जर्मनीची राजधानी बर्लिन शहरात १९३६ साली झालेली ११ वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडासामने. जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व हुकूमशाह अॅडॉल्फ हिटलर (१८८९-१९४५) याच्या अमलाखाली झालेली ही स्पर्धा ऐतिहासिक ठरली. दि. १ ते १६ ऑगस्ट १९३६ या कालावधीत संपन्न झालेल्या या स्पर्धेत भारतासह ४९ देशांनी सहभाग घेतला. यजमान जर्मनीने ३६ सुवर्णपदके जिंकून अमेरिकेला मागे टाकले. जर्मन खेळाडूंनी अॅथलेटिक्ससह मुष्टियुद्ध, तलवारबाजी, सायकलिंग, अश्वारोहण, हॅन्डबॉल या क्रीडाप्रकारांत सोनेरी यश संपादन केले. स्पर्धेत अमेरिकेने दुसरा, तर हंगेरीने तिसरा क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावीत हॉकीत सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद कायम राखले, यासाठी प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू ध्यानचंद (१९०५-१९७९) यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
बर्लिन शहरास १९१६ मध्ये सहाव्या ऑलिम्पिक आयोजनाचा मान मिळाला होता; परंतु पहिल्या महायुद्धामुळे हे ऑलिम्पिक रद्द झाले. पुढे बार्सेलोना (स्पेन) येथील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या २९ व्या वार्षिक बैठकीत बर्लिन शहराला ऑलिम्पिकचे यजमानपद बहाल करण्यात आले (२६ एप्रिल १९३१). ऑलिम्पिकसाठी बर्लिन शहर जेव्हा प्रत्यक्ष जाहीर झाले, तेव्हा पुढे होणार्या राजकीय उलथापालथीची कल्पना नव्हती. जानेवारी १९३२ मध्ये हिटलर जर्मनीचा चॅन्सलर होताच सार्या देशाचा जणू कायापालट झाला. हिटलरशाहीत स्पर्धा होऊ नये म्हणून सुरुवातीला अमेरिकेने स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली, पण विरोध मावळताच तिने स्पर्धेत सहभाग नोंदविला. बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धा हे नव्या हुकूमशाहीचे जाहिरातमाध्यम म्हणून वापरण्यात आले. स्पर्धेत सर्वत्र जर्मन सत्तेच्या स्वस्तिक चिन्हाचा वापर व लष्करी संचलने झाली. विलोभनीय उद्घाटन सोहळ्यातही हिटलरने आपल्या लष्करी सामर्थ्याचे शक्तिप्रदर्शन घडवले.
ऑलिम्पिकच्या उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत सतत प्रेरणा देणारी क्रीडाज्योत सर्वप्रथम १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये प्रज्वलित झाली. ग्रीस येथील प्राचीन ऑलिम्पिकच्या स्थळापासून सूर्यकिरणाने ज्योत प्रकाशित करण्यात आली. ही ज्योत ग्रीस, बल्गेरिया, यूगोस्लाव्हिया, हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया व यजमान जर्मनी अशा सात देशांत सु. ३००० किमी. (१८३७ मैल) प्रवास पूर्ण करून बर्लिन येथील मुख्य क्रीडागार (स्टेडियम) मध्ये प्रज्वलित करण्यात आली. बर्लिनपासून सुरू झालेली ही प्रथा ऑलिम्पिकचे एक प्रेरणादायी वैशिष्ट्यच बनले. स्पर्धेचे उद्घाटन हिटलरने केले. जर्मन अॅथलीट फ्रिट्झ शिल्गेन (१९०६-२००५) याने क्रीडाज्योत प्रज्वलित केली. जर्मन वेटलिफ्टर रूडॉल्फ इस्मायर (१९०८-१९९८) याने खेळाडूंच्यावतीने शपथ घेतली. उद्घाटन सोहळ्याला इंग्लंड आणि अमेरिकेचे संघ अनुपस्थित होते. या स्पर्धेसाठी साडेचार लाख तिकिटे विकली गेली हा विक्रमच होता. “मी जगातील तरुणांना आमंत्रण देतो” हे स्पर्धेचे बोधवाक्य होते.
स्पर्धेत १२९ क्रीडाप्रकारांमध्ये ३९६३ खेळाडूंनी पदकांसाठी शर्थ केली. यामध्ये ३६३२ पुरुष व ३३१ महिला खेळाडूंचा समावेश होता. जलतरण, अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, होडी शर्यत (कॅनॉइंग), फुटबॉल, तिरंदाजी, जिम्नॅस्टिक्स, तलवारबाजी, सायकलिंग, अश्वारोहण, हँडबॉल, हॉकी, मॉडर्न पेंटॅथ्लॉन, पोलो, सेलिंग, नेमबाजी, वेटलिफ्टिंग व कुस्ती या १९ खेळांचा समावेश होता. यांपैकी कॅनॉइंग, बास्केटबॉल, हँडबॉल या खेळांचा प्रथमच समावेश करण्यात आला, तर पोलो खेळाच्या दृष्टीने ही स्पर्धा अखेरची ठरली.
स्पर्धेला प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात दिलेली प्रसिद्धी हे बर्लिन ऑलिम्पिकचे वैशिष्ट्य ठरले. विविध स्पर्धांचे निकाल दाखवण्यासाठी ‘टेलेक्स ट्रान्समिशन्स’ (संदेश संचारण) पद्धतीचा प्रथमच वापर करण्यात आला. जर्मन नागरिकांना ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा मोफत पाहता याव्यात यासाठी प्रथमच दूरचित्रवाणीचा वापर करण्यात आला. शहरातील सु. २५ नाट्यगृहांत दूरचित्रवाणीचे भव्य पडदे उभारण्यात आले.
