
यकृत ही मानवी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे. यकृत हा शब्द संस्कृतमधील ‘यं करोति इति यकृत’ म्हणजेच नियमन किंवा नियंत्रण करणारी ग्रंथी अशा अर्थाने घेण्यात आला आहे. यकृताचा आकार पाचरीसारखा (wedge shaped) असून ते पोटाच्या पोकळीत (उदरगुहेत) उजव्या बाजूस श्वासपटलाखाली चिकटलेले असते. त्याची लांबी सु. ३० सेंमी. व रुंदी १५ सेंमी. असते. पुरुषांमध्ये यकृताचे वजन १.४–१.८ किग्रॅ., तर स्त्रियांमध्ये १.२–१.४ किग्रॅ. असते. गर्भावस्थेत प्रौढावस्थेपेक्षा त्याचे आकारमान पुष्कळ मोठे असते. शरीराच्या एकूण आकारमानाचा विचार करता बालकांचे यकृत तुलनेने मोठ्या आकाराचे असते. यकृत रंगाने लालसर-करडे, दाबून पाहिल्यास घट्ट व लवचिक परंतु, भुसभुशीत व सहज विदारित होणारे असते. यकृतामध्ये रक्तवाहिन्यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्याला जखमा झाल्यास अती रक्तस्रावाची नेहमीच शक्यता असते.
रचना : यकृताचा उजवीकडील भाग रुंद, तर डावीकडील भाग अरुंद असतो. यकृताचा उजवा खंड मोठा, तर डावा खंड लहान असतो. मुख्य यकृताच्या खाली आणखी दोन लहान खंड असतात. यकृताचा उजवा खंड वगळता संपूर्ण यकृतावर पर्युदराचे (उदरच्छदाचे; Peritoneum) आवरण असते. यकृत हे जठर, आद्यांत्र (Duodenum) व श्वासपटल यांच्याशी घड्यांनी जोडेलले असते.
यकृत अनेक खंडिकांपासून (Lobule) बनलेले असते. प्रत्येक खंडिकेस मधाच्या पोळ्यातील कोठड्यांच्या आकाराप्रमाणे सहा बाजू असतात. मानवी यकृतातील खंडिकांची संख्या सु. १०,००,००० असते. यकृत पेशींचे गुच्छ (Cords of hepatic cells) खंडिकेच्या मध्यभागातून फुलांच्या गुच्छाप्रमाणे निघालेले दिसतात. खंडिकेच्या मध्यभागी ‘मध्यवर्ती शीर (मध्यशीर)’ असते. दोन शेजारी असलेल्या खंडिकांमध्ये असलेल्या पोकळ्यांना सुषिका (Sinusoid) म्हणतात. सुषिकेमध्ये रक्त साठते, यास रक्त कोटर (Blood sinus) म्हणतात.

सुषिकेच्या भित्तिकेवर कुफ्फर पेशी (Kupffer cells) असतात. या पेशी भक्षक पेशी आहेत. यकृताच्या रक्तप्रवाहात आलेल्या क्षीण तांबड्या पेशीचे विघटन कुफ्फर पेशीमध्ये होते. तांबड्या पेशीतील हीमोग्लोबिनच्या विघटनातून लोह (Haem) वेगळे होते. ग्लोबिन प्रथिनाच्या बहुपेप्टायडांचा देखील पुन्हा नव्या हीमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी वापर होतो. यकृत पेशीतील बिलिरुबिनपासून (Bilirubin) पित्त तयार केले जाते. याशिवाय लहान आतड्यातून रक्तप्रवाहाबरोबर शोषले गेलेल्या जीवाणूंचे भक्षण कुफ्फर पेशीमध्ये होते. यकृतात एकूण पेशींपैकी सु. २०% पेशी एककेंद्रकी पेशी व कुफ्फर पेशी असतात. कोणत्याही मार्गाने शरीरात आलेल्या विषारी घटकांचे निर्विषीकरण करणे हे कुफ्फर पेशींचे महत्त्वाचे कार्य आहे.
