छत्रे, विष्णुपंत मोरोपंत : (१८४०-२० फेब्रुवारी १९०५). भारतीय सर्कसचे जनक आणि प्रसिद्ध गायक. छत्रे घराणे मूळचे गणपतीपुळे (रत्नागिरी) जवळील बसणी या छोट्याशा खेड्यातील. विष्णुपंतांचे वडील जमखंडी येथील संस्थांनिकाकडे नोकरी करीत असल्याने त्यांचे कुटुंब सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथे राहत असे. विष्णुपंत छत्रे यांचा जन्म अंकलखोप येथे झाला. पुढे ते पटवर्धनांच्याकडे नोकरीस लागले, १८५७ च्या राष्ट्रीय उठावाच्या काळात ते रामदुर्गचे भावे यांच्याकडे तीन वर्षे चाबुकस्वार म्हणून नोकरीस राहिले.

छत्रे यांना लहानपणापासून गायनाची आणि प्राण्यांची आवड होती. कुत्री-मांजरे, माकडे, कबुतरे आणि घोडे यांच्यात ते रमत असत. लहानवयातच त्यांचे लग्न झाले होते. गायन शिकण्यासाठी ते रामदुर्ग संस्थानातील नोकरी सोडून धोंडोपंत नावाच्या मित्राबरोबर ग्वाल्हेरला गेले. तेथे विख्यात संगीतकार हद्दू खाँ यांच्याकडून त्यांनी कष्टपूर्वक शास्त्रोक्त संगीतसाधना केली. तसेच अश्वतज्ज्ञ बाबासाहेब आपटे यांच्याकडून अश्वविद्येचे प्रशिक्षण घेतले.

ग्वाल्हेरमधून परतल्यानंतर ते श्रीमंत रघुनाथराव विंचुरकर यांच्याकडे नोकरीस राहिले (१८७०). याशिवाय इंदूर, विंचूर, कुरुंदवाड, जव्हार इत्यादी संस्थानांत ते घोड्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करत. कुरुंदवाड संस्थानचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्यासोबत ते मुंबईला आले असता त्यांनी चेर्नी विल्सन या ब्रिटिश गृहस्थांची ‘हर्मिस्टन सर्कस’ पाहिली. विल्सन यांच्या सर्कसवरून प्रेरणा घेऊन त्यांनी स्वतःची सर्कस काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी लोकांची जमवाजमव करून तालमी घेतल्या व खेळ सादर करण्यास सुरुवात केली. या कार्यात त्यांना मित्र नारायण परशुराम टिल्लू व कुरुंदवाड संस्थानचे मोठे साहाय्य मिळाले. मुंबई प्रांताचे गव्हर्नर फर्ग्युसन हे कुरुंदवाड येथे आले असता त्यांच्यासमोर छत्रे यांनी घोड्याच्या कसरती सादर केल्या. पुढे त्यांनी मुंबईमधील क्रॉस मैदानावर सर्कशीचे खेळ सुरू केले (२६ नोव्हेंबर १८८२). विल्सन सर्कशीकडून प्रेक्षकांची गर्दी छत्रे यांच्या सर्कशीकडे वळली, तसेच नंतर विल्सन यांची सर्कसच छत्रे यांनी लिलावात विकत घेतली (१८८४). विल्सनच्या सर्कशीतील यूरोपीय कलाकारांना घेऊन पहिली भारतीय ‘ग्रँड इंडियन सर्कस’ त्यांनी सुरू केली. जंगली प्राण्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे चित्तवेधक प्रयोग करणे, प्राचीन भारतीय युद्धकलांसह विदेशी कसरती दाखविणे, उंच झोपाळ्यांवरचे खेळ आदी छत्रे यांच्या सर्कशीची वैशिष्ट्ये. भारताबरोबरच चीन, जपान, ब्रह्मदेश इत्यादी देशांत त्यांनी सर्कशीचे प्रयोग यशस्वी केले. पुढे ही सर्कस त्यांनी लहान भाऊ काशिनाथपंत यांच्या स्वाधीन केली. काशिनाथ यांनीही अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोपर्यंत ही सर्कस नेली. छत्रे यांनी आपल्या सर्कशीत केरळच्या कुशल कलाकारांना संधी दिली. तसेच म्हैसाळचे व्यंकटराव उर्फ बाबासाहेब देवल, तासगावचे परशुराम माळी, शेलार, सदाशिव कार्लेकर, पटवर्धन असे तरुण मराठी कलाकार त्यांच्या सर्कशीत होते. यांपैकीच देवलबंधूंनी पुढे स्वतंत्र सर्कस सुरू केली (१८९५). देवलबंधूंच्या सर्कशीने आशिया, अमेरिका, यूरोप व आफ्रिका या चारही खंडांत यशस्वी दौरे करून छत्रे यांची परंपरा कायम ठेवली.

छत्रे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना सहकार्य करीत. सर्कशींच्या प्रयोगाबरोबर संधी मिळेल त्याप्रमाणे त्यांची गायनसेवाही सुरू होती. हद्दूखाँ यांच्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत जीवन व्यतीत करीत असलेला त्यांचा मुलगा रहिमतखाँ यांचे पालकत्व छत्रे यांनी स्वीकारून त्यांची गायकी सर्वदूर पोहोचवली, तसेच रहिमतखाँ यांना त्यांनी ‘भूगंधर्व’ पदवी देऊन गौरवले.

इंदूर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Champad, Sreedharan, ‘An Album of Indian Big Tops’ (History of Indian Circus), Strategic Book Publishing and Right Co. Houston, 2013.
  • गद्रे, ना. कृ., कै. पं. ‘विष्णूपंत छत्रे यांचे चरित्र’, नेटिव्ह ओपिनियन, मुंबई, १९०६.
  • सहस्रबुद्धे, चिंतामणी, ‘सांगली जिल्ह्यातील इतिहासाची सुवर्ण पाने’, आदित्य प्रकाशन, सांगली, २०१३.

समीक्षक : नागनाथ बळते