लाल रंगातील मृत्पात्रांवरील काळ्या-आकृत्यांची ही शैली इ.स.पू. सातव्या शतकात प्राचीन ग्रीकमध्ये निर्माण झाली. प्रथम कॉरिंथ व नंतर अथेन्स येथील मृत्पात्री चित्रकारांनी आत्मसात करून निर्मिती केलेली ही चित्रशैली ग्रीक इतिहासात महत्त्वपूर्ण मानली जाते. साधारण इ.स.पू. ६२५ पासून पुढील जवळ जवळ १५० वर्षे (साधारण इ.स.पू. ४८० पर्यंत) भूमध्यसागरातील भूभागातील मृत्पात्री बाजारात मृत्पात्र सजावटीच्या ह्या शैलीने वर्चस्व गाजविलेले दिसते. या शैलीच्या इतर महत्त्वाच्या केंद्रांमध्ये लॅकोनिया, बोएशिया, पूर्व ग्रीस आणि इटलीचा समावेश होतो. इ.स.पू. सहाव्या शतकाच्या आरंभी लॅकोनिया हे काळ्या आकृत्यांच्या मृत्पात्रांचे तिसऱ्या क्रमांकाचे उत्पादन केंद्र होते. विविध उत्खनन व संग्रहातून साधारण २०,००० पेक्षा जास्त काळ्या आकृत्यांच्या मृत्पात्रांचे अवशेष मिळाले आहेत ज्यामधून फक्त तत्कालीन कलाकार व कलाशाळांचीच नव्हे तर ग्रीक पौराणिक, धार्मिक, सामाजिक आणि खेळांचीही माहिती मिळते. याशिवाय ही मृत्पात्री प्राचीन ग्रीसमधील कालक्रमण समजण्यासाठीही महत्त्वाची ठरतात. एट्रस्कॅन्समध्ये ग्रीक काळ्या आकृत्यांच्या मृत्पात्रांच्या आयातीवरून अतिशय लोकप्रिय होते असे आढळते. ग्रीक कलाकारांनी एट्रस्कॅन्स बाजारपेठांसाठी सामान्य मृत्पात्रांपेक्षा आकार आणि चित्रणशैलीमध्ये थोडा फरक असलेल्या सानुकूलित मालाची निर्मिती केलेली दिसते.

फ्रँकॉईस कलश

काळ्या छायाकृती कोरून काढण्याचे प्रेरणादायी तंत्र हे मूलतः कॉरिंथमधून जन्माला आले. ज्याला प्रोटो-कॉरिंथियन शैली (पौर्वात्य काळ्या आकृत्यांची शैली) असे ओळखतात. जे नंतर काळ्या आकृत्यांचे तंत्र म्हणून वापरात आले. आधीच्या तंत्रपद्धतीपेक्षा नवीन पद्धती वेगळी व कोरलेल्या धातूच्या तुकड्यांची आठवण करून देणारी होती. त्यांची जागा अधिक उच्च अशा धातुसदृश्य दिसणाऱ्या मृत्पात्रांनी घेतली. बहुतेक प्रोटो-कॉरिंथियन आकारांचा वापर कमी होत जाऊन नवीन अधिक प्रगत आकार व त्यांची शैली विकसित होत गेल्याचे दिसते. कॉरिंथमधील मृत्पात्रांवर प्राणी व मानवी आकृत्यांसाठी एकसारखीच तंत्रपद्धती वापरलेली दिसते. कॉरिंथियन चित्रकारांनी सुरुवातीच्या काळ्या आकृत्यांमध्ये प्राण्यांच्या आकृत्यांवर वेगवेगळे प्रयोग केलेले दिसतात. तसेच त्यांना चित्रणात जास्त महत्त्वही दिलेले दिसते. उदाहरणार्थ, चित्रकारांनी मृत्पात्री सजावटीसाठी प्राधान्याने प्राण्यांच्या आकृती वापरून रंगविलेली शोभेची पट्टी होय. जसजसे मध्य ते उत्तर काळात चित्रकारांचा चित्रणात मानवी आकृती दाखवण्याचा आत्मविश्वास वाढला. तसतसे प्राण्यांच्या आकृत्या लहान होत गेल्याचे आढळते. कॉरिंथमध्ये मृत्पात्रांसाठी वापरण्यात आलेली मृदा सामान्यतः मृदू स्वरूपाची व पिवळ्या रंगाची (कधी कधी फिकट हिरव्या रंगाची) होती. जी मृत्पात्री भाजल्यानंतर प्रत्येकवेळी अपेक्षित परिणाम देत नव्हती. त्यामुळे चमकदार राळेचा थर पूर्ण मृत्पात्रांवर अथवा काही भागांवर देण्यात येत असे. ज्याचा परिणाम मृत्पात्रे भाजल्यावरती निरूत्साही काळ्या रंगाची होत. सोबत लाल व पांढऱ्या रंगाचाही वापर कॉरिंथपासून सुरू झाला. कॉरिंथमधील मृत्पात्री लहान आकाराची होती. प्रामुख्याने अलाबास्त्रा (alabastra) व अरीबल्लोस (aryballos) ही तेलासाठी वापरण्यात आलेली; पिक्सिडस (pyxides) झाकणयुक्त पेट्या, क्रेटर (krater), ओइनोकोइ (oenochoe) आणि वाडगी रंगविली जात होती. सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कॉरिंथियन मृत्पात्रांचा दर्जा घसरू लागला. इतका की काही कॉरिंथियन मृत्पात्र चित्रकारांनी त्याकाळातील अधिक उत्तम अशा अथेनियन मृत्पात्रांची नक्कल करण्याच्या प्रयत्नांत लाल रंगाच्या राळेचा वापर केलेला दिसतो.

