उत्तर प्रदेशच्या मध्य गंगा खोऱ्यातील एक महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय स्थळ. हे संत कबीर नगर जिल्ह्यात लहुरादेवा गावाच्या पश्चिमेकडे स्थित असून त्याचा विस्तार पूर्व-पश्चिम ५०० मी. आणि उत्तर-दक्षिण २००-२५० मी. इतका आहे. राकेश तिवारी आणि राकेश कुमार श्रीवास्तव राज्य पुरातत्त्व विभाग, उत्तर प्रदेश यांच्या मार्गदर्शनाखाली या स्थळाचे उत्खनन करण्यात आले (२००१-०६). गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात मानवी वसाहतीचा प्रारंभ, विकास आणि प्राचीनता तपासणे हा या उत्खननाचा उद्देश होता.

लहुरादेवा येथील उत्खननात मानवी वसाहतीचे पाच कालखंड प्राप्त झाले, ज्यामध्ये सर्वांत प्राचीन स्तर प्रारंभिक कृषी कालीन आहे. दुसरा कालखंड हा विकसित कृषी प्रकारातील असून तिसरा कालखंड प्रगतिशील कृषी अवस्थेशी संबंधित आहे. चौथा आणि पाचवा कालखंड अनुक्रमे उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृदभांडी (NBPW) आणि शुंग-कुषाण काळाशी निगडित आहे. लहुरादेवा येथील उत्खननाचे विस्तृत विवरण खालीलप्रमाणे :

धानाचे छाप असलेले खापर, लहुरादेवा (उत्तर प्रदेश ).

कालखंड १ : प्रारंभिक कृषी अवस्था

उत्खननकर्त्यांनी या कालखंडाला दोन टप्प्यांत विभाजित केले आहे. लहुरादेवा येथे प्रारंभिक काळापासून मृदभांड्यांचे प्रमाण प्राप्त होतात. या काळातील मृदभांडी लाल, काळ्या-आणि-तांबड्या रंगाची असून यावर दोरांच्या छापेचे अंकन आणि अलंकरण आढळते. मृदभांड्यांच्या मुख्य प्रकारात विविध आकाराचे वाडगे, झाकणयुक्त मडकी इत्यादी विशिष्ट आहेत. ही मृदभांडी प्रामुख्याने हाताने तयार केली असून काही मंद गतीच्या चाकावर निर्मित आहेत. या काळाच्या स्तरात जंगली गवत, जंगली आणि शेतात पिकवलेल्या तांदळाचे अवशेष मिळाले असून जळालेली जंगली जनावरांची हाडे देखील सापडली आहेत. उत्खननात मिळालेल्या पुराव्यानुसार या काळातील लोक वर्तुळाकार आकाराच्या (२.१५ मी.), लाकडी वासे असलेल्या कुडाच्या घरात राहत होती. उत्खननीत पुराव्यानुसार आणि कार्बन-१४ किरणोत्सर्ग कालमापनानुसार इ. स. पू. ७००० च्या आसपास लहुरादेवा येथे धानाच्या (तांदळाच्या) शेतीची सुरुवात झाली होती.

या कालखंडाच्या दुसऱ्या टप्प्यात काही नवीन प्रकारची मृदभांडी प्राप्त झाली असून यामध्ये विविधता आणि नवीनता दिसून येते. या टप्प्यात पूर्ववर्ती लाल, काळ्या-आणि-तांबड्या रंगाच्या मृदभांड्यांच्या गुणवत्तेमध्ये बदल झाला असून या काळातील मृदभांडी रंगाने, आकाराने आणि निर्माण परंपरेने मागील काळापेक्षा विकसित आहेत. याव्यतिरिक्त राखाडी आणि काळ्या रंगाची नवीन प्रकारची मृदभांडी प्रथमत: वापरात आली. यामध्ये मडकी, विविध आकाराची वाडगी, थाळ्या, तोटीयुक्त भांडी, छिद्रयुक्त मडकी प्रामुख्याने आढळतात. यातील काही खापराच्या बाह्य भागावर चित्रकाम केल्याचे दिसून येते. या स्तरामध्ये गव्हाचे नमुने मिळाले असून शेळी-मेंढी, गाय, म्हैस इत्यादींच्या हाडांचे अवशेष प्राप्त झाले आहेत. या कालखंडाच्या दुसऱ्या टप्प्यात अर्धमौल्यवान (semiprecious) दगडी मणी, हाडांची बाणाग्रे, मृण्मय चेंडू (बॉल) प्राप्त झाले जे मानवी संस्कृतीच्या विकासाचे प्रतीक आहेत. या काळातील लोक लाकडी वासे असलेल्या कुडाच्या घरात राहत होते. कार्बन-१४ किरणोत्सर्ग कालमापनानुसार या टप्प्याचा कालावधी इ. स. पू. ३००० ते इ. स. पू. २००० इतका ठरविण्यात आला आहे.

