गाडेकर , गुणाबाई रामचंद्र : (१९०६ -१६ मे १९७५). गुणाबाई रामचंद्र गाडेकर एक जिद्दी व समाजसेवेला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व. अस्पृश्य मानल्या गेलेल्या चर्मकार समाजात त्यांचा जन्म झाला. चर्मकार समाजातील त्या पहिल्या शिकलेल्या महिला मुख्याध्यापिका होत. १९१८ ला  दुसरी पास झाल्यानंतर वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी आनंदराव मारुतराव वाघमारे (दक्षिण आफ्रिका) यांच्याशी त्यांचा मुंबईत विवाह व याच वर्षी वैधव्य. त्यानंतर धारावी मुंबई येथे इयत्ता सहावीपर्यंतचे शिक्षण, त्यानंतर थर्ड इयर ट्रेड पर्यंतचे शिक्षण पुणे येथे पूर्ण. १९२६ साली सेवासदन सोडून पुण्यातील मंगळवार पेठेतील महारवाडा येथील शाळेत त्या रूजू झाल्या. पुण्यात चांभार विद्यार्थी मंडळाचे काम करत असताना बोर्डिंगला मदत गोळा करण्यासाठी विविध ठिकाणी जाऊन मदत गोळा केली.

या सेवेत असताना दत्तोबा पोवार, विनायक कर्नाटकी व इंदुमती राणीसाहेब यांच्याशी त्यांची ओळख झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस नागपूर येथे घेतलेल्या पहिल्या महिला परिषदेच्या (१९३०) अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला. याच वर्षी श्री रामचंद्र गाडेकर यांच्याशी पुनर्विवाह (१९३०). पुन्हा: अध्यक्षा महिला परिषद ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस नागपूर (१९३६). हरिजन सेवक संघाच्या सदस्य म्हणून त्यांनी सक्रीय कार्य केले. नाशिक येथील काँग्रेसच्या अधिवेशनात दलित परिषदेमध्ये मुलींच्या बोर्डिंग विषयीचा ठराव मांडला व संमत करून घेतला (१९५०). ‘ दलितांचा प्रश्न व स्त्रियांचे कर्तव्य ’ या विषयावर गुणाबाई गाडेकर यांनी पुणे केंद्रातून रेडिओवर भाषण गाजले. दलित वर्गातील विशेषतः त्यांच्या  स्त्रियांतील अज्ञान व वेडगळ कल्पना घालविण्याची व त्यांच्यामध्ये विद्येचा प्रसार करण्याची खरी आणि भरीव कामगिरी स्त्रियाच करू शकतील, उच्च आचार व विचार यांची कल्पना त्या आपल्या नैसर्गिक प्रेमळपणामुळे या वर्गास सहज करून देतील, कुटुंबात स्त्री हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्या सुविद्य व सुगृहिणी झाल्या की कुटुंबे सुधारतील आणि म्हणून कुटुंबे सुधारली की दलित वर्ग हे नाव इतिहास जमा, किंबहुना नामशेषही होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्यास भारतात खरीखुरी लोकशाही नांदेल असा महत्त्वाचा विचार त्यांनी यामधून मांडला.

१९५७ साली पुण्याच्या हवेली विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसच्या उमेदवार होत्या. गुणाबाई गाडेकर यांनी  १९५९ ते १९७४ या काळातील आठवणी स्मृतिगंध या आत्मचरित्रात समाविष्ट आहेत. आत्मचरित्रात गुणाबाईंच्या आयुष्यभराचे संघर्षमय जीवनानुभवावर  समकालीन समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब आहे. चळवळीचा सामाजिक लेखाजोखा आणि समाजशास्त्रीय दस्तावेज म्हणून या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच सामाजिक इतिहासातील महत्त्वाचे संदर्भ या आत्मचरित्रात आहेत. गुणाबाई गाडेकर शिक्षण घेत असताना त्यांचा संबंध रमाबाई रानडे, बाबासाहेब देवधर, बापूसाहेब माटे यांच्याशी आला. अस्पृश्यता निवारणाची चळवळ चालवणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व त्यांच्या भगिनी जनाक्का शिंदे यांच्याशीही त्याचां संबंध आला. संत गाडगेबाबा व गुणाबाई गाडेकर यांचा कुटुंबाचा संबंध वरचेवर येत असे. सेवासदनमध्ये आलेल्या अनुभवांचे व समकालीन सामाजिक सुधारणेचे त्याच्या मर्यादांसह  विस्तृत निवेदन या त्यांच्या आत्मचरित्रात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी चालवलेल्या चळवळीची माहिती या आत्मचरित्रात आहे.. गुणाबाई गाडेकर यांना आलेले जातिव्यवस्थेचे आलेले अनुभव हा या आत्मचरित्रातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. गुणाबाई गाडेकर  यांच्या कुटुंबावर पारसी आधुनिक संत मेहेरबाबा यांचा प्रभाव होता. अशा या थोर समाजसेविका गुणाबाई गाडेकर यांचा मृत्यू वयाच्या  ६९ व्या वर्षी मुंबई येथे झाला.

संदर्भ :

  • कोसारे, एच. एल., विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास, नेहा प्रकाशन, नागपूर, २०१२.
  • गाडेकर, गुणाबाई, स्मृतीगंध, मेहेरचंद्र प्रकाशन, पुणे, १९९२.
  • सावरकर, सुनीता, विसाव्या शतकातील अभिजनवादी स्त्री सुधारणा व डॉ बाबासाहेब आंबेडकर (गुणाबाई गाडेकर यांच्या आत्मचरित्राच्या आधारे चिकीत्सक परीक्षण), प्रशांत प्रकाशन, जळगाव, २०१९.