फ्लोरी, हॉवर्ड वॉल्ट: (२४ सप्टेंबर १८९८ – २१ फेब्रुवारी १९६८).

ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश विकृतिवैज्ञानिक आणि औषधशास्त्रज्ञ. सर ॲलेक्झांडर प्लेमिंग यांनी शोधलेल्या पेनिसिलीन या प्रतिजैवाला शुद्ध स्वरूपात अलग करण्याचे तंत्र विकसित केल्याबद्दल १९४५ सालाचे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक सर एर्न्स्ट बोरिस चेन (Sir Ernst Chain) आणि सर ॲलेक्झांडर प्लेमिंग (Sir Alexander Fleming) यांसमवेत विभागून देण्यात आले. तसेच त्यांनी लायसोझाइम (Lysozym) या लाळेतील व अश्रूतील महत्त्वाच्या घटकांवर काम केले.

फ्लोरी यांचा जन्म ॲडिलेड, ऑस्ट्रेलिया (Adelaide, Australia ) येथे झाला. त्यांचे वडील जोसेफ फ्लोरी हे स्थलांतरित ब्रिटिश होते. फ्लोरी यांचे शिक्षण ॲडिलेडमधे कायरे कॉलेज प्रिपरेटरी स्कूल (Kyre College Preparatory School) आणि सेंट पीटर्स कॉलेज (St Peter’s College, Adelaide) येथे झाले. त्यांनी ॲडिलेड विद्यापीठातून वैद्यकीची पदवी घेतली (१९२१). नंतर त्यांनी ऑक्सफर्डमधील मॅग्डालीन महाविद्यालयामधून (Magdalen College, Oxford) बी.ए.आणि एम.ए. या पदव्या प्राप्त केल्या. नंतर त्यांनी गॉनव्हिल ॲण्ड कैस कॉलेज, केंब्रिजमधून पीएच.डी मिळवली (१९२७). पुढे १९३१ मध्ये शेफील्ड विद्यापीठात त्यांची विकृतिविज्ञान विषयाच्या जोसेफ हंटर अध्यासनावर नेमणूक झाली. १९३५ मध्ये त्यांची ऑक्सफर्ड येथील लिंकन महाविद्यालयात विकृतिविज्ञानाचे प्राध्यापक व फेलो म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर १९६५ मध्ये ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे मुख्याधिकारी झाले.

फ्लोरी यांनी लायसोझाइम या लाळेतील आणि अश्रूतील घटकावर महत्त्वाचे काम केले. लायसोझाइम वितंचक (एंझाईम; enzyme) जीवाणू विरोधकाचे (Antibacterial) काम करते. जीवाणूची पेशीभित्तिका लायसोझाइममुळे तुटते आणि जीवाणू मरतो. या कामी सर एर्न्स्ट बोरिस चेन या वैज्ञानिकाने त्यांना साहाय्य केले. लायसोझाइम हा दोघांच्या संशोधनाचा मूळ विषय होता. परंतु नंतर त्यांनी प्रतिजैविकांमधे रस घेतला. याच काळात सर एर्न्स्ट बोरिस चेन आणि नॉर्मन हेथले (Norman Heatley) यांच्या बरोबर काम करत असताना त्यांनी ॲलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पेनिसिलीनवरील प्रबंध वाचला. त्यात पेनिसिलियम नोटॅटम (Penicillium Notatum) या बुरशीने निर्माण केलेल्या जीवाणू विरोधी प्रतिजैविकाची म्हणजेच पेनिसिलिनची माहिती होती. पेनिसिलिनचा शोध १९२८ मध्ये लागला होता, परंतु ते उपचारासाठी आवश्यक शुद्ध स्वरूपात मिळवता आले नव्हते. रॉकफेलर फाउंडेशनकडून अर्थसाहाय्य घेऊन त्यांनी सर एर्न्स्ट बोरिस चेन आणि काही ब्रिटिश संशोधकांचा चमू पेनिसिलियम बुरशीची वाढ केलेल्या द्रव माध्यमातून पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात मिळवण्यात यशस्वी झाले (१९३८). दुसऱ्या महायुद्धात जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पेनिसिलिनचा वापर करण्यात आला.

फ्लोरी यांचे छायाचित्र ऑस्ट्रेलियन सरकारने १९७३—९५ या काळातल्या ५० डॉलरच्या नोटेवर छापले. ऑस्ट्रेलियाच्या राजधानीतल्या एका विभागाला त्यांचे नाव देण्यात आले. मेलबर्न विद्यापीठातल्या न्यूरो सायन्स संशोधक संस्थेला फ्लोरी यांचे नाव देण्यात आले. फ्लोरी यांना अनेकानेक सन्मान आणि पदके मिळाली. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे लिस्टर मेडल, (Lister Medal; १९४५); स्वीडिश मेडिकल सोसायटीचे बर्झीलियस मेडल (Berzelius Medal) आणि रॉयल सोसायटीचे.रॉयल (Royal Medal; १९५१) व कॉप्ली मेडल,(Copley Medal; १९५७) तसेच ते रॉयल सोसायटीचे सदस्य (१९४१)व अध्यक्ष (१९६०) होते. १९६३ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सहकारी म्हणून त्यांची निवड झाली.

फ्लोरी यांचे लंडन येथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक – रंजन गर्गे

#लायसोझाइम #लाळ #अश्रू #जीवाणूविरोधक #नोबेलपारितोषिक #Pathologist #Pharmacologist #पेनिसिलीन #प्रतिजैव #Penicillin

प्रतिक्रिया व्यक्त करा