भारतातील एक पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील अमरावती ‍ ‍जिल्ह्यात अमरावतीपासून ईशान्येस सुमारे ४८ किमी. अंतरावर, वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले आहे. या स्थळाचे कुण्डिनपूर, कुंडिनी  इ. नावांनी प्राचीन साहित्यात उल्लेख मिळतात; तसेच हे स्थळ प्राचीन विदर्भाची राजधानी असल्याचे ज्ञात होते.  पुराणांतील अनेक कथांत कौं‍डिण्यपूर गुरफटलेले आहे. कृष्ण-रुक्मिणी, शिशुपाल, नल-दमयंती यांचा संबंध कौंडिण्यपूरशी असल्याचे अनेक कथा सांगतात. हे स्थळ भीष्मक राजाची राजधानी असून त्याची कन्या रुक्मिणी  हिचे  श्रीकृष्णाने गावाबाहेरील अंबिकेच्या ‍ मंदिरातून हरण केले, अशी कथा प्रसिद्ध आहे.

कौंडिण्यपूरचे पुरातत्त्वीय महत्त्व तत्कालीन न्यायाधीश ए. आर. देशपांडे यांनी सर्वप्रथम उजेडात आणले (१९२८). त्यानंतर येथील अवशेषांचा अभ्यास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन महानिदेशक ⇨रावबहादूर का. ना. दीक्षित यांनी १९३६ साली, तर डेक्कन कॉलेज, पुणे येथील संशोधकांनी १९५९ साली केला. येथे पांढरीचे प्राचीन वस्त्यांचे अवशेष असलेली अनेक टेकाडे आहेत. या वस्त्यांचे स्वरूप आणि कौंडिण्यपूरचा भारतीय सांस्कृतिक परंपरेतील नामवंत व्यक्तींशी असलेला संबंध जास्त स्पष्ट करण्याच्या हेतूने उत्खनन करण्यात आले (१९६२-६४), मात्र वाङ्मयात उल्लेखिलेल्या नामवंत व्यक्तींच्या काळांतील पुरावा उत्खननात उपलब्ध झाला नाही.

महाराष्ट्र शासनाने मोरेश्वर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली येथे मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले (१९६२-६४). यात येथील प्राचीन लोहयुगापासून मध्ययुगापर्यंचा  सांस्कृतिक कालानुक्रम ‍ निदर्शनास आला. पुढे डेक्कन कॉलेज, पुणे येथील शास्त्रज्ञांनी पायरी खड्ड्यांची पद्धती अवलंबून उत्खनन केले (२००१).

पहिल्या  उत्खननात एकूण सहा कालखंडांतील वस्त्यांचा पुरावा उपलब्ध झाला. पहिला कालखंड प्राचीन लोहयुगीन महापाषाण संस्कृतीशी  निगडित असून नागपूरजवळील टाकळघाट व खापा येथील संस्कृतीशी समकालीन आहे. या कालखंडाची प्राचीनता इ.स.पू. २००० इतकी ठरविली गेली होती; अर्थात हा काल इ.स.पू. आठवे -सातवे शतक इतकाच प्राचीन होऊ शकतो, असे आता निश्चित झाले आहे. या काळातील लोक उत्कृष्ट बनावटीची काळी आणि तांबडी  या वर्गांची मृद्भांडी वापरीत, लोखंडाची  विविध शस्त्रे व दररोजच्या वापराच्या वस्तूही बनवीत. उत्कृष्ट नक्षीकाम केलेले दगडाचे मणी तयार करीत. त्याचप्रमाणे मुशीच्या साहाय्याने तांबे शुद्ध करीत असत. दुसरी वस्ती इ.स.पू.सु. ८०० ते ६०० या काळात  झाली. या कालखंडात काळी आणि तांबडी या वर्गांची मृद्भांडी चालूच राहिली, परंतु त्यात काही नवे आकार वापरात आले. तिसऱ्या कालखंडात, इ.स.पू. ३०० ते १००, कौंडिण्यपूरची  भरभराट झाली होती, असे ‍ दिसते. आहतनाणी, उत्कृष्ट चमकदार काळी मृद्भांडी, दगडांचे विविध रंगांचे मणी आणि कर्णकुंडले (ताटंक चक्र) इ.वस्तू तत्कालीन वैभवाची साक्ष देतात. ही सुबत्ता यानंतरच्या, इ.स.पू.१५० ते इ.स. सु. २००, सातवाहन कालखंडातही  टिकली. विटांनी बांधलेली सांडपाण्याची शोषणकुंडे, पाटे, काचेचे आणि  दगडांचे विविधरंगी मणी, काचेची कर्णकुंडले, दृष्टमणी, काजळ शलाका, कंगवे, हाडांच्या सुया, लोखंडी बाणाग्रे, भाले, कट्यारी इ. या काळात प्रचलित ‍होती. विविध प्रकारचे मणी बनविण्याचे कौंडिण्यपूर हे या काळात केंद्र ‍होते, असे दिसते. सातवाहनांच्या काळानंतर मात्र कौंडिण्यपूरला उतरती कळा लागली. वाकाटककालीन थरांत काही अर्चनाकुंडे सापडतात,तर मध्ययुगीन काळात घरांच्या घडीव दगडांच्या  भिंतींचे अवशेष आढळतात. याशिवाय मुहम्मदशाह बहमनी पहिला, औरंगजेब यांची मध्ययुगातील नाणी पांढरीच्या टेकडांवर सापडली.

२००१ साली येथे केलेल्या उत्खननात वनस्पतींच्या केसरादी अवशेषांव्यतिरिक्त अनेक थरांमध्ये गहू, वाटाणा,‍ हरभरे,‍ विशेषत: फोलपटांसह तांदूळ इ.जळालेल्या धान्यांचे अवशेष सापडले. तांदळाचे प्रमाण सातवाहन कालखंडात अधिक आढळून आले. अशाच प्रकारे तांदळाचे अवशेष जवळपासच्या सुमारे दहा पुरातत्त्वीय स्थळांच्या सर्वेक्षणातही ‍ मिळाल्याने प्राचीन काळी येथे मुबलक पाणीपुरवठा व अनुकूल हवामान असावे, असा निष्कर्ष काढता आला. मात्र इ.स.सहाव्या शतकानंतर हवामानात प्रतिकूल बदल होत गेला व पर्जन्यमान कमी झाले असावे.

संदर्भ:

  • Deotare, B. C., Joshi, P. S. & Parchure, C. N. Glimpses of Ancient Maharashtra, Bharatiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.
  • Dikshit, M. G. Excavations at Kaundinyapur, Bombay, 1968.
  • Shete, Gurudas ;  Mishra, Sheila & Deotare, B. C. Geoarchaeology of Upper Wardha Valley, Bulletin of The Deccan College Post-Graduate and Research Institute, 2006-2007.
  • Smith, Monica, How Ancient Agriculturists Managed Yield Fluctuations Through Crop Selection and Reliance on Wild Plants: An Example From Central India, Economic Botany, 2006.
  • देव, शांताराम भालचंद्र, ‘रुक्मिणीचे  कौंडिण्यपूर’, दै.केसरी, १९८४.

समीक्षक – भास्कर देवतारे

प्रतिक्रिया व्यक्त करा