सेन, अमर्त्य : (३ नोव्हेंबर १९३३). जागतिक कीर्तीचे मानवतावादी बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ, भारतरत्न आणि अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी. कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचा सिद्धांत, तसेच दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार देण्यात आला. सेन यांचे कल्याणकारी अर्थशास्त्रातील मुलभूत समस्यांवरील पुढील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे : (१) सामाजिक निवडीचा सिद्धांत, (२) दारिद्र्याचे निर्देशांक, (३) कल्याणाचे निर्देशांक आणि (४) दुष्काळाचे विश्लेषण.

सेन यांचा जन्म शांतीनिकेतन येथे एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात आशुतोष व अमिता या दांपत्यापोटी झाला. त्यांचे मातुल आजोबा क्षितिमोहन हे विश्वभारतीत संस्कृत व भारतीय संस्कृती हे विषय शिकवीत. वडील आशुतोष हे डाक्का विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. सेन यांनी डाक्का येथील सेंट ग्रेगरी स्कूलमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेऊन पुढे विश्वभारतीत इंटरपर्यंतचे शिक्षण घेतले आणि १९५३ मध्ये कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी. ए. झाले. नंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १९५५ मध्ये ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमधून त्यांनी दुसऱ्यांदा अर्थशास्त्र विषयात बी. ए. ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी तेथूनच १९५९ मध्ये एम. ए. आणि त्याच वर्षी पीएच. डी. या पदव्या संपादित केल्या. पुढे १९५८ – १९६३ या काळात ते ट्रिनिटी कॉलेजमध्ये अधिछात्र होते. १९५५ – १९५८ या काळात त्यांनी जादवपूर विद्यापीठ व १९६३ – १९७१ या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अध्यापन केले. नंतर १९७१-७७ या काळात त्यांनी इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि १९७७ –१९८८ या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे अध्यापन केले. अर्थशास्त्राबरोबरच त्यांनी तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्यांनी १९८८ – १९९८ या काळात अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्यापन केले. त्यांची १९९८ – २००४ या काळापर्यंत ‘मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज’ या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणारे ते पहिले भारतीय होत. त्यानंतर हार्व्हर्ड येथे लॅमाँट युनिव्हर्सिटीत प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केले.

अर्थशास्त्रीय धोरणांचे समाजाच्या हितावर काय परिणाम होतात, त्या धोरणांचे मूल्यमापन करणे हे कल्याणकारी अर्थशास्त्राचे उद्दिष्ट होय. त्यांनी १९७० मध्ये लिहिलेल्या आपल्या कलेक्टिव्ह चॉइस अँड सोशल वेल्फेअर (१९७०) या ग्रंथात व्यक्तींचे हक्क, बहुसंख्याकांचे शासन आणि व्यक्तीच्या स्थितिगतीबाबतच्या माहितीची उपलब्धता यांसारख्या प्रश्नांचा परामर्श घेतला आहे. यांतून संशोधकांना अशा प्रश्नांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.

सेन यांनी समाजातील दारिद्याचे व कल्याणाचे निर्देशांक निश्चित केले. हे निर्देशांक पुढील दोन कारणांसाठी महत्त्वाचे ठरतात : पहीले, देशातल्या वेगवेगळ्या समाजगटांत दारिद्याचे प्रमाण किती आहे; त्याचे विभाजन कसे आहे; त्यांत वेळोवेळी कसे आणि कोणते बदल झाले आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. दुसरे, देशातले दारिद्र्याचे प्रमाण आणि आर्थिक कल्याणाचे प्रमाण ह्यांच्या तुलनेसाठीही हे निर्देशांक महत्त्वाचे ठरतात. त्यांनी १९९० मध्ये देशांची क्रमवारी ठरविण्यासाठी तेथील लोकांचे आयुर्मान, शिक्षण व उत्पन्न यांवर आधारित ‘युनायटेड नेशन्स ह्यूमन इंडेक्स’ ही प्रणाली विकसित केली.

सेन यांचा पॉव्हर्टी अँड फेमिन्स : ॲन एसे ऑन एन्टायटलमेंट अँड डीप्राइव्हेशन  हा ग्रंथ १९८१ मध्ये प्रसिद्ध झाला. दुष्काळ हा केवळ अन्नधान्याच्या तुटवड्यामुळेच होत नसून अन्नवाटपाच्या यंत्रणांमधील विषमतेमुळेही तो होऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या ग्रंथात केले. शहरांमधून निर्माण झालेली आर्थिक तेजी आणि त्यामुळे वाढलेल्या अन्नधान्याच्या किमती यांमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होणे शक्य असते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी दुष्काळ प्रत्यक्ष पाहिला होता. त्यात उपासमारीने लाखो लोक मरण पावले होते. वाढलेल्या किमतीत धान्य घेणे ज्यांना शक्य नव्हते, अशी माणसे (उदा., भूमिहीन मजूर) मृत्युमुखी पडली. माहितीच्या आधारे सेन यांनी असे दाखवून दिले होते की, बंगालमध्ये त्या वेळी धान्यसाठा पुरेसा होता; तथापि साठेबाजीमुळे धान्य महाग झाले. परिणामतः सामान्य लोकांना ते खरेदी करणे अशक्यप्राय झाले. त्यामुळे लोकांची उपासमार झाली.

