संपत्तीचा योग्य पद्धतीने उपयोग कसा करावा, हे समजण्याची क्षमता म्हणजे आर्थिक साक्षरता होय. पैसा म्हणजे काय? पैशाच्या साहाय्याने आपण काय काय करू शकतो? आपल्या जवळचे पैसे कोठे आणि कसे गुंतवायचे? गुंतवणुकीला किती परतावा मिळू शकेल? इत्यादींबाबत जाणीव व जागरूकता असणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय. थोडक्यात, पैसे कोठे व कसे खर्च करायचे आणि गुंतवायचे यांचे ज्ञान असणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय. आर्थिक साक्षरता निवड नसून ती एक गरज आहे. लहान-मोठ्या, स्त्री-पुरुष सगळ्यांसाठी ती महत्त्वाची असल्यामुळे आर्थिक साक्षरतेला पर्याय नाही. कुटुंब, व्यवसाय आणि जीवनशैली समृद्ध करण्यासाठी; आर्थिक स्वावलंबनासाठी; भविष्यकालीन आर्थिक सुरक्षेसाठी; समाधानी जीवन जगण्यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची आहे. चांगली आर्थिक साक्षरता वर्तमान जीवन सक्रीय बनवून भविष्य सुरक्षित करते. आजची आर्थिक दृष्ट्या साक्षर व्यक्ती उद्याची कुशल नागरिक बनते व आर्थिक विकासासाठी नवीन संधींची निर्मिती होते. याचा देशाच्या एकूण आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होत असतो.

निरोगी आणि जोखीममुक्त गुंतवणुकीच्या संधीसाठी काय केले जावे व काय करू नये यांबाबत लोकांना ज्ञान देणे आणि त्यांच्या कर्जांचे डोंगर, कर्जांचे सापळे आणि बेईमान सावकारांकडून होणाऱ्या शोषणापासून संरक्षण करणे हे आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे पहिले उद्दिष्ट आहे. बँकेत खाते उघडणे, बचत करण्याची पद्धत, कर्जाचे व्यवहार, करांमधील बचत, गृहकर्ज, विमा प्रीमियम, गुंतवणुकीतील परतावा, भाग (शेअर्स) खरेदी, लाभांश, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, विद्युतीय आधुनिक उपकरणांचा वापर, पंजीकृत संस्थेतील गुंतवणूक इत्यादींबाबत माहितीचा समावेश आर्थिक साक्षरतेत होतो. मंदीचे संधीत रूपांतर कसे करावे? चांगल्या कंपन्यांचे भाग खरेदी करण्याची क्षमता, भाग बाजारातील गुंतवणुकीला चांगला परतावा मिळावा, तो किती काळ ठेवावा, कधी विकावा? इत्यादींचे अद्ययावत ज्ञान आर्थिक साक्षरतेत अभिप्रेत आहे.

भारतीय लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही वित्तीय संस्था, त्यातील सुरक्षित गुंतवणूक आणि लाभाचे प्रमाण यांपासून अनभिज्ञ असून संस्थात्मक वित्तीय सेवांच्या परिघाबाहेर आहे. ग्रामीण गरीब लोक पैसा मिळविण्यासाठी मोठे शारीरिक कष्ट उपसतात; पण त्यातून मिळणारा पैसा कसा उपयोगात आणावा? कोठे गुंतवावा? यांचे त्यांना फारसे ज्ञान नाही. त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रमात बचत करणे, आर्थिक जोखीम कमी करणे, वित्तीय निर्णय संपूर्ण माहितीसह घेणे, आर्थिक व्यवहार सोपे करणारे आवश्यक ज्ञान व माहिती देणारी साधनयंत्रणा उपलब्ध करणे इत्यादी आरबीआयद्वारे केले जाते. आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांची आर्थिक साक्षरता हे देशात परिणामकारक आर्थिक समावेशकता व समानता आणण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे. यासाठी ग्राहकांच्या आर्थिक साक्षरतेवर आणखी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

आर्थिक संतुलन साधणारे गुंतवणुकीचे काही ठळक पर्याय वर्तमानकाळात प्रचलित आहेत, ज्यांची माहिती सामान्यांना असल्यास आर्थिक व्यवहार फायदेशीरपणे यशस्वी होतील. जागतिकीकरणामुळे वित्तीय बाजार आणि आर्थिक व्यवहार एकीकडे व्यापक झाले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभाव आपल्या वैयक्तिक वित्तावर पडत आहे. याची दखल घेऊन गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

