शरीराचे आरोग्य हे प्रामुख्याने दातांच्या आरोग्यावर अवलंबून असते. ज्या व्यक्तींचे दात मजबूत व निरोगी असतात, त्यांचे आरोग्य सामान्यत: उत्तम असते. त्यामुळेच उत्तम आरोग्यासाठी दातांची चांगली व नियमितपणे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य ती काळजी न घेतल्यास अगदी लहान वयात देखील दातांना कीड लागून दात पडणे, त्यांतून पू येणे, हिरड्या कमकुवत होणे अशा समस्या उद्भवतात व त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळापर्यंत दिसून येतात. तसेच दातांची निगा नीट न राखल्यामुळे दातांचे बरेचसे रोग उद्भवतात. दाताला लागलेली कीड खोल मुळापर्यंत पोहोचली, तर वेळप्रसंगी मूळ दात काढून कृत्रिम दात बसवावा लागतो.

अब्जांश तंत्रज्ञान : दंतचिकित्सा

अब्जांश तंत्रज्ञानाने दंतरोगाचे निदान व उपचार आता अधिक सुलभ झाले आहेत. अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दंतरोग चिकित्सा, दातांच्या रोगावर नियंत्रण व तात्कालिक तसेच दीर्घकालीन उपचार या गोष्टी  ‘अब्जांश दंतवैद्यक विज्ञान व तंत्रज्ञान’ या शाखेत अंतर्भूत आहेत.

दातांची हिरड्यांच्या बाजूने झालेली झीज भरून काढण्यासाठी दंतवैद्य (Dentists) विशिष्ट प्रकारचे घट्ट द्रावण लावण्याचा सल्ला देतात. त्याने हिरड्यांना मसाज केल्यास हिरड्या मजबूत होण्यास मदत होते. दंत उपचार करण्यासाठी वापरले जाणारे द्रव तसेच घन पदार्थ अब्जांश कण मिश्रित असतात. यामध्ये चांदीचे ऑक्साईड (Ag2O) अथवा लोखंडाचे ऑक्साईड (Fe2O3) यांचा वापर केलेला असतो. विषाणू प्रतिबंधक नायट्रोजन-डोप्ड (Nitrogen doped) टिटॅनियम डायऑक्साईडचा (TiO2) वापर देखील मोठ्या प्रमाणावर होतो. अब्जांश तंत्रज्ञानावर आधारित ‘नॅनोबॉट्स’ (Nanobots) ही वैद्यक शाखा आता वेगाने विकसित होत आहे.

अब्जांश संमिश्र पदार्थ (Nanocomposites Materials) : दातांच्या उपचारासाठी अब्जांश पदार्थ मिश्रित राळेचा (Resins) वापर केला जातो. दंत उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक मिश्रणामध्येच अब्जांश मितीय (१ ते १०० नॅनोमीटर) कण मिसळलेले असतात. असे केल्याने मिश्रणाची परिणामकारकता लक्षणीय प्रमाणात वाढते. रोगप्रतिबंधक शक्ती व दातांची मजबुती वाढते. दातांची पोकळी भरून काढण्यासाठी देखील हे मिश्रण वापरतात.

अब्जांश संमिश्रित कृत्रिम दात (Nanocomposites Based Artificial Teeth) : अब्जांश पदार्थांचा वापर करून बनवलेले कृत्रिम दात हे ॲक्रिलिक (Acrylic) दातांपेक्षा टिकायला अधिक मजबूत असतात. शिवाय ते अधिक काळपर्यंत टिकतात.

दातांच्या किडीवर उपाय : सामान्यत: कॅल्शियम कार्बोनेट (Calcium carbonate) हा मुख्य घटक असलेली दातांची पेस्ट वापरून दांतांवर मुलामा चढवून दातांचे पुनर्वसन केले जाते. अब्जांश कुपीचा (Nanocapsule) वापर करून औषधे दातांमध्ये हळुवार सोडण्याच्या कार्यपद्धती आता विकसित केल्या आहेत. ट्रायक्लोझन अब्जांश कुपी (Triclosan Nanocapsule) तयार करून रोगांवरील उपचाराचा कालावधी कमी केला जातो आणि औषध वितरण योग्य त्या ठिकाणी करण्यास मदत होते. यामुळे आवश्यक तेवढीच मात्रा देता येते.

अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दातांची अंकीय प्रतिमा काढणे (Digital Imaging using Nanotechnology) : यामध्ये प्रस्फुरक अब्जांश फॉस्फर (Nanophosphor scintillator) याचा वापर करून औषधी मात्रा कमीत कमी प्रमाणात देऊन दातांची प्रतिमा घेतली जाते.

अब्जांश मेदयुक्त (Nanotissues) नवीन दात रोपण : यामध्ये पेशीय आणि खनिज घटकांसह पूर्णत: नवीन दात बसवता येतो. अब्जांश तंत्रज्ञान, अनुवांशिक अभियांत्रिकी (Genetic engineering) आणि ऊतक-अभियांत्रिकी (Tissue engineering) यांच्या एकात्मिक वापरांमुळे हे शक्य झाले आहे. दंत उपचारांसाठी जी यंत्रे वापरली जातात ती आता अगदी लहान आकारातील असतात. थोडक्यात यंत्रांचे देखील अब्जांशीकरण (Nanotization) झाले आहे असे म्हणता येईल.

एकूणच अब्जांश तंत्रज्ञानामुळे ‘दंतचिकित्सा व उपचार’ यांमध्ये सुलभता निर्माण झाली आहे.

संदर्भ :

  • Kovvuru S. K., Mahita VN, Manjun BS, Babu BS. Nanotechnology: The emerging science in dentistry. J Orofac Res. 2012;2:33–6. [Google Scholar]
  • Verma S. K., Prabhat KC, Goyal L, Rani M, Jain A. A critical review of the implications of nanotechnology in modern dental practice. Natl J Maxillofac Surg. 2010;1:41–4. [PMC free article][PubMed] [Google Scholar]
  • Nanotechnology in dentistry: Present and future Journal List Eur J Dent v.7(1); 2013 Jan PMC3571524

समीक्षक : वसंत वाघ