एक बिगर शासकीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना (आयईए). या संघटनेची स्थापना व औपचारिक प्रक्रिया १९५० मध्ये युनेस्कोच्या सामाजिक विज्ञान विभागाच्या प्रेरणेतून झाली. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ योझेफ आलोईस शुंपेटर हे या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते. गोलमेज परिषद आणि विविध चर्चासत्रे आयोजित करून त्यामाध्यमातून जगाच्या वेगवेगळ्या भागांतील अर्थशास्त्रज्ञांमध्ये वैयक्तिक संपर्क घडवून आणणे आणि परस्पर सामंजस्यपणाला चालना देणे हे या संघटनेचे प्राथमिक उद्दिष्ट्य आहे. हे उद्दिष्ट्य तसेच विद्यमान परिस्थितीत असलेल्या समस्या विविध वैज्ञानिक सभा, समान संशोधन कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय चरित्रे यांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून साध्य केले जाते.

आयईए ही पूर्णपणे वैज्ञानिक उद्दिष्टाने स्थापित केली गेलेली संघटना आहे. आर्थिक ज्ञानाच्या प्रगतीस साह्य करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सहकार्याचे उपाय आयोजित करणे, हाही या संघटनेचा एक उद्देश आहे. आर्थिक विचार, ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या तरतुदीस ही संघटना प्रोत्साहन देते.

आयईएमध्ये अर्थशास्त्रातील राष्ट्रीय, प्रादेशिक आणि बहुराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक किंवा व्यावसायिक संघटनांचा सदस्य म्हणून समावेश केला जातो. आयईएची कार्यकारी समिती इतर संस्थांना सहयोगी सदस्य म्हणूनही मान्यता देऊ शकते. हे सहयोगी सदस्य भौगोलिक आधारावर किंवा अर्थशाखेच्या विशिष्ट शाखेत काम करण्याच्या आधारावर संघटनेत समाविष्ट केले जातात. या संघटनेचे संचालन परिषद व कार्यकारी समिती करते. परिषदेत नियुक्त सदस्य आणि स्वीकृत केलेले सदस्य यांचा समावेश असतो. प्रत्येक सदस्य संघटनेने सर्वसाधारण सभेमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व करणारे एखादे परिषद सदस्य नेमले पाहिजे अशी अट असते. परिषदेची त्रैवार्षिक बैठक होते. या बैठकीत संघटनेच्या सर्वसाधारण धोरणाचा आढावा घेतला जातो. या वेळी अध्यक्ष, अधिकारी आणि कार्यकारी समितीच्या सदस्यांची तीन वर्षांकरिता निवड केली जाते.

आयईएचे सदस्य होण्याचे फायदे : (१) सदस्य देशांमधील संशोधनाच्या कार्यामध्ये सहभाग, तसेच सदस्य देशांनी केलेल्या मूलभूत संशोधनात सहभाग हा त्रैवार्षिक सम्मेलन, गोलमेज परिषद, इतिवृत्त प्रकाशन आणि आयईएच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमपत्रिका अशा विविध पद्धतींद्वारे प्राप्त करता येतो.

(२) सदस्य संघटनेला गोलमेज परिषद आयोजित करण्यास प्राधान्य मिळून ते संपूर्ण जगात आयोजित केले जाते. या गोलमेज परिषदेचे इतिवृत्त मॅकमिलन पालग्रिव्ह या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले. आतापर्यंत त्याचे सुमारे १५० पेक्षा जास्त खंड प्रकाशित झाले आहेत.

(३) आयईए आपल्या सदस्य देशांद्वारे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात व्यक्तिमत्व असलेल्या क्रिया प्रतिष्ठित वक्त्यांना आमंत्रित करण्यास मदत करते.

(४) या संघटनेद्वारे त्रैवार्षिक अधिवेशन काळात सत्र घेण्याचे निश्चित केले जाते. हे सत्र विकसित व विकसनशील देशांमधील संशोधकांना नोबेल सन्मानित अर्थशास्त्रज्ञांशी संवाद साधण्यास सक्षम बनविते. हे चर्चासत्र त्यांना अर्थशास्त्रातील विद्यमान प्रगती समजण्यास मदत करते.

