हर्दवाणी, लछमण : (३ मे १९४२ – ९ ऑगस्ट २०२३) : लछमण परसराम हर्दवाणी. भारतातील सिंधी भाषेतील कोशकार, व्याकरणकार, भाषातज्ञ आणि सिंधी समाज आणि संस्कृतीविषयक आध्यात्मिक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक. बहुभाषा कोविद आणि अनुवादक अशी त्यांची मुख्य ओळख आहे. त्यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात झाला. भारताचे विभाजन झाल्यावर १९४८ मध्ये ते आई वडिलांबरोबर सिंध प्रांतातून भारतात आले. त्यावेळी त्यांचे वय सहा वर्षांचे होते. भारत सरकारतर्फे सिंधी समाजाला भारताच्या विविध प्रांतात निवास मिळाला होता. त्यांचे कुटुंब महाराष्ट्रातील अहमदनगर येथे स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण याच शहरात झाले. पहिली ते आठवीपर्यंत सिंधी व आठवी ते अकरावीपर्यंत मराठी माध्यमातून त्यांचे शिक्षण झाले. पुणे येथून त्यांनी हिंदी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. हिंदी विषयाचे व्याख्याते म्हणून त्यांनी अहमदनगरच्या अहमदनगर कॉलेजमध्ये ३५ वर्षे सेवा दिली. त्याच दरम्यान त्यांनी हिंदी विभागप्रमुख म्हणूनही कार्य केले. त्यांना सिंधी भाषेतील अरबी आणि देवनागरी अशा दोन्ही लिपी अवगत होत्या.

Lachman Hardwani

लछमण हर्दवाणी यांची साहित्यसंपदा

लछमण हर्दवाणी यांची साहित्यसंपदा बहुविध आहे. भारतीय भाषा आणि साहित्यात स्वातंत्रोत्तर काळात भाषाविषयक विकास झाला. प्रादेशिक भाषा राज्यघटनेत अधिसूचित करण्यात आल्या. त्यात सिंधी भाषेचाही समावेश आहे. कोश आणि अनुवाद या क्षेत्रात कार्य करणाऱ्या हर्दवाणी यांच्या साहित्यामुळे मराठी भाषा संस्कृती आणि सिंधी भाषा असा अनुबंध तयार झाला आहे. त्यांचे साहित्य हे सिंधी आणि मराठी भाषेत आहे. त्यांचे साहित्य पुढीलप्रमाणे

कोशसाहित्य:- इंग्रजी-सिंधी शब्दकोश, सिंधी-इंग्रजी शब्दकोश, सिंधी भक्तिसाहित्य शब्दकोश (२०१२), सिंधी समानार्थी शब्दकोश (२०१६), सिंधी- मराठी शब्दकोश, सिंधी अध्यात्म शब्दकोश; अनुवाद :- ज्ञानेश्वरी (सिंधी ), युगांत (इरावती कर्वे यांच्या ग्रंथाचे सिंधीत भाषांतर), स्मरणगाथा (गो. नी. दांडेकरांच्या मराठी आत्मकथनाचे सिंधीत भाषांतर), संत तुकाराम जी अभंगवाणी, मनोबोध (सिंधी), मन जा श्लोक, दासबोध (सिंधी); व्याकरण :- सिंधी मुहावरा (२००९), नओ सिंधी व्याकरण (२०१४ ); चरित्रलेखन :- श्री.अण्णा महाराज, स्वामी भगतराम महाराज, इष्टदेव झुलेलाल, बाबा गेलाराम ; भाषाविषयक :- चला सिंधी शिकू या (मराठी), सिंधी पहाका ऐं चवणियूं (२०१२), सिंधी अखरमाला (२०१७), सिंधी भाषा विज्ञान कोश (२०१४ ); आध्यात्मिक : सिंधी संतनि कविमुनी जी अमृतवाणी, अनमोल वचन साई संत रामदास वचनावली, सामीआ जा श्लोक ,सचल सरमस्त जी कविता इत्यादी.

