महाराष्ट्र राज्याच्या साक्री (जि. धुळे) तालुक्यातील एक प्रमुख गाव. लोकसंख्या २३,३६२ (२०११). हे गाव धुळे या शहराच्या पश्चिमेस सुमारे ८० किमी., तर साक्रीच्या पश्चिम नैर्ऋत्येस २४ किमी. वर असून मुंबईच्या उत्तर ईशान्येस सुमारे २९५ किमी. वर आहे. पिंपळनेर हे गाव पांझरा नदीकाठी समुद्र सपाटीपासून सुमारे २१५ मी. उंचीवर वसलेले असून २०११ च्या जनगणनेनुसार या गावात ४,६३४ कुटुंबे राहत होती. गावाच्या २३,३६२ या एकूण लोकसंख्येत ११,९५८ पुरुष व ११,४०४ स्त्रिया होत्या. येथील सरासरी साक्षरता ७१.२% टक्के होती.

ब्रिटिशकाळात पिंपळनेर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे उप-विभागीय मुख्यालय होते; परंतु अतिवृष्टी व जंगलप्रदेश यांमुळे हे दळणवळणाच्या दृष्टीने गैरसोयीचे होते. त्यामुळे इ. स. १८८७ मध्ये येथील तालुक्याचे ठिकाण साक्री येथे हलविण्यात आले. इ. स. १९०८ मध्ये तालुक्याचे नावही साक्री करण्यात आले. सांप्रत प्रशासकीय सोयीसाठी पिंपळनेर तालुका प्रस्तावित आहे. सुमारे १०० वर्षांपासून येथे असलेल्या ग्रामपंचायतीचे रूपांतर २२ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार नगरपरिषदेत झाल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे.

पिंपळनेर नगराला ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक परंपरा आहे. या गावाला पूर्वी पिंपळेश्वर असे म्हटले जात. येथे सापडलेल्या चौथ्या शतकातील चालुक्यांचा ताम्रपट, नदीकाठावर असलेला जुना किल्ला, परिसरातील हेमाडपंती मंदिरांचे अवशेष, इ. स. १६३० साली बादशहा खान जहानच्या बंडाचा बीमोड झाल्याचा ऐतिहासिक उल्लेख इत्यादींवरून पिंपळनेरचा इतिहास जुना असल्याचे दिसून येते. येथे सुमारे २४४ वर्षांपूर्वीचे जुने विठ्ठ्ल मंदिर असून गेल्या सुमारे १९५ वर्षांपूर्वीपासून दरवर्षी या मंदिर संस्थानमार्फत खंडोजी महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्त (भाद्रपद शुद्ध सप्तमी) नामसप्ताह महोत्सव साजरा केला जातो. त्यावेळी मोठी यात्रा भरते. त्यात पंचक्रोशीतून येणाऱ्या अनेक दिंड्यांपैकी आदिवासींच्या दिंडीला मानाचे स्थान असते. विठ्ठल मंदिरास तसेच १०० वर्षांपेक्षा जुने लो. टिळक सार्वजनिक वाचनालय प्रसिद्ध असून केवलानंद सरस्वती, म. गांधी, तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, वि. दा. सावरकर, विनोबा भावे, न. चि. केळकर, वि. वा. शिरवाडकर इत्यादींनी या ठिकाणाला भेटी दिल्या. याशिवाय येथील मुरलीधर मंदिर संस्थानतर्फेही श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त नामसप्ताहाचे आयोजन केले जाते. पिंपळनेर व परिसरात आदिवासींचा ‘डोंगऱ्या देव’ प्रसिद्ध आहे. त्याच्या उत्सवामध्ये धार्मिक एकता व जातीय सलोखा पाहायला मिळतो. गावाच्या उत्तरेस असलेले जुने राममंदिर, पूर्वेचे महादेव मंदिर, जवळच असलेल्या सामोडे येथील गांगेश्वर महादेव मंदिर, श्री संत निळोबाराय मंदीर, ओम धुनिवाले शिवानंद दादाजी दरबार इत्यादी धार्मिक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. या गावास स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा लाभला आहे.

अहिराणी ही येथील स्थानिक बोलीभाषा असून मराठी, मावची, कोकणी इत्यादी भाषाही येथे बोलल्या जातात. गावात महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. येथे डाकघर व शासकीय विश्रामगृह आहे. पिंपळनेर हे पूर्वी येथील नदीकाठी उगवणाऱ्या रोहिश (रोशा) गवताच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध होते. हे गवत औषधनिर्मितीसाठी येथून गुजरात राज्यातील सुरत येथे पाठविले जात असे. पिंपळनेरची बाजारपेठ कांद्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे एक साखर कारखाना आहे. पिंपळनेरपासून ५ किमी. वर असलेले पांझरा नदीवरील लाटीपाडा धरण व त्याचा निसर्गसुंदर परिसर ही येथे येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. लाटीपाडा धरण १९६५ मध्ये बांधण्यात आले असून १९६९ व १९७१ मध्ये त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. पिंपळनेरला व परिसरला धरणातून दोन कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वेणीमाधवशास्त्री जोशी आणि महाराष्ट्रातील थोर विचारवंत व संस्कृत पंडित, तसेच सुरुवातीपासून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे व अखेरपर्यंत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे पिंपळनेर हे जन्मगाव. तर्कतीर्थांचे बालपण व पहिली ते तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर ते वयाच्या चौदाव्या वर्षी वाई (जि. सातारा) येथील प्राज्ञपाठशाळेत दाखल झाले. मराठी विश्वकोश ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर २०२३ मध्ये पिंपळनेर येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा झाला. या वेळी विश्वकोशाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक श्री. म. (राजा) दीक्षित यांनी तर्कतीर्थांच्या निवासस्थानाला भेट दिली. तसेच रत्नाकर स्वामी यांचे समाधीस्थान असलेल्या पानखेडा या आदिवासी बहुल गावातील विद्यार्थी, शिक्षक आणि आदिवासी बांधवांसमवेत ‘ओळख मराठी विश्वकोशाची’ या विषयावर त्यांनी संवाद साधला.

समीक्षक : माधव चौंडे