राजमोहिनी देवी : (७ जुलै १९१४ – ६ जानेवारी १९९४). छत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्त्या. त्यांचा जन्म प्रतापपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वीरसाय आणि आईचे नाव शीतला. त्या गौंड आदिवासीमधील मांजी जमातीतील होत्या. त्यांचे कोणतेही औपचारिक शिक्षण झालेले नव्हते. विवाहानंतर त्या गोविंदपूर येथे वास्तव्यास आल्या. गोविंदपूर येथूनच त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. १९५१ मधील सरगुजा येथील दुष्काळात त्यांनी आदिवासी लोकांचे झालेले हाल, आर्थिक प्रश्न, नशेचा प्रश्न, आदिवासी समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपराच्या विरोधात चळवळ सुरू केली. ती ‘राजमोहिनी चळवळ’ म्हणून ओळखली जाते. त्यांची ही चळवळ पूर्णतः गांधीवादी विचारधारेवर आधारित होती.
आदिवासी समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी गांधी विचारांचा प्रभावी उपयोग करून घेतला. त्यांनी १९५१ मध्ये ‘बापू धर्म सभा’ (बापू धर्म सभा आदिवासी सेवा मंडळ) स्थापन केली. या सभेची मुख्य चौदा तत्त्वे होती. त्यामध्ये खर्या धर्माचे अनुकरण करा, देवावर प्रेम करा, खादीचा प्रचार व वापर करा, चरखा चालवा, महू विकू नका आणि दारू ही जगाला हानिकारक आहे आदी प्रमुख तत्त्वांचा समावेश होता. विशेषतः दारूबंदी हे प्रमुख तत्त्व होते. आदिवासी समाजामध्ये दारूबंदीसंबंधी जाणीव जागृतीला प्राधान्य दिले पाहिजे यासाठी त्या आग्रही होत्या. या काळात आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती हलाखीची व अन्नधान्याची टंचाई होती म्हणून महूपासून दारू तयार करण्याऐवजी त्यापासून इतर पौष्टिक खाद्यपदार्थ बनवण्यासाठी त्यांनी समाजाला प्रेरित केले. हा त्यांचा उपक्रम त्या काळात फारच लोकप्रिय झाला. जवळपास ८०,००० लोक या चळवळीशी जोडले गेले. छत्तीसगडबरोबरच ही चळवळ पुढे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही सुरू झाली. १९६३-६४ मधील अखिल भारतीय दारूबंदी परिषदेमध्ये राजमोहिनी देवी यांनी लालबहादूर शास्त्री आणि मोरारजी देसाई यांच्यासमोर त्या संबंधी एक प्रभावी भाषण दिले, त्यामुळे हा त्यांचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर पोहोचला.
राजमोहिनी यांनी आदिवासी स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता तसेच अंधश्रद्धा निर्मूलन हे प्रमुख प्रश्नही हाताळले. मुलींच्या संमतिविरोधात लग्न करणे, वधुमूल्य देणे यांसारख्या प्रथांना विरोध करत मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रबोधन केले. १९७७ मध्ये त्यांनी आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी एक विद्यालय स्थापन केले. आदिवासी समाजात या काळात सुरू असलेल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांचे धार्मिक अतिक्रमण व धर्मांतराला त्यांनी प्रखर विरोध केला.
विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतून प्रेरणा घेऊन त्यांनी छत्तीसगडमधील सरगुजा भागात भूदान चळवळ सुरू केली. राजमोहिनी यांना ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय समाज सेवा पुरस्कार’ (१९ नोव्हेंबर १९८६); ‘पद्मश्री पुरस्कार’ (२५ मे १९८९) देऊन सन्मानित करण्यात आले.
सरगुजा येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृत्यर्थ बलरामपूर, सरगुजा येथे इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाद्वारे संचालित ‘राजमोहिनी देवी कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर अँड रिसर्च स्टेशन’ आणि अंबिकापूर येथे ‘राजमोहिनी देवी कन्या स्नातकोत्तर महाविद्यालय’ स्थापन केलेले आहे.
संदर्भ :
- Shrivatava, A. R. N., Tribal Freedom Fighters of India, Publication Division Ministry of Information and Broadcasting, New Delhi, 2017.
- जिंदल, सीमा सुधीर, सामाजिक क्रांति की अग्रदूत राजमोहिनी देवी, छत्तीसगड राज्य हिंदी ग्रंथ अकादमी, रायपूर, २०१३.
- चित्रसंदर्भ : https://www.gkcg.in/2018/06/gkcg-chhattisgarh-padma-bhushan-padma.html
समीक्षक : अरुण भोसले