बदलता आहार, बदलती जीवनशैली, मानसिक ताण इत्यादींमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध (blocking) होण्याचे प्रमाण वाढले आहे. जेव्हा हृदयाच्या मुख्य धमनीमध्ये अवरोध असेल आणि अँजिओप्लास्टी (वाहिनी संस्करण) करणे अशक्य किंवा धोकादायक असेल अशा वेळी औषधोपचारासोबतच हृद् रोहिणी उपमार्ग शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला तज्ञ्जांकडून दिला जातो.
हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिणी अरुंद होऊन त्यामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेस बाधा आणणाऱ्या स्थितीस हृद् रोहिणी विकार असे म्हणतात व अशा वेळी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेस हृद् रोहिणी उपमार्ग (पर्यायी मार्ग निर्मिती) शस्त्रक्रिया असे म्हणतात. या शस्त्रक्रियेचे विवृत हृदय शस्त्रक्रिया (open heart surgery) व स्पंदीत हृदय शस्त्रक्रिया (beating heart surgery) असे दोन प्रकार आहेत. विवृत हृदय शस्त्रक्रियेमध्ये हृदय व फुप्फुस यांची क्रिया काही काळ बंद ठेऊन हृद्-फुप्फुस यंत्राद्वारे (heart-lung machine) शरीराला रक्त व ऑक्सिजन पुरवठा करून शस्त्रक्रिया करतात. तर, स्पंदीत हृदय शस्त्रक्रियेदरम्यान हृदयाचे कार्य चालू असते. ऑक्टोपस ऊतक स्थिरकारी (Octopus tissue stabilizer) या उपकरणाच्या साह्याने हृदयाचा शस्त्रक्रियेसाठी लागणारा भाग स्थिर ठेवला जातो.
परिचारिकेची कर्तव्ये व जबाबदारी :
अ) शस्त्रक्रियेपूर्वीची परिचर्या : १) रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्त पातळ होण्याच्या गोळ्या (aspirin clopidogrel) साधारणत: शस्त्रक्रियेच्या आधी पाच दिवस बंद केलेल्या असतात व एक ते दोन दिवस आधी रुग्णालयात भरती करून घेतात. २) रक्ताच्या तपासण्या करून रक्तातील साखरेचे प्रमाण, क्षारांचे प्रमाण, रक्तगट, यकृत व मूत्रपिंड यांच्या घटकांचे प्रमाण याची नोंद घेण्यात येते आणि त्यानुसार औषधोपचार सुरू केला जातो. ३) छाती, रोहिणी, हृदय यांच्या सर्व चाचण्या करून हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते. ४) शस्त्रक्रियेच्या आदल्या रात्रीपासून खण-पिणे पूर्णपणे वर्ज करून, शक्यतो झोपेची गोळी दिली जाते. ५) नातेवाईकांना संपूर्ण माहिती देऊन संमतीपत्रावर सही घेतली जाते. ६) सकाळी रुग्णाला शस्त्रक्रिया कक्षात नेण्यात येते व भूल (Anaesthesia) दिल्यानंतर मूत्रनलिका व कृत्रिम श्वासनलिका टाकण्यात येते.
आ) शस्त्रक्रियेदरम्यानची परिचर्या : १) रक्तातील ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण यांवर लक्ष व नियंत्रण ठेवण्याचे काम भूलतज्ज्ञ परिचारिकेच्या मदतीने करतात. २) शस्त्रक्रिया सुरू असताना शल्यचिकित्सक व सहायक शल्यचिकित्सक यांना प्रत्येक आवश्यक उपकरण हातात देणे व इतर सहकार्य करणे हे प्रमुख कार्य परिचारिका करतात.
