स्वादुपिंड : स्थान व रचना.

मानवी पचन संस्थेतील अन्नमार्गालगत असणारी विकरे व संप्रेरके स्रवणारी ही एक महत्त्वाची ग्रंथी आहे. या ग्रंथीला अग्निपिंड असेही म्हणतात. मानवी स्वादुपिंड उदरगुहेच्या वरील बाजूच्या डाव्या पोकळीमध्ये असते. त्याची वरची बाजू आद्यांत्राला चिकटलेली असते, तर मधला व खालचा भाग प्लीहेपर्यंत (पाणथरी; spleen) पोहोचलेला असतो. याचा पृष्ठभाग त्रिकोणी खंडिकायुक्त असून रंग फिकट गुलाबी असतो. या ग्रंथीचे वजन सु. ८० ग्रॅ. व लांबी १२–१५ सेंमी. इतकी असते. स्वादुपिंडाचे शीर्ष, शरीर व पुच्छ असे तीन भाग केलेले आहेत.

स्वादुपिंडाचा शीर्षभाग हा आद्यांत्राच्या (Duodenum) घडीमध्ये असतो. स्वादुपिंड आतड्यास रक्तपुरवठा करणाऱ्या धमनी/रोहिणी (Artery) व शीर/नीला (Vein) यांभोवती लपेटल्यासारखे  दिसते. स्वादुपिंडाच्या मागील बाजूस अधोमहाशिरेचा आधार असतो. स्वादुपिंडाच्या पुढील बाजूस उदरच्छद पटल (Peritoneal membrane) आणि मोठ्या आतड्याचे यकृत वळण (Transverse colon) व डावे वळण (Horizontal colon) असते.

स्वादुपिंडाच्या मागील बाजूस महाधमनी, प्लीहा शीर, डावी मूत्रपिंड/वृक्क शीर (Kidney), ऊर्ध्व आंतरबंधीय शीर यांसारख्या अनेक रक्तवाहिन्यांचे जाळे असते. खालील बाजूस आद्यांत्राचा शेवटचा भाग व मध्यांत्राचा सुरुवातीचा भाग असतो. स्वादुपिंडाचा पुच्छभाग निमुळता असतो. स्वादुपिंड अनेक खंडिकापासून (Pancreatic lobules) बनलेले असते. एका खंडिकेमध्ये अनेक कोष्ठिका (Acini) असतात. कोष्ठिका समूह एखाद्या द्राक्षाच्या घडाप्रमाणे दिसतो. कोष्ठिकेपासून आंतरकोष्ठिका वाहिन्या एकत्र येऊन स्वादुरस वाहिनी बनते.

कोष्ठिका रचना

शरीरातील स्रावी ग्रंथीचे बहि:स्रावी व अंत:स्रावी असे दोन प्रकार आहेत. स्वादुपिंड ग्रंथी अंत:स्रावी तसेच बहि:स्रावी अशा दोन प्रकारची कार्ये करते. बहि:स्रावी ग्रंथीतील स्राव नलिकेमधून आवश्यक ठिकाणी वाहून नेला जातो. बहि:स्रावी ग्रंथी म्हणून कार्य करताना ती पचनसंस्थेसाठी आद्यांत्रात पाचक स्राव स्रवते. अंत:स्रावी ग्रंथीतील स्राव थेट रक्तात मिसळतो. या ग्रंथीतील स्राव वाहून नेण्यासाठी नलिका नसतात. त्यामुळे त्यांना नलिकाविरहित ग्रंथी असे म्हणतात. या नलिकाविरहित ग्रंथीमधून संप्रेरके स्रवतात. स्वादुपिंडातील ९५% पेशी बहि:स्रावी असून त्यातून विकरे स्रवतात; तर केवळ २% पेशी अंत:स्रावी असून त्यातून संप्रेरके स्रवतात. तुलनेने स्वादुपिंडात संयोजी ऊतींचे प्रमाण कमी आहे.