विकासाच्या संदर्भात सेन यांनी क्षमतेची संकल्पना विकसित केली. ‘इक्वॉलिटी ऑफ व्हॉट?’ या त्यांच्या लेखात त्यांनी ती मांडली आहे. लोकांच्या क्षमता वाढायच्या असतील, तर त्यांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि ते बजाविण्याचे स्वातंत्र्य व योग्य त्या सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या पाहिजे. उदा., लोकांना मतदानाचा निव्वळ हक्क देऊन उपयोग नाही, त्यांना तो बजावण्याचे योग्य व चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. सेन यांनी १९९० मध्ये न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्समध्ये ‘मोअर दॅन १०० मिल्यन विमेन आर मिसिंग’ असा एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी विकसनशील देशांतील लिंगभेद, दुष्काळ, दारिद्र्य आणि विषमता यांवर मूलगामी स्वरूपाची विश्लेषणात्मक चर्चा केली आहे. आर्थिक विकासाचा विचार करताना त्यांनी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यांतील सूक्ष्म फरक स्पष्ट केला आहे.

सेन हे राजकीय स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक आहेत. त्यांची अशी धारणा आहे की, आर्थिक वृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आर्थिक सुधारणांपूर्वी शिक्षण, सार्वजनिक आरोग्य यांसारख्या क्षेत्रांत मूलभूत सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. त्यांच्या दी ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडिया (२००५) या ग्रंथात भारतीय संस्कृती, भारताची ओळख आणि इतिहास या विषयांशी निगडित असे अनेक मार्मिक लेख समाविष्ट केलेले आहेत. सेन यांचा दी आयडिया ऑफ जस्टिस हा ग्रंथ २००९ मध्ये प्रसिद्ध झाला. कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवडीचा सिद्धांत यांवर हा ग्रंथ आधारलेला असला, तरी त्यात त्यांचे तात्त्विक विवेचन आहे.

सेन यांनी विपुल स्फुटलेखन व ग्रंथलेखन केले असून त्यांचे काही ग्रंथ सुमारे तीस भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहेत. त्यांच्या ग्रंथांमध्ये चॉइस ऑफ टेक्निक्स, १९६८;  कलेक्टिव्ह चॉइस अँड सोशल वेल्फेअर, १९७०; बिहेविअर अँड दी कन्सेप्ट ऑफ प्रिफरन्स, १९७१; ऑन इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, १९७३; पॉव्हर्टी अँड फेमिन्स : ॲन एसे ऑन एन्टायटलमेंट अँड डीप्राइव्हेशन, १९८१; डिस्काउटिंग फॉर टाइम अँड रिस्क इन एनर्जी पॉलिसी, १९८२; चॉइस, वेलफेअर अँड मेजरमेंट, १९८२; रिसोर्सेस व्हॅल्यूज अँड डेव्हलपमेंट, १९८४; कोमोडिटिज अँड कॅपॅबिलिटी, १९८५; ऑन इथिक्स अँड इकॉनॉमिक्स, १९८७; फूड, इकॉनॉमिक्स अँड एन्टायटलमेंट्स, १९८७; हंगर अँड पब्लिक ॲक्शन, १९८९; इनइक्वॅलिटी रेक्झामाइंड, १९९२; इंडिया : इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोशल अपोर्च्युनिटी, १९९५; सस्टेनेबल ह्यूमन डेव्हलपमेंट : कन्सेप्ट्स अँड प्रायोरिटिज, १९९६; ह्यूमन राइट्स अँड एशियन व्हॅल्यूज, १९९७; दी अमर्त्य सेन अँड जीन ड्रेस ओम्निबल, १९९८; डेव्हलपमेंट ॲज फ्रिडम, १९९९; रिजन बिफोर आयडेंटी, १९९९; भारतीय राज्योंका विकास, २०००; आर्थिक विकास और स्वातंत्र्य, २००१; डिलिव्हरी दी मॉन्टेरी कॉन्शेन्सस : विच कॉन्शेन्सर? २००२; रॅशनॅलिटी अँड फ्रीडम (२००२); रिकन्स्ट्रक्टिंग दी वर्ल्ड : बी. आर. आंबेडकर अँड बुद्धिज्म इन इंडिया, २००४; दि ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडिया, २००५; आयडेन्टिटी अँड व्हॉयलन्स, २००६; सिव्हिल पॅथ टू पिस, २००७; दी आयडिया ऑफ जस्टिस, २००९; मिसमेजरिंग : अवर लाइव्ह्ज, २०१०; ॲन ग्लोरी : इंडिया अँड इट्स कॉन्ट्रॅडिक्शन, २०१३; निती और न्यायता, २०१३; ए विश ए डे ए विक, २०१४; डेमॉक्रसी ॲज ए युनिव्हर्सल व्हॅल्यू, २०१४; दी कन्ट्री ऑफ फर्स्ट बॉइज, २०१५; एड्स सूत्र : अन्‌टोल्ड स्टोरीज फ्रॉम इंडिया (भारतातील एड्सच्या संकटावरील निबंध) इत्यादी ग्रंथांचा समावेश होतो.