इ) शस्त्रक्रियेपश्चात परिचर्या : १) शस्त्रक्रियेनंतर रुग्ण ०६ ते २४ तास बेशुद्धावस्थेत असतो. अशा वेळी परिचारिका रुग्णाचा रक्तदाब, विद्युत हृल्लेख (ECG), शारीरिक तापमान, ऑक्सिजन व मूत्राचे प्रमाण, कृत्रिम श्वासोच्छ्वास इ. सर्व बाबींची परिचारिक नोंद करून ठेवते. २) रुग्ण शुद्धीत आल्यानंतर त्याच्या हृदयाचे तसेच इतर अवयवांचे कार्य सुरळीत चालू असल्यास रुग्णाला लावलेली कृत्रिम श्वासोच्छ्वास नलिका, अशुद्ध रक्त काढण्यासाठी छातीमध्ये टाकलेल्या नलिका (drain) काढतात. ३) रुग्णाला हालचाल करण्यास, बसण्यास, चालण्यास साहाय्य करणे; फुप्फुसांचे, श्वासांचे व्यायाम शिकवणे; पातळ, हलका तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहार देणे इ. कार्ये परिचारिका पार पाडते. ४) रुग्णाची प्रकृती स्थिर असल्यास त्याला वॉर्डमध्ये हलवितात, अन्यथा अतिदक्षता विभागातच त्याच्यावर उपचार सुरू ठेवतात. ५) शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव होणे, रक्तदाब कमी होणे, हृदयविकाराचा झटका येणे, रोगजंतूंमुळे फुप्फुसाला किंवा नलिकांमुळे मूत्रमार्गाला जंतुसंसर्ग होणे, मधुमेह बळावणे, अर्धांगवायूचा झटका येणे हे प्रकार क्वचित घडू शकतात, परंतु तज्ज्ञ शल्यचिकित्सकांसोबतच आरोग्य संघाचा प्रत्येक घटक रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून योग्य त्या उपाययोजनेत सहकार्य कातात. डॉक्टरांची टीम आणि अतिदक्षता विभागातील परिचारिका आणि इतर साहाय्यक वृंदगण या सर्व गुंतागुंतीवर नजर ठेवून असतात आणि योग्य ती उपाययोजना करीत असतात.
ई) रुग्णाला उपचारापश्चात घरी पाठवितानाची परिचर्या : १) उपचारानंतर रुग्णाच्या सर्व शारीरिक क्रिया स्वतंत्रपणे व सुरळीत कार्यरत झाल्यास रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात येते परंतु त्यावेळी छातीची जखम पूर्णपणे भरून आलेली नसते. परिचारिका रुग्णाने घ्यावयाच्या काळजीसंदर्भात रुग्णाला व नातेवाईकांना मार्गदर्शन करते. उदा., जड वजन न उचलने, झटका बसणाऱ्या हालचाली टाळणे, छातीचा पट्टा वापरणे, पुरेशी विश्रांती, जेवणातील पथ्य, आहारात घ्यावयाचे व वर्ज्य करावायाचे पदार्थ, मद्यपान व धूम्रपान तसेच इतर अंमली पदार्थ पूर्णपणे टाळणे, चालणे व श्वसनाचे व्यायाम योग्य प्रमाणात करणे आणि हळूहळू त्यांचे प्रमाण वाढवणे इत्यादी.
उ) रुग्णाच्या फेरतपासणी वेळची परिचर्या : १) रुग्ण फेरतपासणीस येतो तेव्हा तज्ज्ञांच्या सल्ल्याने परिचारिका टाके काढणे, मलमपट्टी करणे, रक्तदाब मोजणे, मधुमेह व कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याच्या तसेच रक्त पातळ होण्याच्या गोळ्या देणे इ. कामे करतात. २) आहार, व्यायाम यांसेदर्भात मार्गदर्शन करतात.
हृद् रोहिणी उपमार्ग शस्त्रक्रियेनंतर हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. योग्य आहार, पथ्य, व्यायाम व चांगल्या सवयींचा अंगीकार केला तर व्यक्तीला आयुष्य वाढण्यास व चांगल्या प्रकारे जीवन जगण्यास मदत होते. नवनवीन पद्धती, उच्च तंत्रज्ञान, तज्ज्ञ शल्यचिकित्सक व आरोग्य संघ यांमुळे या शस्त्रक्रियेनंतर मृत्यूचे प्रमाण बरेच अंशी कमी झाले आहे. हृद् रोहिणी उपमार्ग शस्त्रक्रिया ही जोखमीची परंतु रुग्णाला आयुष्य देणारी शस्त्रक्रिया आहे.
संदर्भ :
- Black, J. M.; Hawks, J. H. Text book of Medical Surgical Nursing, ed. 8th, India, 2009.
- Lippincott, W.; Wilkins, Handbook of Diseases, ed. 9th, 2003.
समीक्षक : राजेंद्र लामखेडे