आशिया खंडातील मेसोपोटेमिया या एका प्राचीन व प्रसिद्ध देशात आकारास आलेली शिल्पकला. तिला तिच्या प्राचीन नावावरून मेसोपोटेमियन शिल्पकला म्हणून ओळखले जाते. पश्चिम आशियातील टायग्रिस-युफ्रेटीस नद्यांच्या मधील सुपीक प्रदेशाला प्राचीन ग्रीकांनी मेसोपोटेमिया हे नाव दिले. इ.स.पू. ३००० ते इ.स.पू. ६ व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या सुमेरियन, अकेडियन, ॲसिरियन ते नव-बॅबिलोनियन अशा अनेक प्रतिभाशाली संस्कृतींचे उगमस्थान म्हणून हा प्रदेश ज्ञात आहे. या प्रदेशाच्या भौगोलिक सीमा निश्चित ज्ञात नसल्या, तरी भूमध्य सागराच्या पूर्वेकडील किनारपट्टीपासून इराणच्या पठारापर्यंत म्हणजे आताचा जवळजवळ संपूर्ण इराक, सौदी अरेबियाचा उत्तर भाग, सिरियाचा पूर्व भाग, दक्षिण-पूर्व तुर्कस्थान आणि तुर्कस्थान-सिरिया व इराण-इराकच्या सीमांचा प्रदेश यांचा यात समावेश होतो.

मेसोपोटेमियामधील कलाकृतींच्या पुरातात्त्विक नोंदींमध्ये सुरुवातीच्या भटक्या समाजापासून (इ.स.पू. १०,०००) ते ताम्रयुग (इ.स.पू. ५९०० ते ३२००) आणि कांस्य (ब्राँझ) युगातील (इ.स.पू. ३००० ते ११००) सुमेरियन, अकेडीयन, बॅबिलोनियन आणि ॲसिरियन साम्राज्यांच्या संस्कृतींचा समावेश झालेला दिसतो. या साम्राज्यांची जागा नंतर लोहयुगातील (इ.स.पू. १००० ते ५००) नव-ॲसिरियन आणि नव-बॅबिलोनियन साम्राज्यांनी घेतलेली दिसते. विस्तृत प्रमाणात विचार करता बहुविध संस्कृतींचे उगमस्थान असलेल्या मेसोपोटेमियात सर्वांत प्राचीन लेखन कौशल्यासह कितीतरी महत्त्वपूर्ण सांस्कृतिक शैली विकसित झालेल्या दिसतात. येथील कलेची कायमच समांतरकालीन इजिप्तच्या कलेसोबत तुलना केली जाते. मेसोपोटेमियामधील बहुतेक शिल्पप्रतिमा चित्रित केलेल्या होत्या; तेथील शिल्पकलाकृतींमध्ये दगड आणि चिकणमातीतील वेगवेगळ्या, अतिशय टिकाऊ शिल्पप्रतिमांवर मुख्य भर दिलेला आढळतो. वृत्तचितीच्या आकाराचे शिक्के, छोट्या शिल्पप्रतिमा, विविध आकारांतील उत्थित शिल्पे अशा अनेक प्रकारांत मेसोपोटेमियन शिल्पकलेची निर्मिती झालेली दिसते. सामान्यतः शिल्पांच्या प्रमुख विषयांमध्ये एकट्या अथवा उपासकासहित दाखवलेल्या देवदेवता; एकटे किंवा पंक्तींमध्ये, एकमेकांशी अथवा माणसांशी लढत असलेले प्राणी अशा विविध प्रकारच्या दृश्यांचा यात समावेश होतो.

कालक्रमपटानुसार विविध शिल्पप्रतिमांची आणि त्याअनुषंगाने शिल्पकलेची व तिच्या कालसंगत वैशिष्ट्यांची माहिती घेणे जास्त सोईचे होते. याकरिता मेसोपोटेमियन शिल्पकलेची कालक्रमपटानुसार नोंद घेऊन तशी वेगवेगळ्या नोंदीत माहिती दिली आहे. त्याचा अनुक्रम पुढीलप्रमाणे आहे.

१) मेसोपोटेमियन शिल्पकला : ऊरूक काळ

२) मेसोपोटेमियन शिल्पकला : प्रारंभिक राजवंश काळ

३) मेसोपोटेमियन शिल्पकला : अकेडियन काळ

४) मेसोपोटेमियन शिल्पकला : बॅबिलोनियन काळ

५) मेसोपोटेमियन शिल्पकला : ॲसिरियन काळ

यानुसारच्या नोंदीत त्या त्या कालावधीतील शिल्पकलेतील माहिती दिलेली आहे.