यकृत पेशींचे गुच्छ, रक्त कोटरे व खंडिकांच्या रचनेमुळे यकृतामध्ये स्पंजाप्रमाणे रक्त साठलेले असते. प्रत्येक दोन खंडिकामध्ये असलेल्या जागेत अत्यंत कमी व्यासाच्या सूक्ष्म पित्त केशिका (Bile capillary) असतात. यकृत पेशीमध्ये स्रवलेले पित्त केशिकेतून पित्त वाहिनिकेमध्ये (Ductule) येते. अनेक पित्त वाहिनिका एकत्र येऊन यकृत पित्त वाहिनी तयार होते. यकृत पित्त वाहिनीची एक शाखा पित्ताशयात उघडते. यकृताच्या खालील बाजूस पित्ताशय चिकटलेले असते. पित्त सामायिक पित्त वाहिनीतून पित्ताशयाकडे व पुढे आद्यांत्राकडे नेले जाते.

यकृत खंडिका हा यकृताचा कार्यकारी घटक आहे. सर्व कोटरिका आणि त्यांच्या भोवतीच्या अनेक यकृत पेशी पट्टिकांनी मिळून यकृत खंडिका बनलेली असते. यकृत पेशी बहुभुजाकृती आकाराच्या असतात. त्यांच्या बाजूंपैकी अनेक बाजू कोटरिकांना लागूनच असतात. तसेच त्यांची एक बाजू पित्त केशिकेशी लागून असते. यकृत खंडिका ढोबळमानाने लांबट षट्कोनी आकाराची असून तिचा व्यास ०.८–२ मिमी. असतो. प्रत्येक खंडिकेमध्ये पित्तवाहक नलिका, यकृत प्रवेशद्वार शीर व यकृत धमनीची एकतरी शाखा तसेच लसीका वाहिन्या आणि कर्पर चेतेच्या (Cranial nerve) शाखा असतात.
यकृत धमनी (Hepatic artery) व यकृत प्रतिहारी शीर (Hepatic portal vein) या दोन रक्तवाहिन्यांतून यकृतास रक्तपुरवठा होतो. अन्नमार्ग व प्लीहा यांच्या भोवती असलेल्या केशवाहिन्या एकत्र येऊन प्रतिहारी शीर तयार होते. अन्ननलिकेतील शोषलेली द्रव्ये, औषधे, मेदाम्ले, विषारी पदार्थ या शिरेतून यकृतात प्रवेश करतात. यकृत प्रतिहारी शिरेच्या यकृतामध्ये पुन्हा शाखा-उपशाखा तयार होऊन त्यातील रक्त सुषिकेमध्ये साठते.
कार्य : रक्त गोठण्यासाठी आवश्यक फायब्रिनोजेन (Fibrinogen) व शरीरांतर्गत रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठू न देणारे हिपॅरिन (Heparin) ही महत्त्वाची द्रव्ये यकृतात तयार होतात. तसेच रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रोथ्रोंबिन (Prothrombin) सारखीच इतर अकरा द्रव्ये यकृतातच तयार होतात. अतिरिक्त ग्लुकोजपासून ग्लायकोजेन तयार करणे व आवश्यकतेनुसार यकृत किंवा यकृत पेशीमध्ये शरीरातील सु. पाचशे कामे केली जातात. एकूण ऑक्सिजनपैकी २०% ऑक्सिजन यकृतामध्ये वापरला जातो. यकृत पेशीमध्ये अमिनो अम्ल, प्रथिने, कर्बोदके व मेदाम्ले यांचे विघटन होते. एका वेळी यकृतात सु. १०० ग्रॅ. ग्लायकोजेन साठवून ठेवलेले असते. जेव्हा पुरेसे ग्लुकोज अन्नातून उपलब्ध नसते तेव्हा या ग्लायकोजेनपासून मिळालेले ग्लुकोज शरीराची ऊर्जेची गरज भागवते. अतिरिक्त ग्लुकोजपासून ग्लायकोजेन व ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर या दोन्ही क्रिया यकृत पेशीमध्ये होतात. तसेच अमिनो अम्लापासून ग्लुकोज व अमिनो अम्ल चयापचयातून यूरियाची निर्मिती फक्त यकृत पेशीमध्येच होते. अन्नातून मिळालेल्या अमिनो अम्लापासून दहा अमिनो अम्लांची निर्मिती यकृतामध्ये होते.

गर्भाच्या पहिल्या बत्तीस आठवडे काळात यकृत तांबड्या रक्तपेशीची निर्मिती करते. त्यानंतर तांबड्या पेशी अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. रक्त बिंबिका (Blood platelet) तयार होण्यासाठी आवश्यक संप्रेरक यकृतात तयार होते.
