पै, रत्नाकर शांताराम : (१७ ऑगस्ट १९२८—९ ऑगस्ट २००९). हिंदुस्थानी रागदारी संगीतामधील, विशेषतः जयपूर घराण्याच्या संदर्भातील, एक वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी असलेले कलाकार. यांचे मूळ नाव आत्माराम. रतन पई या नावाने देखील ते परिचित होते. मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांना भावगीतगायक रानडे यांच्याकडून प्रारंभिक तालीम मिळाली. त्यानंतर जयपूर घराण्याचे व्यासंगी गायक आणि गुरू मोहनराव पालेकर यांच्याकडून त्यांनी १९४१ ते १९६२ अशी दीर्घकाळ तालीम घेतली. याचवेळी ते महाविद्यालयीन शिक्षणही घेत होते. जयपूर घराण्याची पेचदार आणि अनवट गायकी पालेकरांनी अतिशय निगुतीने त्यांना दिली. बी.कॉम. पदवी मिळाल्यानंतर फोर्ब्स अँड फोर्ब्स कंपनीमध्ये रत्नाकर पै यांनी नोकरी धरली. नोकरीसोबत गायनाचा व्यासंग त्यांनी उत्तमरीतीने जोपासला. पालेकरांच्या निधनानंतर पै यांना अल्लादियाखाँ साहेबांचे शिष्य गुलुभाई जसदनवाला यांच्याकडून १९६४ ते १९८० अशी दीर्घकाळ सोळा वर्षांची तालीम मिळाली आणि त्यांच्याकडील अनवट राग, बंदिशी यांच्या संग्रहात मोलाची भर पडली. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात जयपूर घराण्याचे उस्ताद म्हणूनही ते कार्यरत होते.

जयपूर घराण्याच्या दोन समांतर प्रवाहांचा संगम रत्नाकर पै यांच्या गायनात दिसून येतो. अत्यंत अचूकपणे बंदिश भरून ख्यालाचा विस्तार, स्वरांचा अचूक वेध घेणारा आवाज, लयीवर वैशिष्ट्यपूर्ण हुकूमत आणि अनेक अनवट रागांच्या बंदिशींचा भरदार संग्रह आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होत. राग नट आणि त्याचे प्रकार (शुद्ध नट, भूप नट, नट कामोद, नट केदार), बहार आणि त्याचे प्रकार (बसंत बहार, भैरव बहार, जौन बहार, हिंडोल बहार), कानड्याचे प्रकार, गौरीचे प्रकार, पंचमचे प्रकार, गोधनी, दीपकी इत्यादी अस्सल जयपूर घराण्याचे अनेक राग ते सहजतेने सादर करीत असत.

१९९५ साली महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार रत्नाकर पै यांना मिळाला. तसेच २००१ साली आयटीसी संगीत रिसर्च अकादमीचे पारितोषिक मिळाले. आकाशवाणीवर ते ‘ए’ ग्रेड कलावंत होते. एक समर्थ गुरू या नात्याने त्यांनी नरेंद्र कणेकर, भालचंद्र टिळक, भालचंद्र पाटेकर, अश्विनी भिडे-देशपांडे, विश्वास शिरगावकर, आदित्य खांडवे, शाल्मली जोशी, ज्योती काळे, ज्योती खरे-यादवार, मिलिंद मालशे आदींना गायनाची तालीम दिली. त्यांचा गायनाचा वारसा त्यांची ही शिष्य मंडळी पुढे चालवत आहेत. रत्नाकर पै यांना विश्वनाथ, उत्तम हे पुत्र आणि छाया ही कन्या आहे.

रत्नाकर पै यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी मुंबईत निधन झाले.

समीक्षण : सुधीर पोटे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.