आर्थिक समावेशीकरण आणि अंकीय (डिजीटल) भारत या धोरणांचा प्रसार करण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेली एक बँक. देयक बँकेद्वारे पारंपरिक व्यापारी बँकेप्रमाणे प्रामुख्याने बचत खाते, छोट्या ठेवी, पैशांचे आदान-प्रदान यांसारख्या सुविधा पुरविली जातात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, स्थलांतरित कामगारवर्ग, छोटे व्यावसायिक अशा ग्राहकवर्गाला सेवा पुरविणे हे या बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे; मात्र ही बँक क्रेडिट कार्ड किंवा कर्जाचा पुरवठा करू शकत नाही.
रिझर्व्ह बँकेने नचिकेत मोर समितीचा २०१४ चा अहवाल आणि जुलै २०१४ चा केंद्रीय अर्थसंकल्प यांना अनुसरून देयक बँकेच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. कंपनी कायदा, २०१३ मध्ये नोंदणीकृत आणि बँकिंग नियामक कायदा, १९४९ अंतर्गत अनुज्ञप्तीप्राप्त कंपनी ही देयक बँक सुरू करू शकते. रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार रु. १९९ कोटींचे किमान भागभांडवल, संस्थापकाचा किमान ४०% हिस्सा आदी निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र कंपनीला २५% शाखा बँकरहित क्षेत्रात चालू करण्याच्या आणि आंतरजाल (इंटरनेट) या तंत्रज्ञानाद्वारे सेवासुविधा पुरविण्याच्या अटींवर देयक बँक सुरू करण्यासाठी परवानगी मिळू शकते. देयक बँकांना अनुसूचित (शेड्युल्ड) बँकेचा दर्जा दिलेला असून त्यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते. व्यापारी बँकांप्रमाणे कॅपिटल रिक्वायरमेंट रेग्युलेशन (सीआरआर)/ स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेटीओ (एसएलआर) मध्ये गुंतवणूक करणे देयक बँकांना अनिवार्य असते; मात्र व्यापारी बँकेपेक्षा वेगळेपण दर्शविण्यासाठी ‘देयक बँक’ हे नावामध्ये समाविष्ट करणे बंधनकारक आहे.
देयक बँकेमार्फत एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी गोळा करून त्यातून देयकांचे प्रदान, निधी हस्तांतरण, एटीएम किंवा डेबीट कार्ड, प्रवासी चेक यांसारख्या सोयी विद्युतीय (इलेक्ट्रॉनिक) माध्यमांद्वारे दिल्या जातात. ठेवींवर व्याज देण्याची मुभा असली, तरी कर्ज देण्यासाठी देयक बँका पात्र नसतात. त्यामुळे जास्त व्याजदराच्या रोख्यातील गुंतवणूक, वापरकर्त्यांकडून वापराचा मोबदला किंवा कमिशन, तसेच विमा किंवा म्युच्यूअल फंड यांच्या विविध उत्पादनांची विक्री यांद्वारे उत्पन्न मिळविले जाते. देयक बँकेच्या शाखा, एटीएम सुविधा केंद्र आणि व्यवसाय संवाद (बिझनीस करस्पाँडंट्स) यांच्या माध्यमातून सेवा देऊ शकतात. आंतरजाल आणि मोबाईल बँकिंग या प्रणालींचा प्रभावी वापर हे देयक बँकांच्या प्रसाराचे महत्त्वाचे गमक आहे. एअरटेल देयक बँक, भारत डाक (इंडियन पोस्ट) देयक बँक, पेटीएम देयक बँक अशा काही देयक बँकांनी सेवा देणे सुरू केले आहे. व्यापारी बँका, सहकारी बँका, गुंतवणूक बँका, विदेशी बँका, मर्चंट बँका अशा विविध प्रकारच्या बँका अस्तित्वात असताना देयक बँकेचे प्रयोजन आणि आवश्यकतेवर अनेक प्रश्न विचारले गेले. पारंपरिक व्यापारी बँका ज्या भौगोलिक आणि आर्थिक क्षेत्रांत सेवासुविधा पुरविण्यास असमर्थ ठरतात, तेथे पर्यायी व्यवस्था म्हणून देयक बँका किती प्रभावीपणे काम करू शकतात, यावरच त्यांचे यश अवलंबून आहे.
समीक्षक : विनायक गोविलकर