भारतातील दीर्घकाळ चालू असलेले महत्त्वपूर्ण संगीतविषयक मासिक. उत्तर प्रदेशातील हाथरस या गावी हिंदी साहित्यातील प्रख्यात हास्य-व्यंग्य लेखक हाथरसी काका (मूळ नाव प्रभुलाल शिवलाल गर्ग) यांनी संगीताच्या आवडीतून ‘गर्ग अँड कंपनी’ या नावाने संस्था स्थापन केली (१९३२). त्यानंतर १९३५ साली संगीत पत्रिका हे मासिकही सुरू केले. या दोन्हींच्या माध्यमातून त्यांनी आपल्या हास्य-व्यंग्य रचनांद्वारे तत्कालीन वाईट प्रथा, स्वार्थांधता, भ्रष्टाचार अशा अनेक गोष्टींवर आसूड ओढले. तत्कालीन दरबारी व धार्मिक वातावरणात अडकलेल्या संगीताला मोकळा श्वास दिला. तसेच तराणा, ठुमरी, धृपद-धमार अशा रचनांबरोबरच लोकसंगीत, गीत, गझल, कव्वाली यांसारख्या संगीतप्रकारांना लोकप्रिय करण्याचे कार्य त्यांनी केले.
भारतात त्या काळात उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काका हाथरसींनी शास्त्रीय संगीतात नवजीवन फुंकण्याचे व ते पुनरुज्जीवित करण्याचे मोठे काम केले. त्याला एक लेखनकलेचा विस्तृत मंच देऊन ते ज्ञान, माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग शोधला. त्यासाठी संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, उर्दू भाषेतील महान कलाकार व राजवटी यांनी संगीतात केलेल्या कामाचा शोध घेऊन ते एकत्रित केले. हे ज्ञान सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत लिहून काढले. हा ठेवा घराघरात पोहोचावा व संगीत रसिकांच्या जीवनाचा एक अभिन्न हिस्सा बनावा, यासाठी संगीत पत्रिका हे मासिक सुरू करण्यात आले. याचा उद्देश सफल होऊ लागला. शास्त्रीय संगीतातील बारकाव्यांची विस्तृत माहिती, शास्त्रीय संगीताचे विस्तृत ज्ञान, सोबत धृपद, धमार, ख्याल, भजन, गजल, ठुमरी, तराणा, कव्वाली, लोकसंगीत, ताल, नृत्य आणि चित्रपट संगीत या सर्वच विषयांची माहिती या मासिकातून दिली जाते. त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
संगीत पत्रिकेतील एक सदर विशेष आहे. ते म्हणजे चित्रपटातील गाण्यांचे स्वरलेखन (नोटेशन) छापणे. याचे कौतुक वाचकांनाही आहे. या गाण्यांच्या स्वरलेखनामुळे गायकांना गाणी उत्तमप्रकारे बसवता येतात व थोडेफार संगीत शिकलेल्यांना ती म्हणताही येतात. यात वाद्यांचे अंश पण घातलेले असतात. त्यामुळे वाद्यवृंदसंचाला ती वाजवण्यास सोपी जातात.
या मासिकाची भाषा केवळ हिंदी असून वाचकांना मासिकात शुद्ध स्वरूपातील हिंदी भाषा वाचायला मिळेल. हिंदी मातृभाषा नसणाऱ्यांना पण समजणाऱ्यांना, थोडे बोलू शकणाऱ्यांना तिचे आकलन तर होतेच आणि विचारात समृद्धताही येते. संपूर्ण भारतात व विशेषकरून उत्तर भारतात मोठा वाचकवर्ग या मासिकाने तयार केलेला आहे. हाथरसी काका यांच्यानंतर डॉ. लक्ष्मी नारायण गर्ग हे या मासिकाचे प्रधान संपादक होते. त्यांनी बरीच वर्षे याच्या संपादकपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. आता डॉ. मुकेश गर्ग हे प्रधान संपादक आहेत. राजेंद्र कृष्ण अग्रवाल, कैलाश पंकज श्रीवास्तव आणि उमा नेगी या संपादकीय मंडळात कार्यरत आहेत.
हिंदी भाषेतून हे मासिक संपादित असल्याने जे काम महाराष्ट्रात संगीत कला विहार या मासिकाने केले; तेच व तसेच कार्य संगीत पत्रिकेनेही केलेले दिसून येते. संगीत पत्रिका हे प्रकाशन वर्गणीदारांची वार्षिक वर्गणी व जाहिरातदारांच्या जाहिरातीतून आलेल्या पैशांवर चालत आहे. आजमितीस अशा प्रकारच्या मासिकांची आवश्यकता तर आहेच; पण कमतरताही आहे. त्याला एक कारण परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. संगीत कला जोपासणाऱ्या सामान्य वर्गाची संख्या वाढती आहे; पण अशा मासिकांच्या वर्गणीदारांची संख्या म्हणावी तशी वाढती नाही. तंत्रज्ञानातील क्रांतीही या बदलाला कारणीभूत आहे. अशा प्रतिकूल काळातही या मासिकाने आपली ओळख विविधप्रकारे जपून ठेवलेली आहे. याला वाचकांचीही साथ हवी आहे.
समीक्षण : सुधीर पोटे