कालखंड २: विकसित कृषी अवस्था (ताम्रपाषाण युग)

लहुरादेवाच्या या कालखंडात काळानुरूप अनेक बदल पाहावयास मिळतात. यामध्ये काळ्या आणि चकाकीयुक्त काळ्या रंगाची मृदभांडी प्रमुख असून विविध आकारांची वाडगी, थाळ्या प्रामुख्याने आढळतात. याव्यतिरिक्त पूर्वकालीन लाल, काळ्या-आणि-तांबड्या रंगाच्या मृदभांडी देखील प्राप्त होतात. काळ्या-आणि-तांबड्या आणि चकाकीयुक्त काळ्या रंगाच्या मृदभांड्यांच्या बाह्य भागावर पांढऱ्या रंगाने नक्षीकाम केले असून ती या क्षेत्रातील ताम्रपाषाण संस्कृतीच्या नरहन, खैराडीह या स्थळाशी समरूप आहेत. या कालखंडाच्या स्तरात पुरावशेषांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ दिसत असून हाडांची बाणाग्रे, तांब्याची उपकरणे, दगडी कुऱ्हाड, अर्धमौल्यवान दगडी मणी, मृण्मय मणी इत्यादी प्रमुख आहेत. या काळातील लोक लाकडी वासे असलेल्या कुडाच्या घरात राहत असून यांच्या चुली मातीच्या होत्या. हे लोक धान्य मातीच्या वर्तुळाकार कोठारात (earthen bins) साठवत होते. उत्खननात एकूण ४१ धान्य कोठारे मिळाली असून एका कोठारात अंदाजे ५० किलो धान राहत असावे, असे उत्खननकर्त्यांचे म्हणणे आहे. या काळात एकूण ५१२ अर्धमौल्यवान दगडी मणी मिळाले असून स्टिॲटाइटचे मणी सर्वांत जास्त संख्येने (४४१) आढळतात. कार्बन-१४ किरणोत्सर्ग कालमापनानुसार हा संपूर्ण कालखंड इ. स. पू. २००० ते इ. स. पू. १३०० इतका निश्चित केला आहे.

कालखंड ३ : प्रगतिशील कृषी अवस्था (प्रारंभिक लोहयुग)

या स्तरामध्ये लोखंडाचे प्रमाण सर्वप्रथम प्राप्त होतात. या काळातील मृदभांडी पूर्ववर्ती काळानुरूप असून चकाकीयुक्त काळ्या रंगाची मृदभांडी जाड पोतात आढळतात. यामध्ये मडकी, विविध आकाराची वाडगी, थाळ्या, लहान भांडी इ. प्रामुख्याने मिळतात. हे लोक मातीने सारवलेल्या कुडाच्या घरात राहत होते. लहान-मोठ्या आकाराच्या अनेक चुली या काळातील लोक वापरत होते. या काळातील लोक लोखंडाचा वापर करत होते. येथे लोखंड वितळण्याचे आणि उपकरण निर्माण करण्याचे उद्योग होते, असे उत्खननकर्त्यांचे म्हणणे आहे. या स्तरातून लोखंडी बाणाग्र, कुऱ्हाडी, तासण्या, खुरपी, चाकू, खिळे, विळे, तलवारी इत्यादी उपकरणे मिळाली आहेत. या स्तरात अनेक अर्धमौल्यवान दगडी मणी प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये अगेट, कार्नेलिअन, स्टिॲटाइट, फीआन्स प्रमुख आहेत. याव्यतिरिक्त अनेक काचेचे मणी, हस्तिदंताचे मणी, भाजलेल्या मातीचे मणी प्राप्त झाले आहेत. कार्बन-१४ किरणोत्सर्ग कालमापनानुसार हा कालखंड इ. स. पू. १२०० ते इ. स. पू. ८००/७०० इतका ठरविण्यात आला आहे.

कालखंड ४ : उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृदभांडी (NBPW)

उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृदभांडी (NBPW) ही अतिविशिष्ट प्रकारातील असून ही मृदभांडी उत्कृष्ट बनावटीची, उच्च चकाकी व विभिन्न छटा असलेली, उत्कृष्ट भाजणीची आणि पातळ पोताची असून यामध्ये वाडगे, थाळ्या, झाकणी इत्यादी प्रमुख प्रकार आहेत. शिवाय साधी तांबड्या रंगाची, काळी आणि तांबड्या रंगाची, काळी लेपयुक्त जाड पोताची मृदभांडी देखील प्राप्त झाली आहेत. मोठ्या प्रमाणात लोखंडी वस्तू, तांब्याच्या, हाडांच्या आणि दगडी वस्तू देखील या स्तरात मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त अर्धमौल्यवान दगडी मणी, काचेचे मणी, हस्तिदंताचे मणी, भाजलेल्या मातीचे मणी उत्खननात मिळाले आहेत. हे लोक मातीने सारवलेल्या घरात राहत होते. कार्बन-१४ किरणोत्सर्ग कालमापनानुसार हा संपूर्ण कालखंड इ. स. पू. ८००/७०० ते इ. स. पू. ३००/२०० इतका निश्चित केला आहे.

