स्व्हेडबॅरी, टेऑडॉर : (३० ऑगस्ट १८८४ – २५ फेब्रुवारी १९७१). स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ. कलील रसायनशास्त्रातील अवस्करण पद्धती आणि अति-अपकेंद्रित्र या प्रयुक्तीच्या शोधाबद्दल त्यांना १९२६ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
स्व्हेडबॅरी यांचा जन्म इलियास स्व्हेडबॅरी आणि ऑगस्ता अल्स्टर्मार्क या दांपत्याच्या पोटी स्वीडनमधील यव्हलजवळील फ्लेरांग या गावी झाला. अप्साला विद्यापीठाच्या केमिकल इन्स्टिट्यूटमध्ये सहायक पदावर कार्यरत असताना त्यांनी बी.ए. (१९०५), एम्.ए. (१९०७) व पीएच्.डी. (१९०८) या पदव्या संपादन केल्या. याच विद्यापीठात ते रसायनशास्त्राचे व्याख्याते (१९०७), भौतिकीय रसायनशास्त्राचे व्याख्याते व निर्देशक (१९०९) आणि प्राध्यापक (१९१२) झाले. १९४९ मध्ये निवृत्तीनंतर ते गुणश्री प्राध्यापक, तसेच याच विद्यापीठातील गुस्टाफ व्हेर्नर इन्स्टिट्यूट फॉर न्यूक्लिअर केमिस्ट्रीचे संचालकही होते (१९४९ – ६७).
स्व्हेडबॅरी यांनी कलील कणांच्या (कोलाईडस पार्टीकल्स; colloidal particle) भौतिक गुणधर्माचा अभ्यास केला. त्यांच्या कलील कण तयार करण्याच्या नवीन पद्धतीमुळे अल्बर्ट आइन्स्टाइन आणि पोलंडचे भूभौतिकशास्त्रज्ञ मारियन स्मोलूचोवस्की (Marian Smoluchowski ) यांनी मांडलेल्या ब्राऊनियन गती बाबतच्या कल्पनांना चालना मिळाली. कणाच्या अवसादन (सेडीमेंटेशन) भौतिक गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी पृथ:करणात्मक अति-अपकेंद्रित्राचे (ॲनालीटिकल अल्ट्रासेंट्रीफ्यूगेशन) तंत्र विकसित केले आणि त्याचा उपयोग शुद्ध प्रथिनांच्या पृथःकरणासाठी किंवा त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी कसा होतो हे दाखवून दिले. त्यांच्या कामाची नोंद घेऊन अति-अपकेंद्रित्र तंत्रातील एककाला स्व्हेडबॅरी असे नाव आणि अप्साला विद्यापीठातील त्यांच्या प्रयोगशाळेला स्व्हेडबॅरी प्रयोगशाळा असे नाव देण्यात आले.
अति-अपकेंद्रित्रातील तंत्राला आज रेणवीय जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या तंत्राच्या साहाय्याने एखाद्या जैविक मिश्रणामध्ये असलेले भिन्न प्रकारचे घटक त्यांच्या विविध गुणधर्माच्या आधारे वेगवेगळे करता येतात. आकार, रचना, प्रमाण, घनता, चिकटपणा इत्यादी विविध भौतिक गुणधर्मानुसार मिश्रणातील घटक एकमेकापासून वेगळे होतात. सजीव पेशींमध्ये कार्य करणाऱ्या विविध घटकांना ( उदा., प्रथिने, न्यूक्लिक आम्ले, रायबोसोम, विषाणू , इ.) शुद्ध स्वरूपात वेगळे करण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो. याशिवाय स्व्हेडबॅरी यांनी आणवीय रसायनशास्त्र, प्रारण जीवशास्त्र (रेडीएशन बायालॉजी), छायाचित्रण प्रक्रिया (फोटोग्राफीक प्रोसेसिंग) इ. शाखेत संशोधन केले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी कृत्रिम रबर तयार करण्याची पद्धत शोधून काढली.
स्व्हेडबॅरी यांच्या कार्याबद्दल रॉयल सोसायटीने विशेष नोंद ठेवली आहे. त्यांना जॉन एरिकसन पदक (१९४२), बर्झीलियस पदक (१९४४) व फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे पदक (१९४९) सन्माननीय डॉक्टरेट पदव्या, तसेच स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, हेल ॲकॅडेमी, केमिकल सोसायटी (लंडन), इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्स, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी (फिलाडेल्फिया ), न्यूयॉर्क ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी (लंडन), नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्स (वॉशिंग्टन) इ. संस्थांचे सदस्यत्व देण्यात आले.
स्व्हेडबॅरी यांचे वयाच्या ८६व्या वर्षी स्वीडनच्या अरब्रू येथे निधन झाले
कळीचे शब्द : #कलील, #अपकेंद्रित्र.
संदर्भ :
- http://nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureutes/1926/sved.berg_bio
- http://www.britanica.com/biography/Theodor-Svedberg
- www.encyclopedia.com/people/science-and-technology/chemistry-biographies/theodor-svedberg.
- Onlinelibrary.wiley.com
- http://en.wikipedia .org/wiki/Chaim_Weizmann
समीक्षक : गर्गे, रंजन