आंतरराष्ट्रीय व्यापारात निर्यातदारास आयातदाराकडून होणाऱ्या खरेदीपोटी हमी देण्यासाठी वापरण्यात येणारे एक महत्त्वाचे साधन. यास ‘कागदोपत्री पत’ (डॉक्युमेंट्री क्रेडिट) म्हणूनही ओळखले जाते. पतपत्र ही एक व्यवस्था आहे, ज्यामधे बँक ग्राहकाच्या विनंतीनुसार पुढील प्रमाणे कार्यवाही करते. (१) तृतीय पक्षास अर्थात लाभार्थ्यास (निर्यातदारास) देयके दिली जातात किंवा (२) लाभार्थ्यांनी काढलेल्या हस्तांतरणीय हुंड्या स्वीकारल्या जातात किंवा त्यास हुंड्या दिल्या जातात किंवा (३) अशा देयकांना इतर बँकेकडून (विक्रेता किंवा निर्यातदाराच्या बँकेकडून) निश्चित केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे मान्यता दिली जाते.

पतपत्रामध्ये प्रामुख्याने पुढील तीन पक्षकार असतात.

  • (१) अर्जदार व्यक्ती (माल खरेदीदार/आयातदार) तिच्या बँकेकडे पतपत्रासाठी अर्ज करते.
  • (२) बँक जोखमीचा व अर्जदाराच्या कुवतीचा विचार करून त्याच्याकडून तारण घेते.
  • (३) लाभार्थी माल विकणाऱ्या (निर्यातदार) व्यक्तीला अशा पतपत्राचा लाभ मिळणार असतो; कारण पतपत्रातील करारानुसार व्यवहार केला गेला, तर खरेदीदाराची बँक पतपत्राच्या स्वरूपात त्यास पैसे निश्चितपणे मिळतील असे लेखी वचन देते. या प्रमुख तीन पक्षकारांशिवाय सल्लागार बँक (ॲडव्हायसींग बँक), खात्री करणारी बँक (कन्फर्मिंग बँक) नामनिर्देशित बँक (नॉमिनेटेड बँक) असे इतर पक्षकारही गरजेनुसार सहभागी होतात. पतपत्र उघडण्यामुळे जसा माल विकणाऱ्याला फायदा होतो, तसाच तो खरेदीदारासही होतो; कारण असे पतपत्र उघडताना खरेदीदार मालाविषयीच्या ज्या अटी घालतो, त्यानुसार विक्रेत्याने माल पाठविला तरच त्याची बँक बिलांचे पैसे विक्रेत्याला देते.

पतपत्रांचे प्रकार :

  • कागदोपत्री पतपत्रे (डॉक्युमेंटरी लेटर्स ऑफ क्रेडिट) : असे पतपत्र उघडताना त्यामधे विशिष्ट अटी घातलेल्या असतात. त्याखाली काढलेल्या हुंडीसोबत मालाच्या मालकीबाबतची कागदपत्रे म्हणजे जहाजावर चढविलेल्या मालाची पावती (बील ऑफ लँडिंग), विमा प्रमाणपत्र, मालाचे बील (इन्व्हॉईस), मूळ उत्पत्तीचे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन्स) इत्यादी जोडणे आवश्यक असते. अशा पतपत्रांना कागदोपत्री पतपत्रे म्हटले जाते. अशी कागदपत्रे माल विकणाऱ्याने पावतीसोबत जोडल्याशिवाय आणि त्यांची काळजीपूर्वक तपासणी केल्याशिवाय बिलाचे पैसे अदा केले जात नाहीत. अशी पतपत्रे ती उघडणाऱ्या बँकेच्या नावाने हस्तांतरित केलेली असल्याने त्या बँकेला त्या मालावर हक्क प्राप्त होतो.

जर वरीलप्रमाणे कागदपत्रे बीलासोबत जोडण्याची अट नसेल, तर अशा वेळी उघडलेल्या पतपत्रांना विनाअट पतपत्र (क्लिन लेटर्स ऑफ क्रेडिट) असे म्हटले जाते. अशी पतपत्रे फक्त उत्तम पत असलेल्या ग्राहकांसाठीच बँक उघडते.

