हिंदुस्थानी संगीतातील एक गायक घराणे. याला बडे मियाँ घराणे असेही संबोधले जाते. ख्याल संगीत विश्वामधील एक महत्त्वपूर्ण असे घराणे. आज जरी हे घराणे नामशेष झाले असले तरी एकेकाळी याच्या एका बाजूला ग्वाल्हेर घराणे तर दुसऱ्या बाजूला अल्लादियाखाँसाहेब असे चित्र दिसत असे. या घराण्याची परंपरा पहिली तर ग्वाल्हेर प्रमाणे हे घराणे थेट सदारंगपर्यंत जाऊन भिडते आणि महतीनुसार प्रसिद्ध गायक अल्लादियाखाँसाहेब या घराण्याला मातुल घराण्याचा मान देत असत. एकोणिसाव्या शतकात प्रसिद्ध गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी हिंदुस्थानी संगीत पद्धतीची गंगा महाराष्ट्रात आणली. पण त्या अगोदर सुमारे पन्नास वर्षे गोखले घराण्याच्या गायकीने रसिकांच्या मनात घर केले होते. मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, कागवाड, जमखिंडी या ठिकाणच्या संस्थानिकांनी या गायकीला उदार आश्रय देऊन प्रतिष्ठित केले होते.

महादेवबुवा गोखले हे या घराण्याचे आद्य पुरुष. यांचे पूर्वज विजयदुर्ग जवळच्या खोल या गावाचे. खोल येथेच महादेवबुवांचा १८१३ साली जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षी बुवा मिरज येथे आले. तत्कालीन पटवर्धन सरकारांच्या पदरी असलेल्या गवयाकडून त्यांना तालीम सुरू झाली. १८३० पर्यंत तेथे राहिल्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी ते सातारा येथे गेले. सातारा संस्थानातील बापूसाहेब बुधकर या धृपदियाकडे महादेवबुवांची तालीम सुरू झाली. बुधकर बुवा हे अब्दुल्ला खान यांचे शिष्य होते. हा योग काही फार काळ टिकला नाही, कारण १८३९ साली सातारा गादीच्या प्रतापसिंह यांना पदच्युतकेले आणि त्यांना व त्यांच्या परिवाराला कैद करून तडक काशी येथे नेले. त्या परिवारात बुधकर बुवा देखील होते. या अस्थिर परिस्थितीत महादेव बुवांच्या कानावर हैदराबाद येथील गायक जैनुल खान यांची तारीफ आली आणि बुवा त्यांच्यापाशी आले आणि त्यांची रीतसर तालीम सुरू झाली. सुरुवातीला अनेक महिने यमन रागाचीच तालीम झाली. गायकी पक्की चढली असे खाँसाहेबांच्या लक्षात आल्यावर मात्र नंतर तालमीने वेग घेतला आणि अवघ्या सहा महिन्यांत जवळपास दोनशे बंदिशी त्यांनी सांगितल्या. महत्त्वाचे म्हणजे उपज गायकीचे अंग त्यांनी व्यवस्थित समजावून घेतले. रागविस्ताराबरोबरच मधुर आलापी आणि जोरकस ताना ही दोन्ही अत्यावश्यक अंगेही महादेवबुवांनी उत्तम आत्मसात केली. जैनुल खान यांचे गायकीबरोबरच बंदिश रचनेचे, काव्याचे देखील वैशिष्ट्य होते. हिंदी,उर्दू भाषेवरील त्यांचे प्रभुत्व असामान्य असल्याने गायकीतील स्वरांकन आणि शब्दांकन यात देखील महादेवबुवा पारंगत झाले. हे लिखाण त्यांनी खाँसाहेबांकडून नेमकेपणाने उतरून घेतले. ते पुढे १९३५ साली इंगळे बुवांनी गोखले घराने की गायकी या नावाने छापून प्रसिद्ध केले. ती बडे मियाँ यांचीच गायकी होती. गोखले घराणे हे नाव नंतर पुढे जोडले गेले. सुमारे बारा वर्षे ही तालीम चालली.

या घराण्याची गायकी ही श्रेष्ठ दर्जाची होती. अत्यंत शुद्ध, सूक्ष्म आणि सौंदर्यलक्षी अशी ही गायकी जरी ख्यालाची होती, तरी धृपद धमारासारखी वजनदार आणि भारदस्तही होती. छातीमधून उपजणाऱ्या गमकेच्या ताना, स्थायी, अंतरा यांची बांधेसूद मांडणी, उपज अंगाने होणारे रागाविस्ताराचे सौष्ठवपूर्ण स्वरूप असे या गायकीचे मनोहर रूप होते. शिवाय या गायकीत दोन अंगे प्रामुख्याने दिसत असत. एक म्हणजे मींड घेऊन केलेली शांत आलापी आणि दुसरे म्हणजे गमक अंगाच्या टप्प्याच्या गतीने जाणाऱ्या वजनदार ताना. या घराण्याच्या आवाजाची एक विशिष्ट जात होती. ती सर्व गायकांमध्ये सारख्या प्रमाणात दिसून येई. पण ही विद्या आपल्या घराबाहेर जाऊ न दिल्याने या घराण्याचा लोप झाला असे मानले जाते. गोखले घराण्यातील बिहागडा, त्रिवेणी, जयताश्री हे राग अल्लादियाखाँसाहेब तयारीने गात असत. ‘बेहागमे अल्हैय्या की रंगत लेके बेहागडा बना’ असे महादेवबुवांनी लिहून ठेवले आहे. ग्वाल्हेर, गोखले आणि अल्लादियाखाँसाहेब या तीन घराण्यांचा असा हा तिपेडी प्रवास आहे. या तीनही घराण्यांचा मूल्य विचार हा एकच दिसून येतो. महादेवाबुवांनी आपल्या लिखाणात ‘कोमल, अर्धकोमल, तीव्र, तीव्रतर अशा सूक्ष्म संज्ञा वापरल्या आहेत. अशी ही अवघड आणि गहन गायकी होती; तथापि त्या घराण्याची रागस्वरूपे ही आजच्या स्वरूपाशी जुळत नाहीत असेही आढळते. बिहाग रागामध्ये दोन निषाद घेणे, देशकार संपूर्ण जातीचा मानणे, असे बरेच मतभेद आहेत.

महादेवबुवांना गणपतीबुवा, विष्णुबुवा, शिवरामबुवा आणि कृष्णाबुवा असे चार सुपुत्र होते. हे चौघेही गवईच झाले. गणपती बुवा आणि त्यांचे चिरंजीव सदाशिवबुवा काही काळ कोल्हापूर संस्थानात कार्यरत होते. विष्णुबुवा यांची ख्याती त्यांच्या उत्तम आवाजाबद्दल होती, तर कृष्णाबुवा हे स्वतंत्रपणे गायनाचा व्यवसाय करीत होते. त्यांनी कोल्हापुरात विश्वनाथबुवा जाधव यांना तालीम दिली.

महादेवबुवांचे वयाच्या ८८ व्या वर्षी १९०१ साली मिरज येथे निधन झाले. त्यांच्यासोबत सर्वप्रथम आलेल्या आणि एकेकाळी महाराष्ट्रभर पसरलेल्या या गायकीचा अस्त झाला.

संदर्भ :

  • स्वामी धर्मव्रत, गोखले अर्थात बडे मियाँ घराणे, कोल्हापूर.

समीक्षण : सुधीर पोटे