भौतिक रसायनशास्त्रात दोन किंवा अधिक द्रवांचे मिश्रण असणाऱ्या द्रवाला पायस असे म्हणतात. या मिश्रणातील एक द्रव सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म थेंबाच्या (साधारणत: गोलाकार) स्वरूपात दुसऱ्या सलग द्रवात विखुरलेला असतो. पायस हे कलिलाचाच एक प्रकार आहे. परंतु, पायसात दोन्ही घटकद्रव्य द्रव अवस्थेत असतात. बहुतेकदा ते तेल-पाणी आणि पाणी-तेल या स्वरूपात असतात. अर्थातच तेल-पाणी पायसात तेल हे थेंबांच्या स्वरूपात अपस्कारित अवस्थेत असून पाणी हे सलग द्रव रूपात असते. याउलट पाणी-तेल स्वरूपाच्या पायसात असते. दैनंदिन वापरातील कित्येक पदार्थ हे पायस आहेत; उदा., दूध, अंड्याचा बलक, लोणी इत्यादी.
दोन द्रव एकत्र केले तरी काही वेळाने ते वेगवेगळे होऊन स्थिर होतात. स्थिर पायसे तयार करण्यासाठी या मिश्रणात पायसीकारके मिसळतात.
पायसातील थेंबांच्या द्रवांच्या आकारावरून सूक्ष्मपायस आणि अब्जांशपायस असे दोन प्रकार पडतात. सूक्ष्मपायसात थेंबांच्या द्रवांचा आकार १०–१०० नॅमी. एवढा असतो. तर अब्जांशपायसात याचा आकार ५०–५०० नॅमी. असतो. अब्जांशपायसाला सूक्ष्मातीत पायस असे सुद्धा म्हणतात.
अब्जांशपायस गतिज स्थिर असतात. त्यांच्या थेंबांच्या द्रवांची पृष्ठक्रियाकारकाची तीव्रता खूप जास्त असते. तसेच तापमान, श्यानता, पीएच मूल्य इ. बाबी अब्जांशपायसातील थेंब इष्टतम करण्यास साहाय्यकारी आहेत. आधुनिक प्रायोगिक पद्धतींचा (DLS, TEM आणि SEM) वापर करून अब्जांशपायस तयार करता येते.
अब्जांशपायसाची परिणामकारकता व क्रियाशीलता इतर पायसापेक्षा अधिक असल्याने अब्जांश वस्तूंच्या निर्मितीकरिता औषधनिर्माणशास्त्र, खाद्य उद्योग इ. क्षेत्रात त्याचे महत्त्व खूप वाढले आहे.
इतर पायसात कणांची संरचना मायसेली व एकसंध केंद्रकासारखी असते, तर अब्जांशपायसात थेंबांच्या स्वरूपात होत असल्याने अब्जांश वस्तूंच्या निर्मितीत अब्जांशपायस आधारित प्रक्रियांना समाविष्ट करण्यात येत आहेत. औषधनिर्माणशास्त्रात अब्जांशपायसातील तेलाचे थेंब जल-अविद्राव्य औषध वाहून नेणाऱ्या लाहन धारकासारखे काम करतात आणि पाणी मानवी शरीरास योग्य असे पूरक वातावरण उपलब्ध करते. शिवाय औषध वाहून नेणारी अब्जांशपायस औषधे शरीरात लवकर विरघळून नियंत्रित आकाराचे स्फटिक तयार करतात. खाद्यनिर्मिती उद्योगात अब्जांशपायसे पोषणद्रव्यांचा भरणा करण्यासाठी वापरतात त्यामुळे पोषणद्रव्यांना पचन करण्याची क्षमतासुद्धा सुधारते.
अब्जांशपायसाचा वापर सौंदर्यप्रसाधनात देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.
संदर्भ :
- https://app.in-part.com/technologies/zAM7VzG67n3B
समीक्षक : वसंत वाघ