोवळकोंड्याचा नबाब अब्दुल्ला कुतुबशाह खूष झाला व त्याने नर्तकांना त्यांचे राहते गाव कूचिपूडी व आसपासच्या गावांची  ६०० एकर जमीन इनाम म्हणून दिली.

नृत्यमुद्रा

नारायण तीर्थ ह्यांनी लिहिलेली कृष्ण लीलातरंगिणी (सु. १६८०-९०) ही नृत्यसंगीतिका त्यांचे शिष्य सिद्धेंद्र योगी यांनी कूचिपूडी नर्तिकांना शिकविली. ह्या संगीतिकेत कृष्णाच्या जन्मापासून विवाहापर्यंतचा कथाभाग आलेला आहे. काही गीतांच्या शेवटी नृत्तबोलांवर आधारलेली नृत्ये करतात. ही नृत्यसंगीतिका फार मोठी असल्याने काही निवडक भाग स्वतंत्रपणे सादर केले जातात. ह्याखेरीज क्षेत्रय्याची पदे, रमैय्या शास्त्री ह्यांची ‘गोल्लकलापम्‌’ रचना, त्यागराज ह्यांच्या कृती अथवा नृत्यगीते, तसेच महाकाव्ये व पुराणे, विशेषत: भागवतपुराण  व जयदेवाच्या गीतगोविंदातील अष्टपद्या इत्यादी साहित्यावर आधारलेली कूचिपूडी नृत्येदेखील सादर केली जातात.

कूचिपूडी नृत्यनाट्य चांदण्या रात्री देवळाच्या आवारात करण्याची प्रथा होती. प्रेक्षकांची जास्त गर्दी असल्यास रस्त्याच्या एका टोकाला रंगमंच उभारून तेथे नृत्य केले जात असे. रंगमंचाला पडदा नसे. नृत्यनाट्य सुरू होण्यापूर्वी हास्यगाडूचा (विदूषकाचा) प्रवेश असे. तो वेडीवाकडी तोंडे व अंगविक्षेप करून हसवून लोकांचे लक्ष रंगमंचाकडे वेधून घेत असे. सामान्यत: गायक व वाद्यवृंद रंगमंचाच्या उजव्या बाजूस बसतात. वाद्यामध्ये टाळ, मृदंग, व्हायोलीन, वीणा आदींचा समावेश असतो. नृत्याच्या प्रारंभी नाट्यवेद विधीची रागतालयुक्त प्रार्थना केली जात असे. नंतर सूत्रधार प्रवेश आणि नांदी गाऊन नृत्यनाट्याच्या आशयाचे विवरण करत असे. नृत्यातील प्रमुख पात्रे ‘दरूवु’ ह्या नावाने ओळखले जाणारे पात्रपरिचयपर नृत्य करतात. ह्या प्रकारात दोन स्त्रीवेषधारी सेवक चक्र, वैष्णवनाम व शंख ह्यांची चित्रे असलेला पडदा प्रेक्षकांसमोर अशा रीतीने धरतात, की पडद्यामागील नर्तकाचे फक्त डोके व पायच प्रेक्षकास दिसू शकतात. प्रसंगी सूत्रधाराच्या उपरण्याचाही पडदा म्हणून वापर केला जात असे. प्रत्येक प्रमुख पात्र ह्या पडद्याआड प्रारंभी नृत्य करते व नाट्यमय रीतीने तो पडदा दूर केल्यानंतर ते पात्र प्रेक्षकांसमोर येऊन आपले नृत्यकौशल्य प्रकट करते. हावभावांवरून नर्तक कोणती भूमिका करीत आहे, हे प्रेक्षक ओळखू शकतात. सूत्रधार दरूवुचे बोल, जाती, पात्र प्रवेशाच्या आद्यंती बोलले जाणारे ‘कनुगोलू’ बोल म्हणतो व त्यावर नर्तक पात्रानुक्रमे प्रवेश करून नृत्य करतात. दरूवुचे अनेक प्रकार आहेत. ‘ध्रुवा प्रवेशिका ध्रुवा’ प्रकारात पात्र गाणे गाऊन स्वत:ची ओळख करून नृत्य करते. प्रत्येक कूचिपूडी नर्तकास गायनाचे अंग असावे लागते. हल्ली कित्येकदा नर्तक गीतास प्रारंभ करून बाकीचे गायन सूत्रधारावर किंवा त्याला साथ करणाऱ्या अन्य गायकांवर सोपवितात. क्वचित एखादी ओळ नर्तक मध्येच गातो किंवा गाण्याचा अविर्भाव करतो. कूचिपूडी नृत्यासाठी कर्नाटकी पद्धतीच्या रागतालयुक्त संगीताचा वापर केला जातो. या संगीतामध्ये एकूण सात तालांचा समावेश असून मार्गी व देशी रागांमध्ये संगीत तालबद्ध केले जाते. नर्तक कथानकातील गद्य संवाद स्वत:च म्हणतो. ज्यात पात्रे पद्यात्मक वाचिक अभिनय करतात. अशी ही एकमेव भारतीय नृत्यपद्धती आहे. हल्ली मात्र हे संवाद प्रेक्षकांना नीट ऐकू यावेत म्हणून ध्वनिक्षेपकावर संवादासाठी वेगळ्या व्यक्तीची योजना केली जाते. कूचिपूडी नर्तकास तेलुगू व संस्कृत या भाषाही चांगल्या अवगत असाव्या लागतात. त्याचप्रमाणे नृत्य-संगीतविषयक साहित्याचेही ज्ञान असणे आवश्यक असते. कूचिपूडीच्या अभ्यासासाठी पाठ्यपुस्तक म्हणून अभिनयदर्पणाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे नाट्यशास्त्र, संगीत रत्नाकर ह्यांचाही अभ्यास केला जातो. कथानकात अनेक संकीर्ण नृत्यप्रकार आहेत. त्यांतील बरेच नृत्यप्रकार अलीकडच्या काळात एकल पद्धतीने सादर केले जातात. कूचिपूडी हा नृत्यप्रकार परंपरेनुसार नृत्य, नाट्य व नृत्त या पक्षामध्ये (प्रकारामध्ये) सादर केला जातो.

