आधुनिक शास्त्रामध्ये आयुर्वेदिक भस्मे ही अब्जांश कणनिर्मित औषधे असल्याचे मानले जाते. अब्जांश तंत्रज्ञान या ज्ञानशाखेचा उदय आणि विकास जरी मुख्यत्वे गेल्या काही दशकांतील असला तरी अब्जांशकणांची निर्मिती आणि त्यांचा वापर अगदी प्राचीन काळापासून होत आहे, याचा उल्लेख पौराणिक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सापडतो. विविध धातू व उपधातू यांवर विशिष्ट प्रक्रिया करून ती भस्म स्वरूपात विविध आजारांमध्ये वापरता येतात, याबाबतची माहिती आयुर्वेदामध्ये आढळते. सोने, चांदी, जस्त अशा विविध धातूंपासून भस्म तयार करतात. पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा राजुरकर यांनी आयुर्वेदिक प्रणाली वापरून प्रयोगशाळेत भस्म तयार केले. अत्याधुनिक सुविधा असलेल्या उपकरणांच्या साहाय्याने त्याचे परीक्षण केले असता त्यांना असे नि:संदिग्धपणे आढळून आले की, आयुर्वेदिक भस्म हे असंख्य अब्जांश कणांपासून बनलेले आहे. यावरून असे लक्षात येते की, आयुर्वेदिक भस्मे म्हणजे प्राचीन काळात वापरली जाणारी अब्जांश औषधेच आहेत.

आयुर्वेदामध्ये औषधांचे वर्गीकरण हे मुख्यत: दोन प्रकारात करतात – (१) काष्ठऔषधी : या औषधी वनस्पतीजन्य असतात. (२) रसरसायन औषधी : यांमध्ये खनिजजन्य पदार्थ ‘भस्म’ स्वरूपात असतात.

आयुर्वेदानुसार विशिष्ट पद्धतीने औष्णिक व जैविक प्रक्रिया करून मोठ्या आकारातील धातू तसेच अधातूचे रूपांतर अब्जांश कणांमध्ये करण्यात येऊ शकते. जड धातू (Heavy Metals) आणि विषारी वनस्पतींच्या निर्विषीकरणासाठी (Detoxification) वापरण्यात येणाऱ्या प्रक्रियेला ‘संस्कार’ म्हणतात. ‘संस्कार’ प्रक्रिया पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने केली जाते.

(१) शोधन : या प्रक्रियेमध्ये वस्तूवर दाब देवून ती उच्च तापमानात तापवली जाते. त्यानंतर ती तात्काळ थंड द्रवामध्ये बुडवली जाते.

(२) जारण : भस्मीकरणातील ही पुढील प्रक्रिया अल्पद्रव्यांक (Low Melting Point) असणाऱ्या धातूंसाठी वापरण्यात येते. यामध्ये ज्या धातूचे अब्जांश कण बनवायचे आहेत त्याचा तुकडा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेऊन त्याच्या द्रव्यांक तापमानापर्यंत (Melting Point) तो गरम करतात. त्यानंतर त्यामध्ये १/४ भागापर्यंत विशिष्ट वनस्पतीची पावडर टाकतात. परिणामत: पदार्थाचे घन अवस्थेमध्ये रूपांतर होते.

(३) मारण : या प्रक्रियेमध्ये धातूचे नैसर्गिक गुणधर्म (Metallic Properties) सर्वप्रथम नष्ट केले जातात. त्यामुळेच या प्रक्रियेस ‘मारण’ म्हणतात. या प्रक्रियेमध्ये भस्म करावयाच्या धातूचा तुकडा कुकूटपागामध्ये ठेऊन गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांमध्ये तापवतात. तापवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर धातूचे भस्मीकरण झालेले दिसून येते.

भस्माचे निरीक्षण आणि परीक्षण : आयुर्वेदात भस्माचे निरीक्षण आणि परीक्षण याबाबतची माहिती आढळते. त्यावरून भस्माची गुणवत्ता कशी पडताळली जाते व त्याची उपयुक्तता याचे विवेचन आयुर्वेदात दिले आहे.

(१) वर्ण : प्रत्येक भस्माचा धातुनुसार विशिष्ट असा रंग असतो. उदा., लोह भस्म लालसर रंगाचा असतो. जर रंग लालसर नसेल तर भस्मीकरण योग्य रीतीने झालेले नाही असा निष्कर्ष काढता येतो.

(२) निशचंद्रातम : भस्माचे निरीक्षण सूर्यप्रकाशात करावे. तयार भस्मामध्ये मूळ धातूची चमक (metallic lustre) नसावी.

(३) वरितारा : या शब्दाचा अर्थ हलका आणि बारीक असा होतो. भस्मीकरण योग्य रीतीने झाले असल्यास ते पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते, अन्यथा नाही.

(४) रखपूर्णता : याचा अर्थ असा आहे की, हाताची तर्जनी (Index finger) या बोटाच्या पृष्टभागावर भस्म घेऊन हातावर मळले असता ते हाताच्या रेषांमध्ये सहजपणे समाविष्ट  होणारे असावे.