सेन यांनी अनेक सन्माननीय पदे भूषविली : इकॉनॉमिक सोसायटीचे अध्यक्ष (१९८४), दी इंटरनॅशनल इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९८६-८९), इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९८९) व अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९९४). सेन यांनी कल्याणाच्या अर्थशास्त्राला नवा अर्थ, नवी दिशा दिली; त्याला तात्त्विक-नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांच्या कार्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिल्या. नंतर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान त्यांना प्राप्त झाला (१९९९). त्याच वर्षी बांगला देशाने त्यांना आपल्या देशाचे सन्माननीय नागरिकत्व दिले. २०१२ मध्ये अमेरिकेने त्यांना नॅशनल ह्यूमॅनिटी मेडल देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार पहिल्यांदाच बिगर अमेरिकन तज्ज्ञाला दिला गेला. त्याच प्रमाणे १९५० पासून जर्मनीकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या जर्मन बुक ट्रेडचा २०२०च्या शांती पुरस्काराचे सेन मानकरी ठरले आहे. वैश्विक न्याय, शिक्षण आणि आरोग्य सेवा यांमध्ये सामाजिक असमानता नसावी, या मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या असामान्य कार्यासाठी ते मानकरी ठरले. सन्मानचिन्ह व २५,००० युरो (सुमारे २१ लाख रुपये) या स्वरूपात तो पुरस्कार दिला जातो.

सेन यांचे एकूण तीन विवाह झाले. त्यांनी १९६० मध्ये वनीता देव या विद्याव्यासंगी लेखिकेबरोबर पहिला विवाह केला. तिच्यापासून त्यांना अंतरा व नंदना या दोन कन्या झाल्या. ते लंडनला अध्यापनास गेल्यानंतर परस्परांच्या संमतीने १९७५ मध्ये विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी १९७८ मध्ये इव्हा कोलोर्नी या ज्यू महिलेबरोबर दुसरा विवाह केला. तिच्यापासून त्यांना इंद्राणी ही कन्या व कबीर हा मुलगा झाला; पण १९८५ मध्ये इव्हाचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर त्यांनी १९९१ मध्ये इमा जॉर्जिना रॉथ्सचाइल्ड या महिलेबरोबर तिसरा विवाह केला.

सध्या सेन हे चीनमधील बीजिंग विद्यापीठातील ‘सेंटर फॉर ह्यूमन अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्टडीज’चे संचालक आहेत. तसेच पंतप्रधानांच्या ‘ग्लोबल अ‍ॅडव्हायजरी काउन्सिल ऑफ ओव्हरसीज इंडियन्स’चे ते सदस्य आहेत. १९ जुलै २०१२ रोजी त्यांची नालंदा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली.

संदर्भ :

  • इंगळे, व. न., नोबेल भूषण अमर्त्य सेन, औरंगाबाद, २०१०.
  • कहाते, अतुल, अमर्त्य सेन, पुणे.
  • जाधव, अर्जुन, अमर्त्य सेन : अर्थशास्त्राचा मानवी चेहरा, सातारा.
  • देऊळगावकर, अतुल, विवेकीयांची संगती, पुणे, २०१९.
  • सक्सेना, रीचा, अमर्त्य सेन : जीवन चरित्र, पुणे.
  • सहस्त्रबुद्धे, सुप्रिया, अस्मिता आणि हिंसाचार, पुणे.
  • Bhardwaj, Aparna; Thakur, Anil Kumar, Amartya Sen & Human Development, Delhi, 2012.
  • Dua Shyam, Luminous Life of Amartya Sen Illustrated Biography, Delhi, 2004.
  • Humphries, Jane; Agarwal, Bina; Robeyns, Ingrid, Capabilities Freedom & Equality Amartya Sens Work From A Gender Prespective, Oxford, 2011.
  • Kanbur, Ravi; Basu, Kaushik, Arguments For A Better World: Essays in Honor of Amartya Sen, 2 Vols., Oxford, 2009.
  • Ray, Biswanth, Welfare Choise and Development Essays In Honour of Professor Amartya Sen, New Delhi, 2008.
  • Saxena, Richa, Amartya Sen-A Biography, Delhi, 2011.
  • Sen, Raj Kumar; Sinha, Ajit Kumar, Economics of Amartya Sen, Delhi, 2003.
  • Singh, Inderjeet; Thakur, Anil Kumar, Economics of Amartya Sen, New Delhi, 2012.
  • https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/1998/sen/speech/ (अमर्त्य सेन यांच्या नोबेल संभाषणाचे दृक-श्राव्य).

 समीक्षक : जयवंत चौधरी

This Post Has One Comment

  1. Santosh Dastane

    Why the list of all the books written by Amartya Sen is not given ? Please append this list at the end of the article.
    thanks.

Comments are closed.