काळे, किशोर शांताबाई : (१ जून १९६८ – २० फेब्रुवारी २००७). भटक्या विमुक्त जमातीतील सुप्रसिद्ध आत्मकथनकार आणि कवी.  मराठी साहित्यात शोषित वंचित समूहातील  आत्मकथने अल्पावधीत विशेष प्रसिद्धी पावले आहेत. त्यातली अनुभवाची नाविन्यता आणि भूक, बेरोजगारी आणि सर्व प्रकारच्या शोषणातून उभी होत असलेली व्यवस्था ही वाचकांसाठी नाविन्यपूर्ण आणि अंतर्रामुख करणारी आहे. किशोर शांताबाई काळे हे कोल्हाट्याचं पोर या एका आत्मचरित्राने मराठी साहित्यात अल्पावधीतच प्रसिद्ध पावलेले लेखक होत. किशोर शांताबाई काळे यांचा जन्म नेरले (ता. करमाळे, जिल्हा सोलापूर) येथे झाला. अंबाजोगाई महाविद्यालयात त्यांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतले आणि मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी एम.बी.बी.एस हे वैद्यकीय शिक्षण घेतले. वैद्यकीय शिक्षण घेत असताना मानसिक आणि आर्थिक या प्रकारच्या संघर्षाला त्यांना खूप मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागले.  लहानपणापासून तमाशा कलावंत असणाऱ्या आईच्या आणि  नात्यातील लोकांच्या संघर्षातून त्यांचे व्यक्तिमत्व उभे झाले आहे. उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांची मुलगी संगीता हिच्याशी त्यांचा विवाह झाला. नवी मुंबई नेरूळ येथील तेरणा मेडिकल महाविद्यालयात त्यांनी वैद्यकीय सेवा दिली आहे. साधारणता वयाच्या तिशी मध्ये असताना त्यांनी वैद्यकीय शाखेतील आयुर्वेदिक प्रकारातील औषधांचा अभ्यास सुरु केला होता, जंगलात फिरून ते जडी बुटी गोळा करून त्याप्रमाणे उपचार करत असत.

Kishor Shantabai Kaleकिशोर शांताबाई काळे यांची ग्रंथसंपदा : आत्मकथन : – कोल्हाट्याचं पोर (१९९४), मी डॉक्टर झालो  (१९९५);  नाटक :- हिजडा एक मर्द ( १९९७); कवितासंग्रह ; – आई तुझे लेकरू. साहित्य निर्मितीसाठी एक लक्षणीय प्रकारचे अनुभवविश्व लेखकाजवळ असावे लागते. मराठी साहित्यात दलित आत्मकथने या लक्षणीय आणि विस्मयकारक अनुभवविश्वातून निर्माण झालेली आत्मकथने होत. लावणी कलावंत असणाऱ्या शांताबाई यांच्या पोटी किशोर यांचा जन्म होतो मात्र त्यांना कोणताही जैविक वारसा मिळत नाही. हा संघर्ष खूप मोठा आहे. आपण ज्या समजात जन्माला आलो आहोत ,त्या समाजात स्त्री या घटकाला नरकासमान अवहेलना सहन कराव्या लागतात ,माणूस म्हणून जगण्यापलीकडे केवळ वैषयिक भोगाला त्यांना सामोरे जावे लागते या सर्व अनुभव विश्वातून किशोर शांताबाई काळे यांचे जीवन उभे झाले आहे. आणि ते सर्व जीवन एका प्रामाणिक आणि धाडसी निवेदनातून त्यांनी कोल्हाट्याचं पोर या त्यांच्या आत्मकथनातून मांडले आहे. भटक्या विमुक्त समाजात जगत उदरनिर्वाह चालविण्यासाठी जगण्याचे पर्याय शिल्लकच नसल्याची हतबलता या कथनातून प्रामुख्याने येते. आपण कोण आहोत या जुजबी प्रश्नात न अडकता आई हे आपले प्रधान अस्तित्व या भावनेतून पुढे कठीण असे वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण असे एक आशादायी चित्रही या कथनात येते. कुटुंब आणि समाज या परिघात येणारी स्त्री या कथनाच्या केंद्रस्थानी आहे. भावना आणि भोग यातील केवळ भोग वाट्याला येणे या दुखात ती जीवन जगते हे चित्र या कथनातून प्रकट होते.

