संगीताचा प्रचार आणि प्रसार यासाठी कार्यरत असणारे जुने मासिक. हे मासिक हिंदी, मराठी व गुजराती या तीनही भाषांतून प्रसिद्ध होत असून ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचा एक नियमित उपक्रम आहे. संगीतकलेचा विचार करता मुद्रणकलेचा शोध संगीतकलेला खूप पोषक ठरला. भारतातील बदललेल्या संगीताच्या इतिहासाच्या नोंदी सांभाळून त्या अनेकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम त्यामुळे भारतात झाले. त्यामध्ये संगीत पत्रिकासंगीत कला विहार या दोन मासिकांचा बहुमोल वाटा आहे.

संगीत कला विहार मासिकाचे मुखपृष्ठ

संगीत साहित्याची आवश्यकता व महत्त्व गायनाचार्य पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी जाणले. त्यांचे गुरु गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी हा विचार शिष्यात उतरवला व आधुनिक भारतीय जगतात आणि प्रस्थापित भाषेत संगीत साहित्य निर्मितीला सुरुवात झाली. संगीत कला विहार हे मासिक या बाबतीत मैलाचा दगड ठरले. याची पार्श्वभूमी साधारण अशी की, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी मराठी भाषेतून प्रसिद्ध होणारे संगीत दर्पण (१९०१) नावाचे मासिक सुरू केले होते; पण ते फार काळपर्यंत चालले नाही. त्यानंतर गायनाचार्य पलुस्कर यांनी संगीतामृत प्रवाह हे मासिक हिंदी व मराठी या दोन भाषांमध्ये चालवले. ते लाहोर येथे १९०५ साली सुरू झाले, नंतर ते १९०९ पासून मुंबईतून प्रकाशित व्हायला सुरुवात झाली; मात्र नंतर तेही बंद झाले. हे मासिक त्यांनी स्थापन केलेल्या गांधर्व महाविद्यालय या संस्थेमार्फत प्रसिद्ध केले जात होते. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्याच काही दिग्गज व मातब्बर शिष्यमंडळींनी संगीतप्रसाराचे काम पुढे चालू ठेवण्याचा निर्धार करून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ ही संस्था स्थापन करून तिचे मुखपत्र म्हणून संगीत कला विहार हे मासिक १९४७ साली दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू केले ते आजतागायत निर्विघ्नपणे चालू आहे. त्यात हिंदी व मराठी विषयक साहित्य मोठ्या प्रमाणात तर गुजराती साहित्य कमी प्रमाणात असते.

संगीत कला विहार या मासिकाचे मूळ संस्थापक पं. शंकरराव व्यास आणि संपादक बी. आर. देवधर हे होते. देवधर मास्तरांकडे अभ्यासपूर्ण लेखन, विचारांची उत्तम मांडणी व माहिती देत असतानाचे धैर्य इत्यादी कौशल्ये उपजतच होती. त्याचा वापर या कार्यात करून त्यांनी संगीताचे कलाकार, जाणकार, कलारसिक यांना जवळ आणण्याचे काम प्रयत्नपूर्वक केले. जोडीने अ. भा. गां. वि. मंडळाने देशभरात प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशानेही वेगवेगळे कलासाहित्य या मासिकातून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. १९७० पर्यंतच्या सुरुवातीच्या कालखंडाचा विचार करता या मासिकाने मोठा सांगीतिक कार्यभार पार पाडला. या मासिकातून मातृभाषेत ज्ञान मिळते हा भाग वाचकांच्या व अभ्यासूंच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. संगीतविषयक ज्ञानप्रसार, विचारांची देवाण-घेवाण, व्यक्ती परिचय, लोकसंग्रह विशेषत्वाने वाढवण्याचे काम याद्वारे झाले. संगीताच्या ज्ञानप्रसाराचे एक महत्त्वाचे व प्रभावी माध्यम म्हणून याला मान्यता व प्रतिष्ठा मिळाली.

संगीत कला विहार या मासिकातून गायन, वादन, नृत्य या तीनही विषयांवर लेखन प्रसिद्ध होते. यातील संगीतक्षेत्राशी संबंधित इतिहास, व्यक्तीविशेष, ग्रंथसमीक्षा, संस्था परिचय, शास्त्र परिचय, नवीन बंदिशी, राग चर्चा, अभिनंदन, दुःखद निधन, संलग्न संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे वार्तांकन, व्यंगचित्रे इत्यादी सदरे नियमित आहेत. या मासिकाची त्रैवार्षिक संमेलन, शिक्षक मेळावे, आकाशवाणीचे प्रसारण इत्यादीविषयक माहिती तसेच वाचकांचा पत्रव्यवहार, गायक-वादकांच्या रंजक, उद्‌बोधक आठवणी ही सदरेही आकर्षक ठरली. संपादकीयमध्ये संगीतविषयक एखादा उत्तम विचार घेऊन त्यावर लिहिले जाते. बहुतांशी सार्वजनिक संस्थांना जो निधीचा प्रश्न भेडसावतो तो येथेही आहे. त्यातून संस्था मार्गक्रमण करीत आहे.

या मासिकाचे संपादकपद बी. आर. देवधर, वि. रा. आठवले, गंगाधर राव तैलंग, बलवंत जोशी, रघुनाथ केसकर, दिग्विजय वैद्य, मो. वि. भाटवडेकर, चारुशिला दिवेकर, सुधा पटवर्धन, माधवी नानल, वर्षा नेने इत्यादी संगीत क्षेत्रातील नामवंतांनी भूषविले आहे. या मासिकाचे एक फलित की यामुळे महाराष्ट्रात संगीतविषयक सकस साहित्य व लेखक निर्माण झाले. हिंदी संगीत कला विहारमुळेही उत्तर भारतात काही लेखक मंडळी तयार झाली. संगीत कला विहारचा वाचक व वर्गणीदार भारताशिवाय परदेशातही आहे; पण याचबरोबर सध्या आत्मियता वाटणारे वाचक, सभासद, संपादक यांची वानवा हळूहळू या मासिकास जाणवत आहे.

समीक्षण : सुधीर पोटे