विद्युतीय साधनांच्या साह्याने करण्यात येणाऱ्या आर्थिक व्यवहारांना ई-बँकिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंग असे म्हणतात. बँकेचा ग्राहक कोणत्याही स्थानावरून आंतरजालाच्या मदतीने त्यांच्या सर्व बँकिग सेवांमध्ये प्रवेश करू शकतात. या सेवेची सुरुवात १९९७ मध्ये सर्वप्रथम आय. सी. आय. सी. आय. बँकेने केली. आज प्रत्येक बँक ग्राहकांना ई-बँकिंग सुविधा पुरवितात. पारंपरिक बँकिंगपेक्षा ई-बँकिंग ही ग्राहकांसाठी अधिक लवचिक असून ते बँक कर्मचाऱ्यांसाठी अधिक सोयीस्कर आहे.
इंटरनेट बँकिंग (आंतरजालीय बँकिंग) आणि ई-बँकिंग यांमध्ये फरक आहे. इंटरनेट बँकिंग ही एक अंकीय भूगतान प्रणाली (डिजिटल पेमेंट सिस्टिम) असून याद्वारे आंतरजालाच्या साह्याने वित्तीय किंवा बिगरवित्तीय व्यवहार केले जातात. ई-बँकिंगमध्ये विद्युतीय साधनांच्या साह्याने आर्थिक व्यवहार केले जातात. आंतरजालीय बँकिंग ही ई-बँकिंगचाच एक प्रकार असल्याचे मानले जाते.
ई-बँकिंगमध्ये आंतरजालाचा (इंटरनेट) वापर करून बँकिंग, टेली-बँकिंग, भ्रमणध्वनी (मोबाईल) बँकिंग, डेबिट कार्ड सुविधा, एटीएम सुविधा, क्रेडिट कार्ड सुविधा इत्यादी सर्व बँकिंग सेवांचा समावेश होतो. यालाच आभासी बँकिंग, ऑनलाईन बँकिंग, अंकीय बँकिंग असेही म्हणतात. अशा प्रकारच्या बँकिंगची एकमात्र आवश्यकता म्हणजे दूरसंचार आणि विद्युत नेटवर्क होय. म्हणजे बँकिंगच्या वेगवेगळ्या आर्थिक आणि आर्थिकेतर सेवा प्रदान करणे होय. ई-बँकिंग साधनांचा वापर करता येणाऱ्या लोकांमध्ये ही सेवा अधिक लोकप्रिय आहे.
ई-बँकिंगची उपयुक्ता : अशा प्रकारच्या बँकिंग सेवा ग्राहक आणि बँकेसाठी खूप उपयुक्त आहेत.
ग्राहकांसाठी :
- ई-बँकिंगमुळे ग्राहकाला आपल्या खात्यात केव्हाही आणि कोठूनही प्रवेश करता येतो.
- ई-बँकिंगमुळे शाखेत जाण्याची आणि वाहतुकीसाठी खर्च करण्याची गरज नसल्याने ग्राहकांचा वेळ आणि पैशांची बचत होते.
- ई-बँकिंग हा व्यवहार असल्यामुळे व्यवहारामधील अंतराचा कोठेही अडथळा येत नसून ग्राहक आपले खाते सहजपणे हाताळू शकतो.
- ई-बँकिंगमुळे बँकेचा व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. ते आंतरजालाद्वारे कोठूनही आर्थिक व्यवहार सहजपणे करू शकतात. त्यामुळे ग्राहकांना त्याचा अधिक आनंद होतो.
बँकांसाठी :
- ई-बँकिंग ही बँकांसाठी सर्वांत स्वस्त आणि सुलभ प्रणाली आहे.
- संगणक अधिक अचूक असल्याने ई-बँकिंगमुळे मानवी त्रुटींची शक्यता कमी असते.
- ई-बँकिंग सेवा ग्राहकांची निष्ठा वाढविण्यास मदत करते.
- ई-बँकिंग हा व्यवहार पेपर विरहित असल्याने ते पर्यावरणास अधिक अनुकूल आहे.
- ग्राहक बहुतेक व्यवहार ई-बँकिंगद्वारे करत असल्यामुळे बँकांमध्ये होणारी गर्दी कमी झाली आहे.