यकृत पेशी तांबड्या पेशींच्या विघटनातून व पित्त क्षार यांच्या एकत्र येण्यातून अन्नपचनासाठी आवश्यक असलेला पित्तरस तयार करतात. पित्तामध्ये अन्नपचनासाठी कोणतेही विकर (Enzyme) नसले तरी मेद, मेदामध्ये विघळणारी अ, ब, ड, ई व के जीवनसत्त्वे फक्त पित्तामुळे आतड्यात शोषली जातात. शरीरास आवश्यक अनेक घटक यकृत पेशीमध्ये साठवले जातात. यामध्ये ग्लायकोजेन (१०० ग्रॅ.), एक ते दोन वर्षे पुरेल एवढे अ जीवनसत्त्व, एक ते चार महिने पुरेल एवढे ड जीवनसत्त्व, तीन ते पाच वर्षे पुरेल एवढे ब१२ व के जीवनसत्त्व, लोह आणि तांबे यांचा समावेश होतो.
विकार : यकृत अनेक जीवनावश्यक कार्ये करत असल्यामुळे ते रोगग्रस्त झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. यकृताचे कार्य थांबले तर मृत्यू ओढवतो. यकृताचे अनेक रोग सुरुवातीच्या काळात वेदनारहित असतात आणि सहजासहजी लक्षात येत नाहीत. यकृताच्या अनेक रोगांमध्ये कावीळ होणे, हे मुख्य लक्षण असते. जेव्हा रक्तातील बिलीरुबीन वाढते तेव्हा कावीळ उद्भवते. वाढलेल्या बिलीरुबीनमुळे त्वचा पिवळसर दिसू लागते आणि डोळ्याची बुबुळे पिवळी दिसू लागतात. जर यकृत पेशी रक्तातील बिलीरुबीन वेगळे करू शकल्या नाहीत, तर कावीळ होते. काही वेळा, पित्तखड्यांमुळे यकृत-स्वादुपिंड सामाईक पित्तवाहिनीचा मार्ग बंद होतो. परिणामी, पित्तामध्ये बिलीरुबीन उत्सर्जित होण्याची क्रिया रोखली जाते आणि कावीळ होते.
यकृताच्या दाहाला यकृतदाह (Hepatitis) म्हणतात. विषाणू किंवा जीवविषामुळे यकृतदाह होतो आणि त्याची तीव्रता वाढल्यास मृत्यू ओढवतो. काही वेळा निरोगी यकृत पेशींच्या जागी घट्ट व कठीण ऊती तयार होतात, याला यकृत काठिण्यता (Liver cirrhosis) म्हणतात. त्यामुळे यकृताची कार्ये करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाऊन मृत्यू येतो. अतिमद्यपान हे यामागील मुख्य कारण असते. यकृत पेशींमध्ये मद्यातील अल्कोहॉलाचे रूपांतर ॲसिटाल्डिहाइडमध्ये होते आणि ते यकृतात साठून राहते. साठलेले ॲसिटाल्डिहाइड यकृत पेशींसाठी घातक असते. त्यामुळे यकृत काठिण्यता उद्भवते.
मनुष्याच्या इंद्रियांपैकी यकृत हे एकमेव इंद्रिय असे आहे की ज्यामध्ये हानी किंवा रोगग्रस्त झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी तयार होतात आणि यकृत पुन्हा कार्य करू शकते. यकृताच्या रोगाची तीव्रता वाढू लागल्यास डॉक्टर रुग्णाच्या यकृताचा बाधित भाग शस्त्रक्रियेने काढून टाकतात आणि एखाद्या दात्याच्या निरोगी यकृताचा भाग त्याजागी जोडतात. उदा., एखाद्या बालकाचे यकृत रोगग्रस्त झाल्यास डॉक्टर एखाद्या निरोगी प्रौढ व्यक्तीच्या यकृताचा लहान भाग काढून बालकाच्या यकृतावर प्रतिरोपण करू शकतात. प्रौढाच्या यकृताची वाढ वेगाने होऊन ते मूळच्या आकारमानाइतके वाढते, तर बालकाचे नवीन यकृत त्याच्या वयानुसार वाढते.
संदर्भ :
- https://www.britannica.com › science › liver
- https://ib.bioninja.com.au/options/option-d-human-physiology/d3-functions-of-the-liver/liver-structure.html
समीक्षक : नंदिनी देशमुख
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.