विविध नृत्यनाट्यमुद्रा

परंतु अलिकडे मात्र नाट्य पक्ष कमी होत आहे व पूर्वी नृत्याची सुरुवात सूत्रधाराच्या प्रवेशाने होत असे. तो स्वत: नृत्यकथा समजावून सांगत असे. पात्रपरिचय गाण्याद्वारे करून देत असे. सूत्रधाराचे पात्र नाट्यरचनेमध्ये सर्वांत महत्त्वाचे मानले जाई. अलिकडे हे पात्र नृत्य कलाकारांनीच करण्याची पद्धत रुजू झाली आहे. कूचिपूडी नृत्यप्रकारातील रचना अनुक्रमे सादर केल्या जातात. देवदेवतांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. पूर्वी फक्त गणेश वंदना सादर होत असे; परंतु आता इतर देवदेवतांच्या वंदनेनेही सुरुवात केली जाते.

कूचिपूडीचे काही नृत्यप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१) जिस्वरम्‌ : बोल किंवा जाती. अर्थ नसलेल्या शब्दांना लयात्मक संगीतबद्ध करून आंगिक अभिनयाद्वारे हा नृत्य प्रकार सादर केला जातो. हा नृत्यप्रकार नृत्तपक्षात केला जातो.

२) शब्द‌म् : विशिष्ट संगीत शैलीनुसार गायले जाणारे, एखाद्या नाट्यप्रसंगावर आधारलेले काव्य. ह्यातील रचना नृत्याभिनयास पोषक असते. उदा. दशावतार शब्दम्. ह्यामध्ये विष्णूच्या दहा अवतारांचे काव्यमय वर्णन असून त्यानुसार नर्तक ते दहा अवतार नृत्यांकित करतो. रामायण शब्दम्‌, प्रल्हाद शब्दम्, चामुंडेश्वर शब्दम्‌ असे अनेक शब्दम् प्रस्तुत केले जातात.