कालखंड ५ : शुंगकुषाण काळ

या कालखंडाचे प्रमाण उत्खननीत क्षेत्रात सर्वांत वरच्या स्तरात प्राप्त झाले आहे. या काळात काळ्या रंगाच्या मृदभांड्यांचा वापर जवळपास संपुष्टात आला. प्रामुख्याने लाल रंगाची खापरे वापरात होती. या कालखंडातील पुरावशेषांमध्ये तांब्यांची नाणी आणि नैगमेशाचे शिल्प प्रमुख आहेत. लहुरादेवाच्या उत्खननात प्राप्त मृण्मय शिल्पे ही या कालखंडातील आहेत. यांमध्ये पुरुष, स्त्री शिल्पे विशेष असून प्राण्यांची आणि पक्ष्यांची शिल्पे मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत. याव्यतिरिक्त भाजलेल्या मातीची खेळणी, बांगड्या, मुद्रा-मुद्रांक, सांचे, दिवे, झाकणे, चेंडू इत्यादी प्रमुख आहेत. या स्तरात एकूण १४ मुद्रा-मुद्रांके मिळाली असून त्यांवर चिन्हे, प्राकृत आणि संस्कृत भाषेतील लेख आहेत. या काळातील लोक विटांच्या घरात राहत होते. लहुरादेवा येथे घराच्या आणि विहिरीच्या बांधकामात भाजलेल्या विटांचे पुरावे पहिल्यांदा या कालखंडात आढळले आहेत. हा कालखंड इ. स. पू. ३००/२०० ते इ. स. ६०० इतका निर्धारित केला आहे.

लहुरादेवाच्या उत्खननात प्राण्यांच्या हाडापासून/ हरिणांच्या शिंगांपासून निर्मित एकूण ५७० वस्तू मिळाल्या आहेत. या वस्तू सर्वसाधारणपणे प्रत्येक कालखंडात आढळल्या असून उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृदभांडी  (NBPW) काळात त्यांची संख्या सर्वाधिक (२१५) आहे. या वस्तूंत हाडांची बाणाग्रे, बांगड्या, मणके, कंगवे, कर्णकुंडल, पदके प्रमुख आहेत. लहुरादेवाच्या कालखंड १ च्या दुसऱ्या टप्प्यापासूनच तांब्याच्या वस्तू (१९४) उत्खननात प्राप्त झाल्या आहेत. या वस्तू प्रामुख्याने सौंदर्यप्रसाधनातील असून, काजळ शलाका (Antimony rods), बांगड्या, मणके, अंगठ्या, घुंगरू, भांडी इत्यादी आहेत. स्टिॲटाइट दगडापासून निर्मित मणी या स्थळाचे वैशिष्ट्य असून अगदी प्रारंभिक कालखंडापासून येथील लोक या प्रकारचे मणी वापरत होते. अशाच प्रकारचे मणी सिंधू सभ्यतेच्या अनेक पुरास्थळांमध्ये मिळाले आहेत.

लहुरादेवा येथे इ. स. पू. ९००० मध्ये मानवाने वस्ती करण्यास सुरुवात केली. इ. स. पू. ७००० च्या सुमारास नियोजित शेती करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली. द्वितीय कालखंडामध्ये शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन धान्य संग्रहाकरिता कोठारांचा उपयोग होऊ लागला. याच काळामध्ये तांब्याच्या अनेक वस्तू निर्माण केल्या गेल्या. तृतीय कालखंडामधे (प्रारंभिक लोहयुग) लोखंडाचा शोध लागून तत्कालीन संस्कृतीत अनेक बदल घडून आले. लहुरादेवाच्या चतुर्थ काळापासून ऐतिहासिक काळाची सुरुवात होत असून विशिष्ट पद्धतीची मृदभांडी या काळाची ओळख आहे. लहुरादेवाच्या अंतिम काळात येथे शुंग-कुषाण ते गुप्त काळापर्यंतचे प्रमाण मिळाले आहे. प्राचीन भारतीय कृषी परंपरेच्या दृष्टीकोनातूनही हे महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय स्थळ आहे. इ. स. पू. ६४०९ च्या सुमारास येथे धानाची शेती होत होती. येथील शेतीतून पिकवलेला तांदूळ भारतातील सर्वांत प्राचीन पुरावा आहे.

संदर्भ :

  • Tewari, Rakesh; Shrivastava, Rakesh Kumar, ‘Excavations at Lahuradeva 2001-02, 2002-03, 2004-05, 20005-06 (Part I & II)’, In Pragdhara, No. 27-28, Part 1, Archaeological Excavation Report: Lahuradeva (Sant Kabirnagar), 2022.

समीक्षक : सुषमा देव