शरीरातील काही पेशींची अनियंत्रित वाढ होऊन, ती शरीराच्या इतर भागांत पसरते व शरीरास घातक अर्बुद (गाठ) तयार होते; याला कर्करोग असे म्हणतात. सुमारे २०० विविध प्रकारचे कर्करोग मनुष्याच्या जीवनावर परिणाम करतात. कर्करोग झालेल्या रुग्णाची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांना या आजाराविषयी सखोल ज्ञान व रुग्णसेवेतील विशिष्ट कौशल्य असणे आवश्यक असते. या विभागात कार्यरत असण्याऱ्या परिचारिकेने अर्बुदविज्ञानात (oncology) परिचर्येची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी (MSc. nursing in Onchology). याशिवाय कर्करोग परिचर्या ही विशिष्ट शाखा असल्याने याचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (certificate course) देखील केला जाऊ शकतो. अर्बुदविज्ञान ही वैद्यकाची उपशाखा असून यात कर्करोगाचा प्रतिबंध, निदान व उपचार यांविषयीच्या अभ्यासक्रमाचा समावेश होतो.

कर्करोग रुग्ण परिचर्या : कर्करोग हा आजार देश पातळीवरील गंभीर समस्या आहे. म्हणूनच कर्करोग परिचर्या ह्या स्वतंत्र विषयाची आखणी करण्यात आली. ज्यामध्ये कर्करोग तज्‍ज्ञ,  शल्यचिकित्सक आणि कर्करोग तंत्रज्ञ या सर्वांच्या चमू मार्फत (team) रुग्ण सेवा पुरविली जाते. या शुश्रूषेमध्ये परिचारिका कर्करोग झालेल्या रुग्णांची पूर्ण काळजी घेतात. जसे, रुग्णांना गरजेनुसार विविध परीक्षण चाचणीसाठी तयार करणे, लक्षण –चिन्हानुसार उपचारांचे नियोजन करणे, जास्तीत जास्त व स्वाभाविक हालचाली करण्यास प्रेरित करणे, प्रतिबंधात्मक उपाय योजनांद्वारे आजार आटोक्यात ठेवण्यास मदत करणे. तसेच रुग्णास जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावरील आवश्यक परिचर्या देणे.

कर्करोग रुग्ण परिचर्येची व्याप्ती : जगातील आणि भारतातील आरोग्य सेवा देण्याच्या संकल्पनेत बदल व सुधारणा होत असतात. त्याबरोबरच परिचर्याशास्त्रामध्ये देखील उन्नती होत आहे. तद्वतच कर्करुग्ण परिचर्येची व्याप्ती मागील १० वर्षात वाढत आहे. उदा., विविध कर्करोग रुग्ण विभागात परिचारिका सेवा पुरवितात जसे, अत्यावस्थ रुग्ण कक्ष (acute condition ward), चलनक्षम रुग्णदक्षता कक्ष (ambulatory patient care ward), खाजगी दवाखाने, प्रारण उपचारपद्धती (radiation therapy) विभाग, रसायनचिकित्सा (chemotherapy) विभाग, गृह आरोग्य सेवा व सार्वजनिक आरोग्य संस्था इ. तसेच परिचारिका ह्या विविध अतिविशिष्ट कर्करोग विभागात काम करू शकतात. उदा., कर्करुग्ण शल्यक्रिया, (Surgical oncology), स्त्रीरोग कर्करुग्ण विभाग (gynecological oncology), बालरुग्ण कर्करोग विभाग (paediatric oncology), वैद्यकीय कर्करुग्ण विभाग (medical oncology) इ.

कर्करुग्ण परिचर्येतील जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये : १) कर्करोग रुग्ण परिचारिका त्या रुग्णाच्या संपर्कात येणारी महत्त्वाची व्यक्ती असून रुग्णाच्या विविध चाचण्या, निदान व उपचारांचे नियोजन करण्यास विविध स्तरांवर मदत करतात. २) परिचारिका आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग करून रुग्णाच्या नातेवाइकांसमवेत रुग्णास योग्य ती शुश्रूषा देतात. ३) रुग्ण सेवा देत असताना रुग्णाच्या सामाजिक, मानसिक, भावनात्मक बाबींचा विचार केला जातो. ४) उपचाराविषयी सकारात्मक माहिती देऊन रुग्णाचा विश्वास संपादन केला जातो. ५) रुग्णाच्या मानसिकतेविषयी प्रश्न उद्भवल्यास मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन आजाराची तीव्रता, व्याप्ती व केले जाणारे उपाय आणि परिणामी होणारा फायदा किंवा नुकसान (out come of the disease) याविषयी रुग्ण व नातेवाइकांना समजावून सांगतात. ६) उपचारासंबंधित सर्व बाबींच्या नोंदी नोंदवहीत ठेवल्या जातात.

कर्करोग उपचार केंद्रातील जबाबदाऱ्या : १) रुग्णाच्या आरोग्यमानाचा पूर्व आढावा घेऊन त्याची संपूर्ण शारीरिक तपासणी करणे आणि रुग्णाची मानसिकता बघून सर्व चाचण्यांविषयी माहिती पुरविणे. २) रुग्णाचे प्रयोगशाळेतील आणि चुंबकीय अनुस्पंद (M.R.) किंवा संगणकीय छेदलेखन-क्रमवीक्षण (C T scan) इ. सर्व अहवाल तज्ञ्जांपर्यंत पोहचविणे. ३) औषधोपचार व इतर द्रव पदार्थ देताना त्यांच्या प्रमाणाविषयी विशेष काळजी घेणे तसेच रसायनचिकित्सा उपचार करताना विशिष्ट शुश्रूषा पुरविणे. ४) रुग्णावर उपचार सुरू असताना पुढील नियोजनासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व गरज असल्यास विविध सामाजिक कल्याणकारी योजनांची माहिती देणे. ५) सर्व नोंदी क्रमवारीत नोंद करून दस्ताऐवज (record) तयार करणे.

कर्करोग रुग्ण परिचारिका एक व्यावसायिक जबाबदारी : रुग्ण शुश्रूषा करताना परिचारिका सर्वसाधारण नैतिक मूल्यांचा अवलंब करतात. कर्करोगाविषयी स्वत:चे ज्ञान व कौशल्य अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करून गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा देतात. रुग्णसेवा देताना अन्तरविभागीय समन्वय साधून रुग्ण व नातेवाईक यांचा आर्थिक फायदा (Economical) होण्याचा प्रयत्न करतात. सर्वसाधारणपणे कर्करोग उपचार पद्धती ही खर्चिक व अधिक काल चालणारी प्रक्रिया असते. रुग्णसेवा ही शास्त्रशुद्ध, प्रत्येक रुग्णाची शारीरिक स्थिती व मनाची रोग स्वीकारण्याची पात्रता या सर्वांचा विचार करून दिली जाते. रुग्णाचा कर्करोगाचा प्रकार, लक्षणे-चिन्हे, उपचार पद्धतीचा रुग्णावर होणारा साधक आणि बाधक परिणाम याची नोंद ठेवणे. या सर्व प्रक्रियेस पुराव्यानिशी सराव (Evidence based nursing practice) असे परिचर्येमध्ये  संबोधले जाते. अशा नोंदींचा संशोधनासाठी उपयोग होतो.

    संदर्भ :

  • Langhorne, M. E.; Fulton, J. S.; Otto, S. E. Oncology Nursing, 5th Ed., 2007.
  • Mehta, R. S. Oncology Nursing, 2009.

समीक्षक : सरोज उपासनी