गावोगावी नाचगाणी, सर्वसामान्य प्रेक्षकांचे मनरंजन करणे हा कोल्हाटी समाजाचा व्यवसाय आहे. या समाजातील स्त्रियांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पार पाडावी लागते. केवळ नाचगाणे ही कला आणि त्यातून होणारे शारीरिक शोषण अशा संघर्षात या स्त्रिया जीवन जगत असतात. किशोर काळे हे या कोल्हाटी समाजातील शांताबाई नामक महिलेच्या पोटी जन्माला आले, जन्मदाता कोण हे ठाऊक असले, तरी त्याचे नाव लावण्यास मात्र प्रतिबंध होता. किशोर काळे यांच्या आत्मकथनातून अस्तित्त्वाचा हा संघर्ष आला आहे. आपल्या पोटी जन्माला आलेली मुलं,त्यांचा उदरनिर्वाह यासाठी या समाजातील स्त्रियांची होणारी होरपळ किशोर काळे यांनी जगासमोर मांडली आहे. पैसा आणि सत्ता यावर अधिकार असणारे लैंगिकपीपासु लोक अशा स्त्रियांचे शोषण करतात. यातून त्यांना अपत्य होतात. त्या अपत्यांची कोणतीही जबाबदारी प्रसंगी घेतली जात नाही. जेव्हा जगण्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात तेव्हा हे लोक कुठलीही मदत करत नाहीत. अशा विषमतावादी अवस्थेत किशोर काळे यांचे बालपण गेले आहे. वडील, भाऊ अशी पुरुषी मंडळी घरातील स्त्रियांना शोषणाच्या या मार्गावर जाण्यास परावृत्त करतात हे बेदरकार चित्र या आत्मकथनातून आले असल्याने अल्पावधीतच मराठी साहित्यविश्वाचे याकडे लक्ष वेधले गेले. या आत्मकथनात समाजातील एका दुर्लक्षित भागाचेअंगावर काटा उभा करणारे तपशीलवार चित्रण साकार झाले आहे.

वडिलांच्या जागी आईचे नाव लावून एम. बी. बी. एस. पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या किशोर काळे यांच्या पुढल्या वर्षी म्हणजे १९९५ साली त्यांच्या आत्मकथनाचा दुसरा भाग मी डॉक्टर झालो प्रसिद्ध झाला. भटक्या जमातीत जन्मलेल्या पण शिक्षणासाठी एके ठिकाणी स्थिर राहिलेल्या किशोर काळचा वैद्यकीय पदवी प्राप्त होईपर्यंतचा प्रवास दाहक आणि खडतर आहे.मानलेल्या आईजवळ राहून, रात्री बेरात्री शेतावर जाऊन पडेल ती कामे करून, दिवसरात्र श्रम करून किशोर काळे यांनी कोल्हाटी समाजात जन्मलेला पहिला डॉक्टर हे श्रेय मिळवले.

तृतीय पुरुषी जमातीच्या जीवनाचे दर्शन घडविणारा हिजडा एक मर्दहे त्यांचे नाटक १९९७ मध्ये प्रसिद्ध झाले. आई तुझे लेकरूहा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. समाजातील उपेक्षित वर्गाच्या यातनामय जीवनाचे पारदर्शी चित्रण त्यांच्या लेखनात घडते. राजकारणी, समाजकारणी, लब्धप्रतिष्ठित माणसांना या समाजाची फरफट दिसत असली, तरी त्यांची दखल घेण्यास कोणालाच सवड नाही; याचे तीव्र दुःख डॉक्टर किशोर काळे यांनी उराशी बाळगले. समाजासाठी काही करावे, यासाठी अथक धडपड चालू असताना दुर्दैवाने किशोर काळे यांचे अपघातात अवघ्या ३९व्या वर्षी निधन झाले.

संदर्भ : भेण्डे, सुभाष,  वर्तक,चंद्रकांत,  शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य, मुंबई ,२००९ .