कान (कर्ण) हा मानवी शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील अवयव आहे. कानांचे मुख्य कार्य म्हणजे ध्वनी लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून त्यांना मेंदूपर्यंत पोहोचविणे. कानांकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याचे कार्य मेंदू करतो आणि त्यानुसार शरीरातील विविध अवयवांना योग्य त्या क्रिया करण्याचे संदेश कार्यान्वित करतो. कमी ऐकू येणे, कान दुखणे, कानात मळ साचणे, कानांतून पाणी अथवा पू येणे, कानाचा पडदा फाटणे, कानात काही तरी अडकणे, उच्च आवाजामुळे कानाचे दडे बसणे अशा विविध समस्या कानांचे बाबतीत उद्भवतात. कमी ऐकू येणे ही जगभरातील लोकांची सर्वांत सामान्य चेतासंवेदन (Neurosensory) संबंधित समस्या आहे. कमी ऐकू येत असेल, तर योग्य वेळी उपचार केल्यास ही समस्या दूर होऊन श्रवणक्षमता पूर्ववत होऊ शकते. परंतु, अंतर्कर्णातील दुखापतीमुळे कानातील संवेदनशील पेशींचे नुकसान होऊन श्रवणशक्ती कमी (Sensori-neural hearing loss; SNHL) झाली असेल तर ती पूर्ववत करणे, हे वैद्यकीयदृष्ट्या खूपच आव्हानात्मक असते.

कर्णविकार – पारंपरिक उपचार पद्धती : कानातून औषध देणे ही कानाच्या आजारावरील उपचाराची एक सामान्य व सुलभ पद्धत आहे. तिचा मर्यादित प्रमाणात फायदा होतो. परंतु, या औषधामध्ये विषारी घटक असल्यास त्यांचा कानाच्या श्रवणशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. कानावरील उपचारासाठी तोंडातून, अंत:क्षेपणाद्वारे कानाच्या शिरेतून अथवा स्नायूमधून औषध देतात; परंतु, त्याचाही फारसा उपयोग होत नाही. कारण कानाला होणारा रक्तपुरवठा शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत मर्यादित असतो. त्यामुळे कानाच्या बाधित भागाला पुरेशा मात्रेमध्ये औषध मिळत नाही.

अब्जांश तंत्रज्ञान : कर्णविकार उपचार पद्धती

कर्णविकार – अब्जांश उपचार पद्धती : पारंपरिक पद्धतींच्या मर्यादा लक्षात घेता कर्णविकारवैद्य आता औषध वितरणासाठी अब्जांश कणांचा वापर करू लागले आहेत. या कणांच्या वापरामुळे औषधाचे वितरण नियंत्रित स्वरूपात व नेमकेपणे योग्य त्या ठिकाणी करता येते. तसेच औषधाचे स्थिरीकरण करता येते. तसेच कानाच्या अंतर्भागातील नागमोडी नलिकांमध्ये (कर्णशंकू; Cochlea) अब्जांश कणांची जैवसंगतता साधणे देखील शक्य होते.

हायड्रोजेल या औषधाच्या वितरणासाठी कायटोसान ग्लिसेरोफॉस्फेट ही एक प्रभावी औषध वितरण प्रणाली आहे. अब्जांश कणाबरोबर अंत:स्थापित (Embedded) केलेल्या हायड्रोजेलचा वापर कानाच्या आतील भागात कॉर्टिकोस्टेरॉइडे आणि प्रतिजैविके ही औषधे वितरित करण्यासाठी करतात. कानाच्या आजारावरील उपचारासाठी अजैविक, लिपिडिक आणि बहुवारिक-आधारित अशा विविध प्रकारच्या अब्जांश कणांवर संशोधन वैज्ञानिक सतत करत असतात. या दृष्टीने चांदीच्या (Ag) अब्जांश कणांवर पुष्कळ संशोधन झाले असून त्यातील निष्कर्ष आशादायी आहेत. त्यामुळेच चांदीचे अब्जांश कण मिश्रित औषधांच्या वापरास कर्णविकारवैद्यांची अधिक पसंती असते.

कानाची अंतर्रचना क्लीष्ट असल्यामुळे औषधांमधून अब्जांश कण वितरणासाठी चिकित्सा करणे कठीण असते. तथापि १,२-डायोलियॉल-३-ट्रायमिथिलअमोनियम-प्रोपेन या अब्जांश कणांचा वापर करून आतील कानात औषध वितरण करणे आता शक्य झाले आहे. कानात औषध वितरण करण्याचा वेग हा अब्जांश पदार्थांच्या गुणधर्मांवर अवलंबून असतो. त्यामुळे यासाठी कोणते अब्जांश पदार्थ असलेले औषध वापरावयाचे हे वैद्यांना आधीच ठरवावे लागते.

कर्णविकारांच्या उपचारामध्ये अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वैद्यकीय चाचण्या घेण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच या प्रकाराच्या उपचारासाठी विविध देशांमध्ये सरकारी मान्यता देखील मिळत आहे. त्यामुळे भविष्यकाळात कानावरील उपचारासाठी या तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक वाढत जाताना दिसून येईल.

संदर्भ :

  • https://www.frontiersin.org/journals/cell-and-developmental-biology/articles/10.3389/fcell.2021.750185/full
  • https://www.frontiersin.org/journals/cellular-neuroscience/articles/10.3389/fncel.2021.791573/full
  • https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/30987439/
  • https://www.sciencedirect.com/science/article/pii/S2590183421000272
  • https://www.tandfonline.com/doi/full/10.1080/21691401.2019.1573182

समीक्षक : वसंत वाघ