बर्लिन स्पर्धेतील अॅथलेटिक्सच्या मैदानात एकाच स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकण्याचा इतिहास अमेरिकन खेळाडू जे. सी. ओवन्झ (१९१३-१९८०) याने घडविला. १०० मी., २०० मी. धावणे, लांब उडी आणि रिले शर्यतीत ओवन्झने पराक्रम गाजवला. २०० मी. शर्यतीत त्याने नोंदविलेला २०.७ सेकंदाचा विक्रम १९६० पर्यंत अबाधित राहिला होता. या चार सुवर्णपदकांपैकी तीन सुवर्णवदके ओवन्झने एकाच दिवशी जिंकून सर्वांना चकित केले. स्पर्धेतील हिटलरची उपस्थिती लक्षवेधी ठरली. अनेक मैदानात तो पाहुणा म्हणून हजर असे आणि पदकविजेत्यांशी हस्तांदोलन करी. स्पर्धेत प्रथम पदकविजेत्याचा मान एका जर्मन खेळाडूला मिळाला, तेव्हा हिटलरने त्याच्याशी हस्तांदोलन करून अभिनंदन केले, पण ओवन्झ विजेता असला तरी कृष्णवर्णीय म्हणून हिटलरने हस्तांदोलन करण्याचे नाकारले.
स्पर्धेत अमेरिकेच्या १३ वर्षीय मार्जोरी गेस्ट्रिंग (१९२२-१९९२) हिने स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग (उसळफळीवरून पाण्यात सूर मारणे) मध्ये सुवर्णपदक पटकावले. अल्पवयात ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घातलेली ती पहिली महिला ठरली. डॅनिश जलतरणपटू इंग सोरॅनसॅन (१९२४-२०११) हिने २०० मी. ब्रेस्टस्ट्रोक (पोहण्याची गोल हात पद्धत) मध्ये वयाच्या १२ व्या वर्षी कांस्यपदक जिंकले. वैयक्तिक क्रीडाप्रकारात ही कामगिरी करणारी ती सर्वांत लहान खेळाडू होती. ऑलव्हर हेलेसी (१९०९-१९४६) या हंगेरियन दिव्यांग खेळाडूने वॉटरपोलो (पाण्यातील सांघिक खेळ) मध्ये सुवर्णपदक जिंकले. वयाच्या ११ व्या वर्षी एका रेल्वे अपघातात हेलेसीने आपला डावा पाय गमवला होता. कृत्रिम पाय लावून तो हंगेरीच्या वॉटरपोलो संघात खेळला आणि पदकविजेता ठरला.
बर्लिन स्पर्धा भारतीयांसाठी सुवर्ण आनंद देणारी ठरली. हॉकीत भारताने हंगेरीचा ४-०, अमेरिकेचा ७-०, जपानचा ९-०, फ्रान्सचा १०-० गोलने धुव्वा उडवून अंतिम फेरीत मजल मारली. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत यजमान जर्मनी विरुद्ध भारत अशी झुंज रंगली. दस्तुरखुद्द हिटलरच्या साक्षीने भारताने जर्मनीचा ८-१ गोलने पराभव करून सुवर्णपदक व जागतिक अजिंक्यपद पटकावले. यापूर्वी १९२८ च्या अॅम्स्टरडॅम व १९३२ च्या लॉस अँजेल्स ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके पटकावली होती.
बर्लिन ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनीही ठसा उमटविला. भारताच्या सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघात पुण्यातील खडकी येथे राहणार्या हॉकीपटू बाबू निमल व ज्यो फिलिप्स यांचाही सहभाग होता. दोघांनीही ध्यानचंद यांना गोल करण्यासाठी योगदान दिले होते. निमल हे आघाडी फळीत खेळणारे होते. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी खडकी भागात हॉकी खेळ सुरू केला. कालांतराने खडकी हे हॉकीचे माहेरघर बनले. यातूनच पुढे निमल आणि फिलिप्स हे ऑलिम्पिक खेळाडू उदयास आले. बर्लिन स्पर्धेसाठी अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे २७ जणांचे पथक निमंत्रणावरून गेले होते. तेथे त्यांनी कबड्डी व खो-खो या भारतीय खेळांची प्रात्यक्षिके सादर करून क्रीडाशौकिनांची मने जिंकली.
बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धा सुरुवातीपासूनच वादात होती. १९३४ साली हिटलर जर्मनीचा अध्यक्ष झाला आणि त्याने जर्मनीत एक नेता, एक पक्ष, एक वंश असे धोरण स्वीकारले. हिटलरच्या वर्णद्वेषी धोरणांमुळे बर्लिन ऑलिम्पिकवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बहिष्कार घालण्याची चर्चा सुरू झाली. अमेरिका, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, स्वीडन, नेदरलँड्स आदी देशांनी बहिष्काराला समर्थन दिले. सामूहिक बहिष्काराच्या दबावातून नाझी विचारसरणीचा प्रसार होणार नाही, अशी हमी हिटलरकडून घेण्यात आली; तथापि पुढे बहिष्कार चळवळही अयशस्वी झाली आणि हिटलरही दिलेले आश्वासन पाळण्यास अपयशी ठरला. स्पर्धेदरम्यान नाझी राजवटीने त्यांची वर्णद्वेषी धोरणे पुढे लादण्याचा प्रयत्न केला. अनेक ज्यू खेळाडूंना याचा अनुभव आला. बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धा तणावपूर्ण राजकीय वातावरणात संपन्न झाल्या.
संदर्भ :
- Sanyal, Saradindu, ‘Olympic Games and India’, Delhi, 1970.
- Shirer, William, L., ‘Rise and Fall of the Third Reich : A History of Nazi Germany’, 1981.