शिंदे, जनाक्का : (१८७८ – २८ एप्रिल १९५६). महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्त्या आणि थोर समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांच्या लहान भगिनी. त्यांचा जन्म रामजी व यमुनाबाई या दांपत्यापोटी जमखंडी (कर्नाटक) येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच जनाक्कांचा विवाह जमखंडीजवळील आसंगी येथील कृष्णराव गोपाळराव कामते यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांनी जमखंडी (कर्नाटक) येथील मुलींच्या शाळेत चौथ्या वर्गापर्यंतचे शिक्षण घेतले. तत्कालीन पारंपरिक समाजव्यवस्थेची चौकट मोडून त्यांनी हे शिक्षण घेतले होते; तथापि कृष्णरावांना शिक्षणात रस नव्हता, तसेच जनाक्कांचा सासरी छळ होऊ लागला. त्यामुळे त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही. विठ्ठल रामजी शिंदे यांनी जनाक्कांचे शिक्षण पुन्हा सुरू केले. पुढे पुण्यातील हुजूरपागा शाळेत मिस हरफर्ड व मिस मेरी भोर यांच्या प्रयत्नातून जनाक्का इंग्रजी सहावीपर्यंत शिकल्या. मुधोळ संस्थानाची दरमहा दहा रुपयांची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. जनाक्का गायन, वादन व शिवणकामातही पारंगत होत्या.

जनाक्का पनवेल येथील म्युनिसिपल प्राथमिक शाळेत मुख्य शिक्षक म्हणून रुजू झाल्या (१९०६-०७). विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९०६ ला ‘निराश्रित साहाय्यकारी मंडळी’ या संस्थेची स्थापना केली. त्यामध्ये जनाक्कांचे महत्त्वाचे योगदान राहिले. या संस्थेमार्फत त्यांनी अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन कुणी आजारी पडल्यास मोफत औषधोपचार करणे, सहानुभूतीपूर्वक चौकशी करून योग्य सल्ला देणे, भजनाचे कार्यक्रम घेणे, आध्यात्मिक चर्चा करणे, पोथी-पुराणे सांगणे, स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणे इ. कामे हिरिरीने केली. अस्पृश्यांमध्ये जाऊन मिशनरी लोकांसारखी सेवाशुश्रूषा केली. त्यामुळे त्या धर्म व जात बाटवणाऱ्या आहेत, असा लोकांमध्ये गैरसमज झाला. तो गैरसमज दूर करण्यासाठी त्या हळदी-कुंकवासारखे उपक्रम सार्वजनिक स्वरूपात घेत.

जनाक्कांनी अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठी ‘निराश्रीत सेवासदन’ स्थापन केले (२१ मे १९०७). सदनाची सर्वस्वी जबाबदारी जनाक्का यांनी सांभाळली. निराश्रित साहाय्यकारी महिला संस्थेत निराधार मुली व स्त्रियांना ठेवत असत. स्त्रियांना शिक्षण देणे, त्यांना नोकऱ्या मिळवून देणे. त्यांचे सामाजिक प्रबोधन करणे व त्यांच्यात नागरी गुणांचा मेळ घडविणे, तसेच समाजातील निराधार स्त्रियांची शुश्रूषा व त्यांना शिकवण्याचे काम जनाक्का करत असत. निराश्रित साह्यकारी महिला समाज मंडळीचे वार्षिक संमेलनही होत असे. पुढे जनाक्का यांनी निराश्रित साह्यकारी महिला समाज मंडळीच्या सचिव म्हणूनही काम केले (१९०९-१०).

जनाक्कांनी अस्पृश्य स्त्रियांच्या वैद्यकीय समस्यांकडेही लक्ष दिले. समाजातील बहिष्कृत वर्गातील स्त्री आणि तिचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत, ही जाणीव जनाक्कांना होती. ज्यांचा स्पर्शही विटाळ मानला जात होता, अशा समाजातील स्त्रियांच्या बाळंतपणात त्यांना हव्या असणाऱ्या औषध उपचारांची गरज समजून घेऊन त्यांनी काम केले. अस्पृश्य मुलींसाठी निराश्रित साहाय्यकारी मंडळाने परळ (मुंबई) येथे शाळा सुरू केली (१९०८) होती. या शाळेच्या व वसतिगृहाच्या देखरेखीचे कामही जनाक्का करत होत्या.