कॉरिंथियन शैलीप्रमाणे अथेन्समधील चित्रकारांनीही इ.स.पू. सातव्या शतकापासून प्राण्यांच्या आकृतींच्या शोभेच्या पट्टीचा चित्रणात वापर केलेला आदळून येतो. तो साधारण इ.स.पू. ५५० पर्यंत जेव्हा एक्सिकीअस (Exekias), अमासिस (Amasis) सारख्या ॲटिक चित्रकारांनी सजावटीमध्ये कथेचा देखावा दाखविण्याचे कौशल्य विकसित केले व काळ्याआकृतींची शैली परिपूर्णतेस नेली. काळ्या आकृत्यांचे चित्रण अँफोरा व कलश यांबरोबरच प्रामुख्याने प्याला, लेकीथोई (lekythoi) म्हणजे मूठ असलेली बाटली, किलिक्स (kylixes) म्हणजे पाया असलेला प्याला, पिक्सिडस (pyxides) झाकणयुक्त पेट्या आणि वाडग्यांवरही केलेले आढळते.

बनविण्याची पद्धती – अथेन्समधील चित्रकारांनी मानवी आकृतीची छायाकृती नैसर्गिकरीत्या दाखवण्यास प्राधान्य दिलेले आढळते. येथील कुंभारांना अथेन्सच्या परिसरात मिळालेल्या अतिशय उत्तम अशा लोहयुक्त मृदेमुळे उच्च दर्जाची मृत्पात्री बनविण्याची संधी मिळाली. ह्या मृत्पात्रांमध्ये एकसमानता, सुंदर अशी तकतकी व काळ्या रंगाचे लेपन तसेच जेथे मूळ मृत्पात्राची मृदा दिसते, तेथे सूक्ष्मतेने गुळगुळीत केलेले आढळते. मृत्पात्री बनविल्यानंतर व भाजण्यापूर्वी त्यांवर उठावदार परिणामासाठी केलेल्या चमकदार काळ्या रंगद्रव्याच्या जाड लेपनामध्ये कांक्षी, लोह खनिज व सिरका यांचे मिश्रण आढळते. आकृतीच्या अतिरिक्त तपशीलांमध्ये छायाकृती कोरताना मृत्पात्राची खालील मृदा दिसेपर्यंत काळ्या रंगामध्ये एका धारदार उपकरणाचा वापर करून कोरून स्नायू व केस जोडण्यात आले. त्यांवर लाल व पांढऱ्या रंगाचे लेपन केलेले आढळते.