(५) आयईएचे सदस्य होण्याचे संपूर्ण फायदे वैयक्तिक सदस्यांना मिळतात. उदा., गोलमेज परिषद आणि जागतिक परिषद या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे इत्यादी. तसेच जागतिक परिषदेसाठी कमी केलेल्या नोंदणी शुल्कावर सदस्य नोंदणी करू शकतात.

(६) अर्थशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याविषयी वाद-संवाद वाढविणे यासारख्या प्रक्रियेतही सदस्यसंघटना सहभागी होऊ शकतात.

आयईएने आर्थिक व्यवसायात महिलांची भूमिका वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणारा एक जागतिक बहुवर्षीय प्रकल्प सुरू केला आहे. महिलांच्या व्यवसायातील अडथळे समजून घेणे व ते दूर करणे यांवर लक्ष केंद्रित करून अनेक देशांमध्ये संशोधन करण्याचा संघटनेचा उद्देश आहे. सार्वजनिक क्षेत्रात जागतिक पातळीवर महिला अर्थशास्त्रज्ञांचा आवाज वाढविण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढविला जाणार आहे. या उपक्रमाचे नेतृत्व अश्विनी देशपांडे (अशोका विद्यापीठ), रॅक्वेल फर्नांडिझ (न्यूयॉर्क विद्यापीठ), डॅनी रॉड्रिक (हार्वर्ड विद्यापीठ), फिओना ट्रेगेना (जोहान्सबर्ग विद्यापीठ), मारिया बर्निएल हे संघसदस्य करणार आहेत.

अ. क्र. आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटनेचे सदस्य देश कार्यकाळ
योझेफ आलोईस शुंपेटर ऑस्ट्रिया व यूएसए १९५०
गॉटफ्रेड हाबेर्लर ऑस्ट्रिया व यूएसए १९५० – १९५३
हॉवर्ड एस. एलिस यूएसए १९५३ – १९५६
एरिक लिंडाह्ल स्वीडन १९५६ – १९५९
ई. ए. जी. रॉबिन्सन यूएसए १९५९ – १९६२
जी. उगो पापी इटली १९६२ – १९६५
पॉल अँटनी सॅम्युएल्सन यूएसए १९६५ – १९६८
एरिक लंडबर्ग स्वीडन १९६८ – १९७१
फ्रित्झ मॅश्लप यूएसए १९७१ – १९७४
१० एडमंड मलीनमौड फ्रान्स १९७४ – १९७७
११ शिगेतो त्सुरू जपान १९७७ – १९८०
१२ विक्टर एल. उर्क्विदी मेक्सिको १९८० – १९८३
१३ केनेथ जोसेफ ॲरो यूएसए १९८३ – १९८६
१४ अमर्त्य सेन इंडिया १९८६ – १९८९
१५ अँथोनी बी. ॲटकिन्सन यूके १९८९ – १९९२
१६ मिशेल ब्रुनो इझ्राएल १९९२ – १९९५
१७ जॅक्वेस ड्रेझ बेल्जियम १९९५ – १९९९
१८ रॉबर्ट एम. सोलो यूएसए १९९९ – २००२
१९ जानोस कोर्नाई हंगेरी २००२ – २००५
२० गुइलेर्मो काल्वो यूएसए २००५ – २००८
२१ मसाहिको आओकी जपान २००८ – २०११
२२ जोसेफ स्टिग्लिट्झ यूएसए २०११ – २०१४
२३ टीम बेस्ले यूके २०१४ – २०१७
२४ कौशिक बसू इंडिया २०१७ – २०२१
२५ डॅनी रॉड्रिक तुर्कस्तान २०२१ – २०२३
२६ एल्हानन हेल्पमन इझ्राएल २०२३ – २०२६

 

आयईएचे विद्यमान अध्यक्ष एल्हानन हेल्पमन हे असून त्यांचा कार्यकाळ २०२३ ते २०२६ असा आहे. या संघटनेचे भारतासह सुमारे ६८ सदस्य देश आणि सुमारे २० सहयोगी सदभासद आहेत. आयईएने आतापर्यंत अर्थतज्ज्ञांच्या एकूण ११५ गोलमेज परिषदांचे, तसेच सुमारे १५ खुल्या आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले. अशा प्रकारच्या परिषदांचे आयोजन करताना संघटनेद्वारे विकसनशील देशांच्या समस्यांवर अधिकाधिक भर दिला जातो.

समीक्षक : ज. फा. पाटील

भाषांतरकार : हितेश देशपांडे