३) कलापम्‌ : या प्रकारात वादविवादात्मक, तत्त्वज्ञानात्मक, विविध चर्चायुक्त आशयांच्या काव्यरचना नृत्यबद्ध केल्या जातात. उदा. गोल्लकलापम्‌. या प्रकारात ब्राह्मण व गौळण ह्यांच्यात तात्विक संवाद आहे. भामाकलापम्‌ हे नृत्यनाट्य विशेष लोकप्रिय असून त्यातील सत्यभामा या पात्राद्वारे रंगमंचावर प्रवेश करण्याची पद्धत आजही दिसून येते. हा नृत्यप्रकार नाट्यपक्षात सादर केला जातो.

पदम्‌ म्हणजे पद. सारी प्रकृती स्त्रीरूप असून परमेश्वर हा एकमेव पुरूष आहे. परमपुरूषात लीन होण्यातच प्रकृतिरूपी स्त्रीचे साफल्य आहे, अशा आशयाची अनेक पदे लिहिली गेली आहेत. क्षेत्रय्याने लिहिलेल्या हजारो पदांपैकी नायकनायिकांचे अलंकारप्रचुर वर्णन असलेली सुमारे ६०० नृत्यनाट्योपयोगी पदे अत्यंत प्रसिद्ध आहेत व ती आज देखील भरतनाट्यम्‌ शैलीतील मान्यवर कलावंत कूचिपूडीच्या धर्तीवरच करतात.

यानंतर जावली, श्लोक, कीर्तन (त्यागराज, अनमाचर कीर्तन) अशा नृत्याभिनयाच्या नृत्यरचना सादर केल्या जातात. नृत्यप्रस्तुतीच्या शेवटी तरंगम्‌ सादर केले जाते. या प्रकारात एखाद्या विशिष्ट आराध्यदेवतेच्या लीलांचे वर्णन लाटातरंगांप्रमाणे विविधप्रकारे केले जाते. बालगोपाल तरंगम् ह्या प्रकारात परातीच्या कडेवर दोन्ही पाय ठेवून किंवा उपड्या घड्यावर उभे राहून व डोक्यावर पाण्याचा घडा ठेवून, तो पडू न देता नृत्य केले जाते. यानंतर तिल्लाना, अष्टपदी ह्या नृत्यरचनांचा समावेश असतो.

कूचिपूडी नृत्यामधील पात्रांची रंगभूषा साधीच असते. नृत्यकलाकार ते स्वत:च करतात. कूचिपूडीमध्ये वेशभूषा ही भूमिकेच्या आवश्यकतेनुसार केली जाते. पुरूष पात्रे धोतर, जाकीट व आवश्यकतेनुसार दागदागिने, मुकूट इत्यादी परिधान करतात. स्त्री पात्रांचा वेश साडीचोळी असा असतो. स्त्री पात्रे सोन्याचे किंवा सोन्याचा मुलामा असलेले दागिने वापरतात. कानात झुमका, ओडिनयम्‌ (कंबरपट्टा), नाकात नथनी, गळ्यात मोठी माळ, छोटी माळ, दंडामध्ये वाकी ह्या दागिन्यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. तसेच लांब सोडलेल्या वेणीवर जी दशावतारजडा किंवा नक्षत्रजडा जडविलेली असते. तिला प्रतीकात्मक अर्थ आहे. जडेचा वरील भाग चार अलंकारांनी युक्त असून तो चार वेदांचे प्रतीक मानला जातो. जडेखालील तीन चेंडू त्रिभुवनाचे प्रतीक, तर प्रत्येक चेंडूभोवती लहानलहान चेंडू असतात. ते नवग्रहांचे प्रतीक मानले जातात. ही वेणी गंगावनाचीही असू शकते. त्यावर फुलांचा गजरा माळतात.

कूचिपूडी नृत्यप्रकारातील प्रमुख नर्तक-नर्तकींमध्ये लक्ष्मी नारायण शास्त्री, वेदांतम्‌ राधेश्याम गुरूजी, वेंपटी चिनना सत्यम्‌, चिंता कृष्णमूर्ती, इंद्राणी बाजपायी (रेहमान), राजा व राधा रेड्डी, रागिणी देवी, पद्मश्री शोभा नायडू, उमा रमाराव, स्वप्ना सुंदरी, जोनाला जड्डा, अनुराधा, यामिनी कृष्णमूर्ती आदींचा अंतर्भाव होतो.

 

समीक्षक : केतकी ठकार-वाडेकर