काळ्या आकृत्यांच्या शैलीतील धारदार उपकरणाचा अतिशय उत्तम दर्जाचा अनुप्रयोग इ.स.पू. ५४० ते ५३० मधील ६१.१ सें.मी. उंचीच्या एक्सिकीअसच्या (Exekias) अँफोरावरती दिसून येतो. यामधे अकिलीस आणि अजाक्स फाश्यांचे खेळ बसून खेळतांना दाखवलेले असून आजूबाजूला बसलेले योद्धे देखावा केंद्राकडे झुकलेले असून ह्या सर्वांच्या कपड्यांवरील बारकाव्यांचे अतिशय उत्तम रेखाटन केलेले आढळते. प्रमाणबद्ध व सममित असलेल्या ह्या चित्रणात मृत्पात्र भाजण्यापूर्वी रंगाच्या लेपनामध्ये नाजूक बाह्यरेखा कोरलेल्या आढळतात. ज्यामुळे आकृतींच्या अवयवांना विशिष्ट गोलाई आलेली दिसते. बारीक पांढऱ्या व लाल अपार्य रंगांचा वापर तपशीलांना उठाव देण्यासाठी केलेला दिसतो.

तज्ञांच्या मते, काळ्या आकृत्यांची मृत्पात्रे भाजताना तीन टप्प्यात भाजण्यात आली असावी. ज्यात भट्टीत पहिल्या टप्प्यात प्राणवायूशी संयोग होऊन पूर्ण मृत्पात्राचा रंग बदलून नारिंगी होतो व त्यावरील लोहयुक्त राळेचे रूपांतर तांबड्या रंगात होते. पुढील दुसऱ्या टप्प्यात इंधन भट्टीत सरकवून भट्टीचे तोंड बंद केले जाते व आत जाणारा प्राणवायू पुरवठा बंद केला जातो व आत कोंडलेल्या धुरातील कार्बनमुळे मृत्पात्रावरील तांबड्या झालेल्या राळेचे रूपांतर काळ्या रंगात होते. यापुढील तिसऱ्या टप्प्यात भट्टीचे तोंड उघडून त्यात परत हवा खेळती ठेवली जाते. ज्यामुळे मृत्पात्रांच्या ज्या भागांवर राळेचे लेपन नाही, तो भाग परत ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन नारिंगी होतो.

चित्रणातील रूढी – ग्रीक चित्रकारांनी अधिक यथार्थवादी परिभाषित आकृती दर्शविण्यासाठी रंगसंगतीच्या काही रूढी अवलंबिलेल्या दिसतात. जसे स्त्री आकृती दाखवताना पांढरा रंग तर पुरुषाकृतीसाठी काळा रंग, स्त्री आकृतींचे डोळे दाखविताना बदामाच्या आकाराचे तर पुरुषांसाठीचे गोलाकार. लहान मुलेही मोठ्यांप्रमाणेच परंतु छोट्या आकारांत दाखविलेली आढळतात. तरुण पुरुष दाढीशिवाय तर वयस्कर व्यक्तींचे केस पांढरे आणि कधीकधी वाकून चालताना आणि वृद्ध स्त्रिया पूर्ण वस्त्रांमध्ये दाखविण्याची विशेष काळजी घेतलेली दिसते. डोक्याला हात लावण्यासारखे दु:ख दर्शविणारे काही हावभावही पारंपरिक बनल्याचे दिसतात. आकृत्यांमध्ये उत्तम सूडौलता व समतोल दिसतो. अनेकदा वास्तविक हालचाली करण्यापूर्वी किंवा परिश्रमानंतर विश्रांती घेतलेल्या क्षणांचे चित्रण केलेले आढळते. मानवाकृतीत सहसा एका बाजूने चेहरा व शरीर समोरून दाखविलेले आढळते, तर धावपटू दाखवताना त्याचे दोन्ही, डावा (अथवा उजवा) हात व पाय पुढे सरकण्याच्या अशक्य अशा स्थितीत दाखवलेले दिसतात. घोडे व रथ हे समोरून दाखवताना चित्रकारांनी यथार्थदर्शी चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. मृत्पात्राच्या कडा व किनारी बऱ्याचदा ताडाचे पान, फुले व कमळ अशा नैसर्गिक आकारांच्या नक्षीकामाने सजवलेली आढळतात. बऱ्याचदा मृत्पात्री भाजण्याच्या कमी-जास्त वेळांमुळे चित्रांत काळ्या रंगाच्या विविध छटा आल्याचे दिसून येते.