अनुवादविषयक कार्य

मराठी, हिंदी, सिंधी या तिन्ही भाषांमधून आवडलेले आणि समाजासाठी महत्त्वाचे उद्बोधन करणाऱ्या साहित्याचे तीनही भाषांमधून परस्पर भाषांतर हे लछमण हर्दवाणी यांचे महत्त्वपूर्ण कार्य होय. ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतील अभिजात ग्रंथ. या ग्रंथाचा त्यांनी सिंधी भाषेमध्ये अनुवाद केला. मनाचे श्लोक, दासबोध तसेच तुकाराम महाराजांचे काही निवडक अभंग त्यांनी सिंधीत अनुवादित केले. हा अनुवाद सहश्लोक न करता त्यांनी गद्य स्वरूपात केला. तिन्ही भाषांत परस्पर अनुवाद केलेली सुमारे ७० पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. निवृत्तीनंतर पुणे शहरात स्थायिक झाल्यावर अनुवादाचे हे कार्य त्यांनी अधिक गतीने केले. मराठी साहित्य आणि संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असणारे ग्रंथ हे सिंधी भाषेत अनुवादित झाल्याने एका मोठ्या भाषिक आणि सांस्कृतिक विकासाला त्यांनी चालना दिली.

भाषा आणि लिपीविषयक कार्य

लछमण हर्दवाणी हे देवनागरी सिंधी लिपीचे समर्थक होते. भारत-पाक फाळणीनंतर सिंधी समाजाच्या भाषिक संदर्भात भारताच्या केंद्र सरकारने देवनागरी सिंधी लिपीला मान्यता दिली. जे अरबी सिंधी लिपीचे समर्थक होते त्यांनी न्यायालयात जाऊन आपली भूमिका मांडल्यामुळे सरकारने दोन्ही लिपींना मान्यता दिली. त्यामुळे शिक्षण व साहित्य क्षेत्रात दोन्ही लिपीत लेखन होऊ लागले. अरबी लिपीचे समर्थक आपल्याच लिपीला प्राधान्य देऊ लागले. हा संघर्ष साहित्य अकादमी अनुवादाचे पुरस्कार देताना उद्भवला. देवनागरी सिंधी लिपीत लिहिणाऱ्यांना साहित्य अकादमी पुरस्कार योजनांचा लाभ देईना, फक्त अरबी सिंधी लिपीतील पुस्तकांनाच पुरस्कार देण्याची परंपरा चालू ठेवल्याने लछमण हर्दवाणी यांनी निषेध व्यक्त केला. जर न्यायालय दोन्ही लिपींना मान्यता देते तर पुरस्कार देताना दुसरा नियम लावणे अन्यायकारक आहे. हर्दवाणी यांनी या अन्यायकारक निर्णयाविरोधात संघर्ष केला. १९९२ साली इरावती कर्वे यांच्या युगांत या मराठी पुस्तकाचे सिंधी भाषेतील भाषांतराबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हाच पुरस्कार त्यांनी आपल्या संघर्ष काळात परत केला.

पहिली ते आठवीपर्यंत अरबी लिपीत सिंधी शिकवली पाहिजे हे सर्व सिंधी माध्यमिक शाळांना सक्तीचे करण्यात आले होते. वर्णमाला लिहिताना क्रम उलटा सुलटा, उजवीकडून-डावीकडे, डावीकडून-उजवीकडे म्हणजे दोन्ही लिपींत गोंधळ, साम्य नाही अशी यासंदर्भात स्थिती होती. सिंधी भाषेतील शासकीय आणि शैक्षणिक पातळीवरील लेखन देवनागरी लिपीत व्हावे यासाठीही त्यांनी कार्य केले. सिंधी भाषा आज प्रामुख्याने अरबी लिपीत लिहिली जाते; परंतु दीडशे वर्षांपूर्वी ती देवनागरी लिपीत लिहिली जात होती. इ. स. १८५३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सिंधी लिपी निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली, या समितीने काही अरबी व काही फारसी लिपीतले वर्ण एकत्र करून तिसरी एक वेगळी लिपी तयार केली, ती सध्याची अरबी सिंधी लिपी होय. सिंधी भाषा ही देवनागरीतच शुद्ध रीतीने लिहिता येते कारण, मुघलांच्या आक्रमणात अरबी लिपी सिंधी भाषेवर लादली गेली अशी लछमण हर्दवाणी यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी अनेस्ट ट्रॅम्प यासारख्या भाषातज्ज्ञांचे ऐतिहासिक पुरावेही सादर केले आहेत. महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती) या संस्थेत हर्दवाणी यांनी लिप्यंतर, अनुवाद करण्याचे तसेच धडे लिहिण्याचे काम केले होते. बालभारतीत आधी अरबी लिपित नंतर देवनागरीत सिंधी भाषेची पुस्तके तयार होतात. व्याकरणातील संज्ञा अरबी लिपीप्रमाणे देवनागरीत दिल्या जातात. या सर्व प्रकारांमध्ये पुस्तकात अनेक चुका आढळतात. सिंधी भाषेतील पुस्तकांसाठी साधारण २००८ साली प्रा.लछमण हर्दवाणी यांची तज्ज्ञ समितीत निवड झाली. त्यांनी अभ्यास मंडळापुढे अशा मर्यादा दाखवल्या आहेत.

