अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मूलद्रव्यांची विविध प्रकारची अब्जांशरूपे बनवता येतात. अब्जांश पदार्थांचे गुणधर्म हे त्यांचा आकार, रचना इत्यादी घटकांवर अवलंबून असतात. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे विविध क्षेत्रात त्यांचा उपयोग केला जात आहे. घर बांधण्यासाठी वापरले साहित्य व गृहोपयोगी उपकरणांमध्ये देखील आता वेगवेगळ्या प्रकारच्या अब्जांश पदार्थांचा वापर केला जात आहे. गृहिणी जेव्हा घरामध्ये दैनंदिन काम करीत असतात तेव्हा त्यांना त्या कामासाठी लागणारा वेळ कमी व्हावा; तसेच पाणी, वीज, इंधन इत्यादी गोष्टींची बचत व्हावी यादृष्टीने गृहोपयोगी उपकरणांच्या वापराचे अनेक फायदे आहेत. त्यांच्या वाढत्या वापरामुळे गृहिणींचे जीवन निश्चितच अधिक सुखकर व आरोग्यपूरक झाले आहे.

कमळाचे पान नेहमी स्वच्छ राहते. त्यावर पाणी स्थिरावत नाही हे आपल्याला माहित आहे. त्याच्या ‘स्वनिर्मळता’ (self-cleaning) या गुणधर्मावर संशोधन करून शास्त्रज्ञांनी ‘लोटस इफेक्ट’ (Lotus Effect) ह्या नावाचे अब्जांश तंत्रज्ञान विकसित केले आहे. योग्य त्या अब्जांश कणांचा वापर करून उत्पादन केलेले रंग आता बाजारात उपलब्ध आहेत. ते जंतुविरहीत आणि ओल न धरणारे असतात. रंग तयार करण्यासाठी सामान्यतः सिलिका, चांदी, जस्त, अल्युमिनियम, तांबे इत्यादी धातूंच्या अब्जांश कणांचा वापर करतात. घराच्या भिंती, दारे, खिडक्या, फरश्या, ओट्याच्या मागील भिंतीवरील टाईल्स, घरावरील कौले ह्यासाठी असे रंग वापरतात. अशा वस्तूंच्या उत्पादनाचे वेळी त्यांच्या पृष्ठभागावर वरीलपैकी  धातूच्या अब्जांश कणांचा पातळथर देवून एक प्रकारचे संरक्षण आवरण तयार करतात. त्यामुळे त्यांवर धूळ व सूक्ष्मजीव बसू शकत नाहीत, पाणी टिकून रहात नाही. साहजिकच या गोष्टी स्वछ करण्याची फारशी गरज पडत नाही. असे तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या टाईल्स जर स्वयंपाक घरातील ओटयावर, मागील भिंतीवर बसवल्यातर त्या स्वच्छ करण्याचे काम खूपच सोपे होईल. इमारतीच्या गच्चीवर अब्जांश तंत्रज्ञान आधारित फरश्या बसवल्याने पाणी साठणे आणि पाणी गळती या समस्यांपासून मुक्ती मिळते.

स्वयंपाकाची व भोजनाची भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरी व द्रावणांमध्ये देखील अब्जांश कणांचा वापर केला जातो. त्यांच्या वापराने भांड्यावरील अन्नकण व तेलकटपणा काढून टाकण्यास मदत होते व सूक्ष्मजंतू मारले जातात. तयार अन्न धूळ व बुरशी निर्माण करणारे जीवाणू यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी नेहमी झाकून ठेवावे लागते. त्यासाठी आता अब्जांश कणांचा थर दिलेली पातळ वेष्टने मिळतात. त्यामध्ये जस्त किंवा झिंक यांच्या ऑक्साइडच्या अब्जांश कणांचा वापर केलेला असतो. बेरियम सल्फेट व लोखंडाची संयुगे वापरून केलेल्या अब्जांश पदार्थाचा थर सांडपाण्याच्या मोरीच्या जाळीवर दिल्यामुळे ती निर्जंतूक राहते. चांदी व कार्बन यांचे अब्जांश कण हे सूक्ष्मजीव प्रतिबंधक असतात. त्यांच्या या गुणामुळे घरातील दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंच्या निर्मितीमध्ये त्यांचा वापर करतात. उदा., दात घासण्यासाठी व केस विंचरण्यासाठी वापरण्यात येणारा ब्रश, कपडे धुण्याचे यंत्र (वॉशिंग मशीन), शीतपेटी (रेफ्रिजरेटर), खोलीतील तापमान नियंत्रित करणारे यंत्र (एअर कंडिशनर), पाणी शुद्धीकरण यंत्र (वॉटर प्युरीफायर) इत्यादी. चांदीचे अब्जांश कण विद्युत् भारीत असल्याने ते अशा उपकरणामध्ये सूक्ष्मजीवांना शिरकाव करू देत नाहीत. कार्बनचे अब्जांश कण उपकरणांमधील दुर्गंधीयुक्त वास शोषून घेतात.

अब्जांश कणांच्या बहुविध उपयोगांमुळे गृहोपयोगी साहित्य व उपकरणांमध्ये त्यांचा वापर सातत्याने वाढत आहे.

संदर्भ :

  • अच्युत गोडबोले, डॉ.माधवी ठाकूरदेसाई, नॅनोदय, राजहंस प्रकाशन, पुणे, २०११.
  • Kulkarni Sulabha, Nanotechnology : Principles and Practices, Springer, 2014.

समीक्षक – वसंत वाघ

प्रतिक्रिया व्यक्त करा