आंत्रमार्गाच्या मोठ्या व रूंद भागाला मोठे आतडे अथवा बृहदांत्र म्हणतात. लहान आतड्यामध्ये अन्नाचे पचन व शोषण होऊन राहिलेला अन्नांश सर्वांत शेवटी मोठ्या आतड्यात उघडतो. मोठे आतडे हे सु. १.५ मी. लांब व ६-७ सेमी. व्यासाचे असते. मोठ्या आतड्यातील अंतस्त्वचा अन्नातील पाणी मोठ्या प्रमाणात शोषून घेते, त्यामुळे न पचलेल्या अन्नाचे रूपांतर घट्टसर मलामध्ये होते व नंतर तो मल गुदद्वारातून विसर्जित होतो.
मोठ्या आतड्याचे त्याच्या स्थानाप्रमाणे अनेक भाग केले आहेत. आतडे एकच असले तरी लहान आतड्याचा शेवट व मोठ्या आतड्याचा प्रारंभ जेथे होतो तेथे वर्तुळाकार स्नायूंची झडप असते. लहान व मोठ्या आतड्याच्या जोडाच्या खालील बाजूस सु. १० सेंमी. लांबीचे आंत्रपुच्छ (Appendix) असते. याच्या जवळ थोड्या खालील बाजूस एक कप्प्यासारखा भाग असतो यास अंधनाल (Caecum) म्हणतात. अंधनालाच्या वरील बाजूपासून मोठ्या आतड्याचा पहिला भाग उदर पोकळीमधून यकृताच्या दिशेने जातो. वरील दिशेने जात असल्याने त्यास आरोही मोठे आतडे म्हणतात. मोठ्या आतड्याची नलिका येथून यकृताच्या मागील बाजूस जाऊन उजवीकडे वळते. याला यकृत वळण किंवा उजवे वळण म्हणतात. उजव्या वळणानंतर मोठे आतडे डाव्या बाजूस प्लीहेजवळ आलेले असते. येथे जठराजवळ मोठ्या आतड्याचे डावे वळण सुरू होते. यानंतर मोठ्या आतड्याचा हा भाग आता खालील बाजूस येतो, यास मोठ्या आतड्याचा अवरोही भाग म्हणतात. हा भाग कमरेच्या माकड हाडाच्या जवळून कमरेच्या हाडामधून खाली येतो, या भागास मलाशय म्हणतात. यामध्ये न पचलेले अन्न म्हणजे मळ साठून राहतो. मलाशयानंतर येणाऱ्या शेवटच्या भागास गुदांत्र / गुदाशय (Rectum) म्हणतात आणि गुदांत्राचा बाह्य भाग म्हणजे गुदद्वार (Anus) होय. बाहेरील बाजूने मोठ्या आतड्याचे अनेक लहान-लहान खंडांमध्ये विभाजन झाल्याचे दिसून येते. या भागांमधून सावकाश अन्न पुढील भागांत सरकत जाते. अन्न सर्वांत अधिक काळ मोठ्या आतडयात साठून राहते.
गुदांत्राच्या भित्तिकेत वर्तुळाकार परिसंकोची स्नायू (Sphincter muscle) असतात. हे स्नायू सतत आकुंचन स्थितीत असतात. गुदांत्रामध्ये मल साठल्यावर ते थोड्या काळासाठी शिथिल होतात. मोठ्या आतड्याच्या या भागांत असलेल्या मलावर दोन प्रकारच्या स्नायूंचे नियंत्रण असते. आतील मार्गाच्या भित्तिकेमध्ये वलयी स्नायू असतात. हे स्नायू मल पुढे ढकलत असतात. बाह्य गुदमार्गाभोवती असलेल्या भित्तिकेत गुदद्वाराभोवती असलेले ऐच्छिक स्नायू नेहमी आकुंचित असतात. मोठ्या आतड्यास स्वायत्त चेतासंस्थेकडून अनुकंपी प्रेरक चेता व परानुकंपी चेतांचा पुरवठा होतो. यांच्या प्रेरणांमुळे याची क्रमसंकोची हालचाल होते व मल पुढे सरकवले जाते. मलविसर्जनावेळी व्यक्तीच्या इच्छेनुसार ते सैल होऊन मलविसर्जन होते.
मोठ्या आतड्यास ऊर्ध्व आंत्रबंधीय (Superior mesenteric) व अधोआंत्रबंधीय (Inferior mesenteric) या दोन धमन्यांमधून रक्तपुरवठा होतो. मोठ्या आतड्याच्या भिंती श्लेष्मल स्तर, अधिश्लेष्म स्तर, स्नायू स्तर आणि पर्युदर यांनी बनलेल्या असतात. श्लेष्मल स्तरामुळे बृहदांत्रात वाढणाऱ्या सूक्ष्मजंतूंपासून आतील ऊतींचे संरक्षण होते. इथे घट्ट झालेल्या मलाच्या घर्षणामुळे या ऊतींची झीज होत असते, त्यामुळे त्यांची नियमितपणे नवनिर्मिती होत असते.
कार्य : मोठ्या आतड्याच्या आतील आवरणामध्ये अन्नातील पाणी व क्षार शोषून घेतले जातात. मोठ्या आतड्याच्या आतील पोकळीत (अवकाशिकेत) असलेले जीवाणू किण्वनाद्वारे जीवनसत्त्व के, थायमीन, रिबोफ्लाविन यांची निर्मिती करत असतात, त्यांचेही शोषण इथे केले जाते. तसेच हे जीवाणू न पचलेल्या अन्नाचे किण्वन तर करतातच शिवाय रोगप्रतिकारक यंत्रणेमध्ये आणि शरीरस्वास्थ्याशी समन्वय देखील साधतात, असे संशोधनात आढळून आले आहे. मानवी आहारात विविधता आहे. आहारातील विविध घटकांनुसार जीवाणू विकसित होतात. नेहमीच्या आहारातील बदल किंवा आतड्याच्या आतील थराचा दाह किंवा मोठ्या प्रमाणात प्रतिजैविके घेतल्यामुळे जीवाणूंचा नाश होतो. जीवाणूंची पुन्हा वाढ होईपर्यंत पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. आहारातील तंतुमय पदार्थांमुळे मल पाणी शोषून घेते, त्यामुळे त्याचे आकारमान वाढते. त्यामुळे मलविसर्जनास मदत होते. ज्यांच्या आहारात तंतुमय पदार्थ कमी असतात, त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. अशा पद्धतीने तयार झालेला मल हा गुदांत्रामध्ये साठवला जातो व नंतर बाहेर टाकला जातो.
पहा : आंत्र (पूर्वप्रकाशित), बृहदांत्रशोथ (पूर्वप्रकाशित), मलोत्सर्ग (पूर्वप्रकाशित).
संदर्भ :
- https://www.britannica.com/science/large-intestine
- https://medlineplus.gov › ency › imagepages
- https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK507857/
समीक्षक : नंदिनी देशमुख