या शैलीतील मृत्पात्रांवर प्रामुख्याने कथनात्मक चित्रण केलेले आढळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘फ्रँकॉईस कलश’ (francois vase). एर्गोतिमोस (Ergotimos) याने बनविलेला व क्लेइटस (Kleitias) याने चित्रण केलेला साधारण इ.स.पू. ५७० ते ५६५ या कालावधीतील ६६ सें.मी. उंच व ५७ सें.मी. व्यास असलेला एक मोठा क्रॅटर. यामध्ये आश्चर्यचकित करणाऱ्या ग्रीक पुराणकथांमधील दृश्ये व ऑलिंपियन देवता सेंटॉर, अकिलीझ (Achilles), व पेलेउस (Peleus) अशा व्यक्तिचित्रांचा समावेश असून त्यात २७० मनुष्य व प्राण्यांच्या चित्रकृती, तर १२१ उत्कीर्णलेख आढळतात.

ॲटिक प्राण्यांच्या आकृतींची शोभेची पट्टी रंगविण्यात प्राविण्य मिळविणारा प्रारंभिक चित्रकार नेस्सोस (Nessos)  ह्याने ॲटिक काळ्या आकृत्यांच्या शैलीतील पहिला अँफोरा इ.स.पू. सु. ६२० या काळात चित्रित केला गेला. प्रथम स्वाक्षरी केलेल्या सोफिलॉस (Sophilos) या कलाकाराचा कलश हा इ.स.पू. ५७० च्या सुमाराचा आहे. असे अनेक वैयक्तिक चित्रकार त्यांच्या स्वाक्षऱ्यांद्वारे निश्चितपणे शास्त्रज्ञांनी ओळखले आहेत आणि कितीतरी स्वाक्षरीकृत कलाकारांना त्यांच्या विशिष्ट शैलीमुळे ओळखता येऊ शकते. काळ्या आकृत्यांच्या शैलीतील चित्रकार व मृत्पात्रीकार हे प्रत्येकवेळी वेगवेगळे होते असे नाही. या शैलीतील उल्लेखनीय चित्रकारांमध्ये क्लेईटस (Kleitias), नीरकॉस (Nearchos), लैडॉस (Lydos), अमासिस (Amasis), अँडोकिड्स (Andokides) आणि सोफिलोस (Sophilos) यांचा समावेश होतो.

इ.स.पू. ५२०च्या सुमारास अँडोकिड्स, ओल्तोस (Oltos) व सायआक्स (Psiax) या चित्रकारांनी लाल आकृत्यांची तंत्रपद्धती विकसित करताना प्रथम द्विभाषिक कलश चित्रण (Bilingual vase painting) शैलीची निर्मिती केली. लाल आकृत्यांचे तंत्र विकसित झाल्यावर लवकरच काळ्या आकृत्यांच्या शैलीचे महत्त्व कमी झाले. तरी साधारण इ.स.पू. ५६६ मध्ये सुरू झालेल्या पॅनअथेनिक अँफोरांच्या स्वरूपात काळ्या आकृत्यांच्या शैलीचा वापर इ.स.पू. चौथ्या शतकापर्यंत होत होता.

संदर्भ :

  • Boardman, John., Early Greek Vase Painting : 11th-6th Centuries, London, 1998.
  • Cook M. Robert, Greek Painted Pottery (Handbooks of archaeology), Methuen, 1960.
  • Herford, Mary; Beatrice, Antonie, A Handbook of Greek Vase Painting, 1995.
  • Stansbury-O’donnell, Mark, A History of Greek Art, 2015.
  • Steiner, Ann, Reading Greek Vases, Cambridge, 2007.
  • Von Bothmer, Dietrich, Greek Vase Painting, New York, 1987.