  • निश्चित आणि चक्रीय पतपत्रे (फिक्स्ड अँड रिव्होल्विंग लेटर्स ऑफ क्रेडिट) : निश्चित पतपत्र उघडणारी बँक एकूण रक्कम आणि मुदत यांविषयीची अट त्यामधे नमूद करते; तर चक्रीय पतपत्र उघडणारी बँक त्यापोटी बीलाचे पैसे एका वेळेस जास्तीत जास्त किती येणे राहू शकेल, याची मर्यादा निश्चित करते आणि एका बीलाचे पैसे दिल्यावर त्याच पतपत्राखाली पुनःपुन्हा नवीन बीले (निश्चित केलेल्या मर्यादेनुसार) स्वीकारते.
  • रद्द होणारी आणि रद्द न होणारी पतपत्रे (रिव्होकेबल अँड इरिव्होकेबल लेटर्स ऑफ क्रेडिट्स) : पतपत्र उघडताना जर त्यामधे त्या पतपत्राखालील जबाबदारी केव्हाही रद्द होईल किंवा त्यामध्ये बदल केला जाईल अशा पतपत्रास रद्द होणारी पतपत्रे असे म्हटले जाते; परंतु अशा पतपत्रांमुळे मालाची खरेदी करणाऱ्या ग्राहकास खऱ्या अर्थाने संरक्षण मिळत नाही, तर रद्द न होणाऱ्या पतपत्रांद्वारे खरेदीदारास पूर्ण संरक्षण मिळते.
  • लाल आणि हिरव्या रंगातील सूचना असणारी पतपत्रे (रेड अँड ग्रीन क्लॉझ लेटर्स ऑफ क्रेडिट) : काही वेळा माल पाठविणाऱ्यास मालाच्या उत्पादनासाठी किंवा प्रक्रिया व मालाची बांधणी करून माल पाठविण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. अशा वेळी त्यास दिलेल्या कर्जाला बांधणीपत (पॅकिंग क्रेडिट) असे म्हटले जाते. माल पाठविणाऱ्याच्या नावाने पतपत्र उघडताना जी बँक त्याच्याकडून मालाची कागदपत्र घेणार असेल (पतपत्रासाठीची सल्लागार बँक), त्या बँकेला अशा प्रकारची बांधणीपत देण्याचेही अधिकार पतपत्रातून दिले जातात. त्यासाठी पतपत्रामध्ये लाल रंगात तशी सूचना समाविष्ट केली जाते. असे कर्ज देणारी बँक नंतर बीलांचे पैसे बनावट करून वसुली करते; तर हिरव्या रंगातील सूचना असणारे पतपत्र हे लाल रंगातील सूचना पतपत्राचा विस्तार आहे. यामधे वखारीची पावती सुरक्षितता म्हणून प्राप्त केली जाते.
  • हस्तांतरणीय पतपत्र (ट्रांस्फरेबल लेटर्स ऑफ क्रेडिट) : या पतपत्राद्वारे प्रथम लाभार्थी नामनिर्देशित केलेल्या बँकेला एक किंवा अधिक लाभार्थ्यांना पतपत्र हस्तांतरित करण्याची विनंती करतो. अशी पतपत्रे उघडणाऱ्या बँकेस हस्तांतरण करणारी बँक असे म्हटले जाते.
  • आयात पतपत्र (ट्रान्सपोर्ट लेटर्स ऑफ क्रेडिट) : हे पतपत्र म्हणजे, भविष्यकालीन तारखेला होणाऱ्या आयातीचे पैसे अदा करण्याची पतपत्र उघडणाऱ्या बँकेनी दिलेली खात्री असते.

पतपत्र उघडताना घ्यायची काळजी : पतपत्र उपडणाऱ्या बँकेची जबाबदारी निश्चित असल्यामुळे पतपत्र उघडताना बँकेने कोणत्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे, ते पुढील प्रमाणे सांगता येते.

  • माल खरेदी करणाऱ्या ग्राहकाने (आयातदाराने) बँकेकडे पतपत्र उघडण्यासाठी अर्ज करताना ते कोणाच्या फायद्यासाठी आहे, याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे पतपत्रापोटी देणाऱ्या बीलांचे पैसे बँकेने दिल्यानंतर ते पैसे व शुल्क सदर बँकेला परत करण्याचे आश्वासन आयातदाराने दिले पाहिजे.
  • पतपत्राची रक्कम, प्रकार, त्याखाली आयात करण्यात येणाऱ्या मालाची माहिती, किंमत व अटी, माल पाठविण्याच्या तारखा, मालाची कोणती कागदपत्रे घेतली जातील इत्यादींचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.
  • आयातदाराने परदेशातून माल खरेदीसाठी आयात परवाना घेतला आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • पतपत्र उघडताना अर्जदाराकडून ठेवीच्या किंवा इतर तारण स्वरूपात काही रक्कम किरकोळ/दुरावा (मार्जीन) म्हणून घेण्यात यावी.
  • आयातदाराने मालाच्या किमतीइतका वीमा उतरवून विमा प्रमाणपत्र स्वतःच्या व बँकेच्या संयुक्त नावाने काढला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय व्यापारामधे आयात-निर्यात करणाऱ्या कंपन्या, व्यापारी आस्थापना अशा पतपत्रांचा उपयोग करीत असल्याचे आढळून येते. पतपत्रांच्या विविध प्रकारांपैकी आयात-निर्यात व्यवहारांची कागदपत्रे हस्तांतरित करून अर्थात कागदपत्री पतपत्रांचा अधिकाधिक वापर होत असल्याचे दिसून येते.

संदर्भ : बापट, विनायक विष्णू, बँक व्यवहारकोश, पुणे, २००६.

समीक्षक : सुहास महाजन