स्वादुपिंड कोष्ठिका पेशीमधून विकरे (Enzymes) स्रवतात. स्वादुरस वाहिनी पेशीमध्ये सोडियम बायकार्बोनेट स्रवते. मुख्यत्वे तीन विकरे स्वादुपेशीमध्ये स्रवतात. ट्रिप्सीन व कायमोट्रीप्सीन ही प्रथिन विघटक, लायपेझ मेद विघटक आणि अमायलेझ स्टार्च व कर्बोदक विघटक असतात. स्वादुपिंडातून स्रवणारी विकरे व सोडियम बायकार्बोनेट यांच्या मिश्रणास स्वादुपिंड रस असे म्हणतात. ट्रिप्सीन व कायमोट्रिप्सीन विकरे स्वादुपिंड पेशीत अप्रभावी कणांच्या स्वरूपात तयार होतात (Zymogen granules). स्वादुनलिकेतून आद्यांत्रात गेल्यानंतर अप्रभावी विकर कणांचे प्रभावी विकरामध्ये रूपांतर योग्य त्या माध्यमात होते. यासाठी आद्यांत्रात स्रवणाऱ्या काही संप्रेरकांची मदत होते. लायपेझ हे विकर मेद घटकाचे मेदाम्ले व ग्लिसरॉल यामध्ये विघटन करते. यासाठी पित्तरसाची आवश्यकता असते. स्वादुपिंडात स्रवणाऱ्या अमायलेझमुळे स्टार्चचे माल्टोझ रेणूमध्ये विघटन होते.

कोष्ठिकांनी वेढलेली लांगरहान्स द्वीपके

स्वादुपिंडाच्या कोष्ठिकाबाहेर असलेल्या संयोजी ऊतीमध्ये काही पेशींचे समूह विखुरलेले असतात. हे पेशीसमूह लहान बेटांसारखे दिसत असल्याने त्यांना द्वीपक/द्वीपिका (Islet) असे म्हणतात. स्वादुपिंडामधील अशा पेशीसमूहांचा शोध लांगरहान्स या वैज्ञानिकांनी लावल्याने या पेशीसमूहास ‘लांगरहान्स द्वीपके’ असे म्हणतात. द्वीपक पेशीमधील स्राव कोणत्याही नलिकेशिवाय सरळ रक्तात मिसळतो. द्वीपकांमध्ये आल्फा, बीटा आणि डेल्टा अशा तीन प्रकारच्या पेशी असतात. बीटा पेशींची संख्या सर्वाधिक असून त्या इन्शुलिन स्रवतात. तुलनेने कमी संख्येने असलेल्या आल्फा पेशीतून ग्लुकागॉन (Glucagon) नावाचे संप्रेरक स्रवते. अगदी तुरळक असलेल्या डेल्टा पेशीमध्ये सोमॅटोस्टॅटिन (Somatostatin) संप्रेरक  तयार होते. इन्शुलिनमुळे रक्तातील ग्लुकोज पेशीमध्ये प्रवेश करते. त्यावर पेशींचे पोषण व ऊर्जानिर्मिती अवलंबून असते. जर रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी झाली तर ग्लुकागॉन आल्फा पेशीमधून स्रवते. याच्या प्रभावाने यकृतातील ग्लायकोजेनचे विघटन होऊन त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. रक्तातील ग्लुकोजाची पातळी सामान्य ठेवण्यासाठी ही दोन्ही संप्रेरके आवश्यक आहेत. डेल्टा पेशीमध्ये स्रवणारे सोमॅटोस्टॅटिन संप्रेरक इन्शुलिन व ग्लुकागॉन यांचे नियंत्रण करते. त्याचबरोबर वृद्धी संप्रेरकाच्या कार्यास प्रतिबंध करते. द्वीपक समूहात तुलनेने कमी असणाऱ्या जी-पेशी (G-cell) गॅस्ट्रिन (Gastrin) संप्रेरक स्रवतात. गॅस्ट्रिनमुळे कोष्ठिका पेशी अधिक स्वादुस्राव स्रवतात. उदरपोकळीतील धमन्यांच्या वाहिन्यांमधून स्वादुपिंडाला भरपूर रक्तपुरवठा होतो.

पहा : अग्निपिंड (पूर्वप्रकाशित), मोठे आतडे.

संदर्भ :

  • https://www.pancreapedia.org › reviews › anatomy-and-histology-of-pancr
  • https://www.britannica.com/science/pancreas
  • https://www.sciencedirect.com › science › article › pii

समीक्षक : नंदिनी देशमुख