भाषा आणि कोशकार्य

इंग्रजी भाषेच्या आधिपत्यामुळे भारतातील अनेक भाषा संकटात आहेत. सिंधी या भाषेचीही तीच अवस्था असल्याने सिंधीची नवी पिढी मातृभाषेपासून दूर जात असल्याने लछमण हर्दवाणी खूप अस्वस्थ असायचे. त्याचसाठी त्यांनी चला सिंधी शिकू या आणि अचो सिंधी सिखूं, आईये सिंधी सिखे यांसारखी पुस्तके लिहिली. गणेश देवी यांनी संपादित केलेल्या भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण- महाराष्ट्र या ग्रंथात सिंधी भाषेविषयीच्या लेखात लछमण हर्दवाणी यांनी सिंधी भाषेचा कार्यकाळ, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, बालगीत, लोककथा अशा बऱ्याच बाबींचा अभ्यास लेखरूपाने मांडला आहे. इतर भाषांमध्ये ज्या प्रमाणे भाषाविज्ञान संज्ञा संकल्पना विषयक अभ्यासपूर्ण ग्रंथ आहेत, त्याचप्रमाणे असा ग्रंथ सिंधी भाषेत असावा या उद्देशाने त्यांनी सिंधी भाषा विज्ञान कोश हा ग्रंथ साकार केला आहे. या ग्रंथामध्ये कोशात्मक पद्धतीने सिंधी भाषेत भाषाविज्ञानातील संज्ञा यांचे विवेचन केले आहे. शब्दकोश आणि ज्ञानकोश या दोन्ही प्रकारात हर्दवाणी यांचे योगदान आहे. सिंधी, मराठी आणि हिंदी या भाषांतील समानार्थी शब्दकोश त्यांनी संपादित केले आहेत. मधुकर तोरडमल यांच्या थिएटर ग्रुपमध्ये सामील होऊन मराठी शब्दांचे शुद्ध उच्चार ते तेथे शिकले. मराठी व सिंधी भाषेत किमान ५००० शब्द समानार्थाचे व समान उच्चारांचे आहेत, ही बाब त्यांच्या कोशकार्यामुळे अभ्यासकांसमोर आली आहे.

आध्यात्मिक लेखन

सिंधी संस्कृतीमध्ये आध्यात्मिक विचार प्रबळ आहे. हर्दवाणी यांची मनोभूमिका ही आध्यात्मिक विचाराच्या अधिक जवळ जाणारी होती. मराठी संस्कृतीतील संत ज्ञानेश्वर, संत रामदास आणि संत तुकाराम यांच्या साहित्याचा अभ्यास आणि अनुवाद करून त्यांनी सिंधी भाषेत महत्त्वाचे कार्य केले आहे. शिवाय सिंधी समाजमनाला देवतुल्य असणाऱ्या संत झुलेलाल, संत गेलाराम, स्वामी भगतराम यांच्या जीवन आणि तत्त्वज्ञान याविषयी आध्यात्मिक लेखन त्यांनी केले आहे. अभ्यास आणि तर्कशुद्धता यामुळे त्यांच्या लेखनाला समाजमान्यता आहे.

मानसन्मान

इरावती कर्वे यांच्या युगांत या मराठी ग्रंथाच्या सिंधी भाषेतील भाषांतराबद्दल त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला (१९९२). दिल्ली येथील राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद या संस्थेतर्फे साहित्य सन्मान व जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय स्थानिक पातळीवरील अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. मराठी आणि सिंधी या भाषा आणि संस्कृतीमध्ये एक अनुबंध निर्माण करून भाषा अभ्यासक आणि वाचक यांच्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले.

पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : हर्दवाणी, लछमण, चला सिंधी शिकू या, अनमोल प्रकाशन ,पुणे.

समीक्षक : न. म. जोशी