- ई-बँकिंगमुळे बँकिंग कर्मचाऱ्यांवरील ग्राहकांचा व व्यवहारांचा ताण कमी झाला. त्यामुळे ते आंतरबँकिंग कार्य व्यवस्थितपणे पार पाडत असून त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ ळत आहे.
ई-बँकिंगमार्फत केले जाणारे काही आंतरजालीय वित्तिय व्यवहार :
अ. क्र. | सेवा | स्वरूप |
१ |
रिअल टाईम ग्रास सेटलमेंट (आरटीजीएस) |
आरटीजीएस ही प्रक्रिया मिळालेल्या वेळेच्या व्यवहार प्रकियेसंदर्भात असते. आवश्यक असलेल्या मोठ्या मूल्यांच्या व्यवहारांसाठी कमितकमी दोन लाख रुपये पाठविले जाऊ शकते. देयके अंतिम आणि अपरीवर्तनीय असते. |
२ | नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) | हे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत आंतरजालीय हस्तांतरण प्रणाली असून याची कमाल मर्यादा रु. ५० हजार आहे. |
३ |
त्वरित सेवा (आयएमपीएस) |
हा अगदी मोबाईल बँक अॅपवरून आंतरबँक विद्युतीय निधी हस्तांतरण (इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) प्रणाली आहे. आयएमपीएसद्वारे बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही लाभार्थ्यांपर्यंत हे पैसे त्वरीत हस्तांतरीत केले जावू शकतात. |
४ |
इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग प्रणाली (ईसीएस) सिस्टीम |
हे नियतकालिक देयकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहारांची पर्यायी भूगतान पद्धत प्रदान करते. डेबिट आणि केडिट कार्ड दोन्हीसाठी हे विद्युतीय निधी हस्तांतरणाचे माध्यम आहे. ई. एम. आय आणि देयके थकीत राहत नाही. यात रोकड किंवा धनादेशाद्वारे पैसे देण्याची आवश्यकता नाही. |
५ |
बिलांचे व इतर व्यवहारांचे पैसे देणे-घेणे सेवा |
यामध्ये पेटीएम, भीम, गूगल पे, फोन पे यांसारख्या बीबीपीएस (भारत बील पेमेंट सिस्टीम) आधारित लोकप्रिय सेवा आहेत. विशेषतः ही सेवा कोरोनाच्या टाळेबंदी काळात अधिक वापरली गेली. काही देशांत ही सेवा ‘गायरो’ (जीआयआरओ) नावाने प्रचलित आहे. |
आज ई-बँकिंग हा जागतिक आर्थिक पर्यावरणाचा अविभाज्य भाग बनला आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानातील बदल होण्याच्या गतीने ई-बँकिंग क्षेत्र बदलत आहे. आरामदायी व्यवहार सुविधांमुळे ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे.
ई-बँकिंगला खालील मर्यादा आहेत :
- तांत्रिक बिघाड आणि नेटवर्क समस्यांमुळे ई-बँकिंगद्वारे होणारे व्यवहार थांबतात. त्यामुळे बँकांचे तसेच ग्राहकांचे नुकसान होते.
- अनावश्यक व्यवहार झाल्यास, प्रकरण हाताळण्याची प्रकिया खूप दमछाक करणारी आहे.
- जर ग्राहक ऑनलाईन व्यवहारांसाठी आंतरजालीय बँकिंग वापरण्यास तयार नसतील आणि प्रथमच ते वापरत असतील, तर बनावट कॉलद्वारे त्यांचा गुप्त पिन क्रमांक विचारून त्यांच्याशी फसवणूक होण्याची शक्यता असते.
- फोन कॉल व टोल फ्री क्रमांकावरून ग्राहकांच्या बँकिंगविषयक समस्यांचे निवारण करणे ही एक मोठी डोकेदुखी आहे.
- जर बँकांचे कर्मचारी प्रशिक्षित नसतील, तर त्याचा परिणाम त्यांच्या कार्यावर आणि कार्याचा परिणाम त्यांच्या बँकांवर होत असतो.
समीक्षक : अविनाश कुलकर्णी
भाषांतरकार : रसिका म्हात्रे