(५) स्लाक्षणतम : स्पर्शसंवेदनाच्या आधारे भस्माच्या गुणवत्तेची पारख करण्याची ही चाचणी आहे.

(६) सुसुक्षमा : ही भस्माच्या आकारासंबंधीची चाचणी आहे.

(७) अंजतासंनिभा : ही भस्माच्या गुळगुळीतपणावरून करावयाची चाचणी आहे.

भस्माचे औषधी उपयोग : भस्म हे विविध आजारांवर अतिशय प्रभावी औषध आहे. पुरातन काळात रोगचिकित्सा तसेच उपचार यासाठी तत्कालीन वैद्य भस्माचा वापर करीत असत. आयुर्वेदिक उपचार पद्धतीनुसार रोगावर उपचार करण्यासाठी भस्माचा वापर आजही मोठ्या प्रमाणावर केला जातो. ‘आयुर्वेद’ हे भारतीय उपखंडात ‘अथर्व’ वेदातून उदयास आलेले एक प्राचीन चिकित्साशास्त्र आहे. यात दिलेल्या चिकित्सा-प्रणालीमध्ये विविध औषधी वनस्पतींचा काढा अथवा तेल यांचा रोगनिवारणासाठी त्या काळात वापर होत असल्याचे उल्लेख आढळतात. तसेच रोग निवारणासाठी विविध प्रकारच्या धातूंचा व खनिजांचा वापर कसा करावा याबाबतची माहितीही या ग्रंथामध्ये दिली आहे.

रोगनिवारणासाठी भस्माचे विविध उपयोग याबाबतची माहिती सोबतच्या तक्त्यात दिली आहे.

अ. क्र. भस्म प्रकार धातु औषध प्रकार उपयोग
१. आयुर्वेदिक स्वर्ण भस्म : युनानी कुष्टतिल कलन सुवर्ण (Gold) बायोजिनीक अमाइन (Biogenic Amine) हृदय रोगांवर उपयुक्त, रक्तदाब नियंत्रण, रक्तवाढ, मेंदूवरील तणावमुक्तीसाठी प्रभावकारी, गर्भवती स्त्रियांसाठी हितकारक, नवजात बालकाला सुवर्णजल प्राशनासाठी उपयुक्त, नेत्र आरोग्यासाठी उपयुक्त.
२. रौप्य भस्म : युनानी तीब्व चांदी (Silver) ॲनाल्जेसिक (Analgesic)

ॲनक्शियालिटिक (Anxiolytic)

शरीरावरील सूज कमी करणे, वेदनाशामक, यौन-रोगांवर प्रभावशाली, मानसिक कमकुवतपणा कमी करणे, यकृताचे कार्य सुरळीत करण्यासाठी, आरोग्यास अपायकारक जिवाणूंचा नाश करण्यासाठी उपयुक्त.
३. ताम्र भस्म तांबे (Copper) यकृत-वृद्धीवर प्रभावी औषध, अल्सर व्याधीवर उपचारार्थ उपयुक्त, कफ नाशक, पचन-शक्ती सुधारणे, रक्तातील लाल पेशी (RBC) वाढीसाठी उपयुक्त, रक्तातील इतर घटकांचे प्रमाण नियंत्रित करणे, वसा नाशक.
४. अभ्रक भस्म अभ्रक (Mica) यकृताचे आरोग्य सुधारणे, श्वसन रोगावर नियंत्रण व उपचार, मानसिक दुर्बलता दूर करणे, आम्लपित्त नियंत्रित करण्यासाठी, धातूशीणता दूर करण्यासाठी उपयोगी, मलावरोधावर उपयुक्त.
५. शंख भस्म लहान आतड्यांच्या अल्सरवरील उपचारासाठी उपयुक्त, आम्लपित्तनाशक, पाचक, उत्तेजक, क्षुधा वर्धक, पोटाचे विकारावर हितकारक, यकृत-वृद्धीवर गुणकारी
६. जस्त भस्म झिंक (Zinc) मोतीबिंदू नियंत्रण, मधुमेह नियंत्रण, नेत्ररोग, श्वसनासंबंधीचे रोग यांवर अतिशय प्रभावशाली.
७. शिलाजीत शिलाजीत खनिज शारीरिक पेशी वृद्धी, जळजळ कमी करणे, मानसिक स्वास्थ्य वृद्धी, वार्धक्य लांबवणे, मधुमेह नियंत्रण, वारंवार लघवीचा त्रास (बहुमूत्रता) दूर करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे.
८. लोह भस्म लोखंड (Iron) हिमोग्लोबिन कमतरता (Anaemia) रक्तनिर्मितीसाठी उपयुक्त, रक्तक्षय (ॲनिमिया) या विकारावर प्रभावशाली, शरीरात विषारी जिवाणूंचा प्रसार होण्यास प्रतिबंध करणे, आमविकार (आंतड्यासंबंधीं होणारा रोग), क्षय, मूळव्याध, पित्तावर प्रभावी औषध.

पहा : भस्मे, आयुर्वेदीय.

संदर्भ :

  • https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/22561344/
  • https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6598822/
  • गोडबोले, अच्युत नॅनोदय, राजहंस प्रकाशन, २०११.

 

समीक्षक : वसंत वाघ