  • म्युच्युअल फंड (पारस्परिक निधी) : भविष्यकालीन परताव्यासाठी, स्थैर्य अपेक्षित असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. हा सामूहिक गुंतवणुकीचा प्रकार असून याद्वारे चांगल्या व्याजाचा परतावा मिळत असतो.
  • लोक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड – पीपीएफ) : मध्यमवर्गीय गुंतवणुकदारांमध्ये सर्वाधिक पसंतीची ही योजना आहे. या योजनेचा कार्यकाळ १५ वर्षे असून यामधील गुंतवणकीला सरकारची हमी आहे. यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत असून मुदतीअंती मिळणारी रक्कम करमुक्त आहे.
  • जेष्ठ नागरिक योजना : ही सर्वाधिक पसंतीची योजना असून ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना टपाल कार्यालय किंवा राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून या योजनेत सहभागी होता येते. या योजनेत ५ वर्षांची व त्यांनतर ३ वर्षांची मुदतवाढ मिळत असून यात किमान १५ लाख रुपये गुंतविता येतात.
  • राष्ट्रीय पेंशन योजना (नॅशनल पेंशन स्कीम – एनपीएस) : राष्ट्रीय पेंशन योजना ही दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना असून ती पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॅारीटीद्वारे चालविली जाते. ही योजना म्हणजे इक्विटी, मुदत ठेवी, औद्योगिक रोखे यांचा मिलाफ आहे.
  • केंद्रिय बँकचे रोखे : यास आरबीआय रोखे असेही म्हणतात. रिझर्व्ह बँकचे करपात्र रोखे हादेखील गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. हे रोखे डिमॅट फॉर्मच्या माध्यमातून घ्यावे लागतात.
  • वारसा संपत्ती : वारसाहक्काने मिळालेली जमीन व राहते घर ही कधीही गुंतवणूक समजू नये. एखादे नवीन घर, जागा किंवा शेतजमीन विकत घेतली, तर ती गुंतवणूक असते. भविष्यात या संपत्तीला किती किंमत येईल यावरून तिचा परतावा ठरत असतो.
  • सोने : सोन्यातील गुंतवणूक ही पूर्वापार, पारंपरिक गुंतवणूक आहे. सोन्याच्या आश्चर्यकारक रीत्या वाढलेल्या किमती गुंतवणुकदारांना प्रलोभन देणाऱ्या आहेत. भाग बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली; पण सोन्याच्या किमती सातत्याने इतक्या वाढत असताना त्यात गुंतवणूक करणे योग्य नाही. जे लोक कमी किंमत असताना सोन्यात गुंतवणूक करतात, त्यांना भविष्यात मोठा फायदा होताना दिसून येतो.
  • इंडिया पोस्ट पेमेंट बँक : आर्थिक सुधारणांमध्ये आणखी एक पाऊल म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक होय. ही योजना १ सप्टेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आली. डिजीटल क्रांतीच्या दिशेने टाकलेले हे एक भरीव पाऊल आहे. मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, थर्ड पार्टी ट्रान्सफर सेवा इत्यादींचा प्रचार व प्रसार यामार्फत यशस्वीपणे केला जात आहे.

आर्थिक साक्षरता ही चालू आर्थिक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांसाठी महत्त्वाची आहे. देशाचा निम्मा वाटा असणारा स्त्रीवर्ग आर्थिक साक्षर झाल्यास त्या दोन कुटुंब साक्षर करतात. त्या आर्थिक निर्णय स्वतः घेऊ लागतात. ग्रामीण क्षेत्रात बचतगट, स्वयंरोजगार, कौशल विकास योजना, शिक्षण यांमुळे अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढले आहे. उत्पन्नाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करण्यासाठी त्यांना आर्थिक साक्षरतेची गरज आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेद्वारा आर्थिक साक्षरता प्रचार व प्रसार मोहीम, तसेच वित्तीय साक्षरता सप्ताह साजरा केला जातो. उत्कृष्ट आर्थिक साक्षरतेचे कार्य करणाऱ्यास ‘आर्थिक साक्षर पुरस्कार’ दिला जातो.

वित्तीय साक्षरता कार्यक्रमांतर्गत अंतर्गत शेतकरी, असंघटित क्षेत्रातील श्रमिक वर्ग, सामान्य जन अधिकोषण प्रणालीमुळे कसे लाभान्वित झाले यावर प्रकाश टाकला जातो. शेतकरी, कामगार, आदिवासी वित्तीय साक्षर बनविले जातात. सर्व बँकांच्या ग्रामीण शाखेत प्रादेशिक व स्थानिक भाषेत आर्थिक साक्षरतेबाबत फलक लावले जाऊन उद्बोधन व मार्गदर्शन केले जाते. रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्रे, मासिके, अहवाल यांतून जाहिरात केली जाते. पथनाट्य व लोकगीत यांतून मौद्रिक योजनांबाबत जागरूकता आणली जात असून त्यास बऱ्याच प्रमाणात यश येत आहे. तसेच मर्यादित उत्पन्नात आवश्यक व अधिक गरजा पूर्ण करण्याबाबत उपाय सूचविले जात आहे. आर्थिक साक्षरता व कर्जसल्ला यांबाबत केंद्राद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे.

आर्थिक साक्षरतेचे अनेक फायदे आहेत. यामध्ये आर्थिक स्वावलंबन, ग्राहक संरक्षण, समाजाच्या वित्तीय व्यवहारातील बदल, आर्थिक विषमता कमी होणे, दूरदृष्टी विकसित होणे, निर्णय क्षमता वाढणे, आर्थिक सुरक्षितता व समाधानी वृत्ती वाढणे, तरुणाईला बचत व गुंतवणुकीची सवय लागणे, आत्मविश्वास वाढणे व भविष्य सुरक्षित होणे इत्यादींचा समावेश होतो. शोषणापासून मुक्ती मिळविणे, भ्रष्टाचार व अनियमिततेपासून सुटका करवून घेण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे.

औपचारिक शिक्षण आणि आर्थिक साक्षरता यांचा संबध अधिक दृढ झाल्यास आर्थिक साक्षरता ही संकल्पना अधिक यशस्वी होईल. आर्थिक व्यवहार व पैशात सुरक्षित वाढ हा आर्थिक साक्षरतेचा मुळ गाभा आहे.

समीक्षक : निर्मल भालेराव