अस्पृश्य समाजात मुलींना ‘देवदासी’ म्हणून सोडण्याची प्रथा होती. मुरळी सोडलेल्या मुलींचे मन वळवून जनाक्कांनी सेवासदनमध्ये त्यांना आश्रय दिला. शिवाय त्यांचे शिक्षण व योग्य स्थळी विवाह करून देण्याचे सत्कार्य त्यांनी पार पाडले. त्यांच्या सेवेचे कार्यक्षेत्र मुंबई-पुणे परिसराच्या पलीकडे हळूहळू विस्तारत गेले. अमरावती, थंगाव, रामसौर, खामगाव, मलकापूर, धुळे इ. ठिकाणी दौरे करून संस्थेसाठी त्यांनी निधीही उभा केला (१९१२). जनाक्का यांनी प्रार्थना समाजात शिक्षिका म्हणूनही काम केले. १९१० साली अहमदनगर येथील प्रार्थना समाजाच्या उत्सवात त्या सहभागी झाल्या. १९२३ पर्यंत अहल्याश्रमात काम केले. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीसाठी त्यांनी रु. ६०० चा निधी गोळा केला.

इन्फ्ल्यूएंझाच्या साथीमध्ये त्यांनी पुणे येथे सामान्य माणसांची सेवा केली (१९१८). मद्यपानबंदीच्या चळवळीतही जनाक्कांनी वाड्या-वस्त्या फिरून मद्यपानाविरुद्ध स्त्रीवर्गात प्रचार केला. मुलांच्या बरोबरीने मुलींनाही सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यात यावे यासाठी पुण्यात मोर्चा काढला (१२ फेब्रुवारी १९२०). जनाक्का या वाई तालुक्यातील (जि. सातारा) खेडोपाडी जाऊन प्रचारकार्यात सहभागी होत असत. वाई येथे प्रार्थना समाजाची शाखा स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता (१९३३). तसेच वनोपासना, नगर संकीर्तन व प्रार्थना समाजाच्या  दरवर्षीच्या वार्षिकोत्सवात सहभागी होत. प्रयत्न, चिकाटी आणि प्रेमळ वागणूक यांचा परिणाम म्हणून लोकांची मने आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची त्यांची शैली होती. मिशनरी तत्त्वाप्रमाणे प्रचाराचे कार्य, प्रत्येक खेडोपाडी अस्पृश्य वस्तीत भेट देऊन तेथील लोकांची गाऱ्हाणी ऐकून अडचणी दूर करणे हे काम त्या सातत्याने करत राहिल्या. महात्मा गांधीनी वाई येथे प्रार्थना समाजाच्या शाखेस भेट दिली, तेव्हा जनाक्काच्या कामगिरीबद्दल त्यांनी कौतुक केले (१ ऑगस्ट १९४४). जनाक्का या संपूर्ण शिंदे कुटुंबाच्या आधारवड होत्या. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासोबत आयुष्यभर आणि त्यांच्या पश्चातही कुटुंबासोबत वडिलकीच्या नात्याने त्या उभ्या राहिल्या. विठ्ठल रामजी शिंदे व जनाक्का यांच्यातील संबंध भारतीय जीवनातील भगिनीभावाचे  विलोभनीय असे उदाहरण आहे.

जनाक्का यांनी केलेले आत्मपर लेखन, त्यांचे पत्रलेखन यांस एक वेगळे महत्त्व आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळातील शिक्षित मराठा स्त्रीचे हे आत्मकथन आहे, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुरुवातीच्या सुधारक स्त्रीचे वैयक्तिक व सामाजिक पातळीवरचे अनेक महत्त्वपूर्ण अनुभव त्यांत आहेत.

शिवाजीनगर (पुणे ) येथे आगीत होरपळणाऱ्या एका मुलीला वाचवताना जनाक्का स्वतःच संपूर्णपणे भाजल्या. त्यातच त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • जोगळेकर मृणालिनी, ‘स्त्री अस्मितेचा आविष्कार – एकोणिसावे शतक – भाग-३: ताराबाई शिंदे, जनाक्का शिंदे’, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९९१.
  • पवार, गो. मा.; शिंदे, रणधीर, (संपा), ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय, खंड २ रा : आत्मपर लेखन – रोजनिशी, माझ्या आठवणी व अनुभव, प्रवासवर्णन’, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २०१६.
  • शिंदे, जनाबाई, ‘स्मृतिचित्रे’, ‘तरुण महाराष्ट्र’, १२ ऑगस्ट १९४९.
  • शिंदे, रणधीर, संपा., ‘आठवणी व संस्मरणे : जनाक्का शिंदे,’, माध्यम पब्लिकेशन, ठाणे, २०२३.

समीक्षक : रणधीर शिंदे

This Post Has One Comment

  1. सरोजकुमार मिठारी

    अभिप्रायाबद्दल हार्दिक धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा