पाश्चिमात्य संगीतातील तोंडाने फुंकून वाजविण्याचे एक सुषिर वाद्य. हे वाद्य पितळ या धातूचे बनविलेले असून त्याच्या वेटोळ्या आकारात बसविलेल्या नळीची एकूण लांबी सु. सहा मीटर इतकी असते. या नळीचे दुसरे टोक मोठ्या कर्ण्याच्या आकाराचे असते. या वाद्याला ‘कॉर्नो’ किंवा ‘फ्रेंच हॉर्न’ असेही म्हणतात. या वाद्याचा उगम जर्मनीत झाला असला, तरीही हे वाद्य प्रचलित भाषेत ‘फ्रेंच हॉर्न’ म्हणूनच प्रसिद्ध आहे.

आवाजाच्या क्षमतेचा विचार करता, हॉर्न तिसऱ्या क्रमांकाचे वाद्य आहे. ट्रंपेट या वाद्याचा आवाज सर्वांत मोठा असतो; तर त्याच्या खालोखाल कॉर्नेट या वाद्याचा क्रमांक लागतो. पाश्चिमात्य वाद्य वर्गीकरणात हे वाद्य ‘ब्रास’ (पितळी) प्रकारात मोडते.

इंग्रजी ‘हॉर्न’ या शब्दाचा अर्थ ‘शिंग’ असा होतो. प्राचीन काळी माणसाने प्राण्यांच्या शिंगांचा वापर आवाजाची निर्मिती करण्यासाठी केला. प्राण्यांच्या शिंगांचा तुतारी म्हणून करीत असलेला उपयोग प्राचीन काळापासून प्रचलित आहे. बैलांची व म्हशींची शिंगे सामान्यत: याकामी उपयोगात येत असत. शिंगाच्या आतील मांसल द्रव्य (मॅरो) काढून निमुळते टोक कापल्यानंतर तेथे पोकळीचे भोक उघडे पडते. या भोकातून फुंकर मारतात. या वाद्याला शिंग म्हटले जाते. संस्कृत भाषेतील ‘शृंग’, तमिळ-कानडीतील ‘कोम्बु’ व तेलुगूतील ‘कोम्मू’ ही सर्व नावे हॉर्न–शिंग यास समानार्थी आहेत. धातूंचा शोध लागल्यावर मानवाने हे वाद्य सुधारित स्वरूपात पुढे आणले. कालमानानुसार त्यात अनेक तांत्रिक सुधारणा होत गेल्या आणि आधुनिक काळात त्यास सांप्रत एका वाद्याचे स्वरूप प्राप्त झाले. सुरुवातीची हॉर्न वाद्ये अतिशय साध्या प्रकारची होती. त्यांमध्ये एका पितळी नळीला मोजकेच वेटोळे दिलेले असत. नळीचे दुसरे टोक एखाद्या छोट्या कर्ण्याच्या आकाराचे असे. प्राचीन काळात प्राथमिक अवस्थेत या वाद्यांचा उपयोग प्रामुख्याने शिकारीच्या वेळी सावज उठविण्यासाठी केला जाई. तसेच लढाईत सैनिकांना हाक देण्यासाठी, विजय घोषित करण्यासाठी शिंग वाजवीत असत. म्हणून या वाद्याला ‘हन्टिंग हॉर्न’ (मृगयेचा कर्णा) असेही म्हटले जाई. त्यात स्वरावरील नियंत्रण पूर्णपणे ओठांच्या साहाय्यानेच म्हणजे ओष्ठ स्वनित करावे लागे. वाद्यवृंदात हॉर्नचा वापर सोळाव्या शतकात सुरू झाला. तेव्हा हे वाद्य ऑपेरामध्ये वाजविले जाई.

अठराव्या शतकात हॉर्न वादकांनी कर्ण्याच्या रचनेत तांत्रिक सुधारणा करून हात घालून स्वर नियंत्रित करण्याची पद्धती प्रचलित केली. जोसेफ कॅम्पबेलने (Joseph Campbell) १७५० च्या सुमारास हा प्रयोग प्रथम केला. पुढे झडपांचा वापर करून हे वाद्य अधिक सुरेल करण्याचे प्रयत्न झाले.

हॉर्न या वाद्यामधून ओठांच्या साहाय्याने एका बाजूला हवेचा दाब नियंत्रित करून आणि दुसऱ्या बाजूस पितळी नळीस जोडलेल्या झडपा हाताने नियंत्रित करून स्वरनिर्मिती केली जाते. या प्रकारच्या वाद्यांना बहुतांशी कळीने दाबता येण्याजोग्या फिरत्या झडपा असतात. पूर्वी या वाद्यामध्ये दट्ट्याने (पिस्टन) नियंत्रित होणाऱ्या झडपांचा वापर होत असे. त्यांना ‘व्हॉल्व्ह हॉर्न’ म्हणत. ‘व्हिएन्ना हॉर्न’ या वाद्याला दुहेरी दट्ट्याच्या झडपा असतात. झडपरहित हॉर्न वाद्यास ‘नैसर्गिक हॉर्न’ म्हणतात ( उदा., ब्यूगल – bugle). बहुतेक सर्व हॉर्न वाद्यांना तीन झडपा असतात. अशा वाद्यांना ‘एकेरी हॉर्न’ म्हणतात, तर चार झडपा असलेल्या वाद्यांना ‘दुहेरी हॉर्न’ म्हणतात. यांतील चौथी झडप अंगठ्याच्या साहाय्याने नियंत्रित केली जाते. याचा शोध एडमंड गम्पर्ट आणि फ्रित्झ क्रस्प यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लावला. पुढे ‘तिहेरी हॉर्न’चाही शोध लागला. त्यात पाच झडपा असतात.

हॉर्न हे वाद्य तसे वाजविण्यास कठीण समजले जाते. त्यातून स्वरनिर्मिती करण्यासाठी पुढील क्रिया करणे आवश्यक असते : १. वाद्यामध्ये तोंडाने फुंकर मारून हवा भरणे; २. ओठांची योग्य हालचाल करणे; ३. जिभेने टाळ्यावर योग्य दाब आणणे; ४. एका हाताच्या बोटांनी झडपा दाबणे; ५. दुसरा हात कर्ण्यावर ठेवून स्वर नियंत्रित करणे.

विख्यात हॉर्न वादकांमध्ये हर्मन बोमॅन (Hermann Baumann), डेनिस ब्रेन (Dennis Brain), डग्लस हिल (Douglas Hill), गुंथर शूलर (Gunther Schuller) इ. कलाकारांचा आणि रचनाकारांचा समावेश होतो.

पहा : वाद्य व वाद्यवर्गीकरण.

संदर्भ :

  • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश खंड २० (उत्तरार्ध), २०१५.

समीक्षक – सुधीर पोटे

#ओबो#बसून#फ्ल्यूट

प्रतिक्रिया व्यक्त करा